आनंदघर मूलभूत काम - लेख - १४

अँड. छाया गोलटगावकर
Saturday, 28 September 2019

मागच्या काही लेखांमध्ये आनंदघरची शिबिरं, विविध उपक्रम, सण- उत्सव, स्नेहसंमेलन, याविषयी मांडणी केली आहे. 
(संपर्क- 
chhaya.golatgaonkar@gmail.com)

हे सर्व उपक्रम (ॲक्टिव्हिटी) मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी नाहीत, तर त्यांच्यातील सर्जनशीलतेला, कल्पकतेला वाव देण्यासाठीचे नवनवीन प्रयोग, करून बघण्यासाठी आहेत. त्यामुळे एका ठराविक चौकटीत अमुक एक उपक्रम असाच केला पाहिजे असा आग्रह नाही. तो उपक्रम करण्यात मुलांना आनंदही मिळायला हवा, या विचाराने त्याची रचना व कृती केली जाते. त्यामुळे ॲक्टिव्हिटी घेतली आणि दोन वर्षांच्या मुलांनी अगदी ५- ६ वर्षांच्या मुलासारखं एकदम फिनिशिंग असलेलं काहीतरी बनवलं, असं इथे घडत नाही. 

दोन वर्षांचं मूल त्याच्या वयानुसार समजेनुसार तो उपक्रम करेल, यातूनच मुलांचं शिकणं होणार आहे. आपण जर त्यांना finished, आयत्या वस्तू तयार दिल्या. हात पकडून करून घेणं अशी सवय लावली तर त्यांच्या स्व-शिक्षणात अडथळा निर्माण होईल. याबद्दल काही प्रमाणात मांडणी आधीच्या लेखात झाली आहे. 

गेल्या साडेतीन वर्षात आनंदघरात वय वर्षे 1 ते 15 या वयोगटातील मुलं, त्यांची भावंडं शिबिरात व बालसंगोपन केंद्रात येऊन गेली. अंदाजे 300 मुलं येऊन गेली. या वयोगटाच्या मुलांच्या वाढीचे व विकासाचे टप्पे छान समजून घेता आले. एखाद्या उपक्रमातील फिनिशिंग, डिटेलिंग एक वर्ष ते पंधरा वर्ष या वयोगटात वेगवेगळ्या टप्प्यांवर कसं बहरतं जातं, ते समजून घेता आलं, अनुभवता आलं. 

प्रकर्षाने जाणवले की बालशिक्षण, संगोपन याचा अभ्यास करणं, प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणं यात फरक आहे. वैचारिक पातळीवर एखादा विषय समजून घेणं, अभ्यास करणं हा एक भाग झाला, आणि प्रत्यक्ष कृतीत, काम करत हे विषय समजून घेणं हा दुसरा भाग झाला, आणि हे दोन्ही भाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मुलांसोबत काम करताना भिन्न स्वभावाची मुलं, पालक, ताया, मदतनीस इत्यादी भेटले. या सर्वांनी हा साडेतीन वर्षांचा प्रवास अगदी समृद्ध केला. 

रोजच्या रोज काहीतरी घडत होतं, त्यातून काही तरी कळत होतं. असं म्हणतात, 'प्रत्येक मूल वेगळं असतं' हे पुस्तकांमध्ये वाचलेलं. प्रत्यक्ष काम करताना प्रत्येक मुलं कसं वेगळं असतं हे कळलं. म्हणजे उदाहरणार्थ मुलांच्या रुळण्याच्या पद्धती, सर्वांच्या एक सारख्या नाहीत, रुळण्याचा कालावधी तोही एक सारखा नाही. अशा कितीतरी गोष्टी प्रत्येक मुलाचे वेगळेपण दाखवत होत्या.

साडेतीन वर्षाच्या काळात केलेल्या कामाकडे वळून बघताना असं लक्षात येतं की, मूल समजून घेण्याचा हा सुंदर प्रवास आहे. यात विविध वयोगटाची मुलं विविध सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, भावनिक पार्श्वभूमी असलेली मुलं होती. काही मुलं ही विशेष मुलं, निम्न आर्थिक स्तरातीलही होती.
 
सुरुवातीपासूनच रोजचे उपक्रम व दैनंदिन कामकाज यात एक महत्त्वाचं काम आम्ही केलं, ते म्हणजे मुलांच्या नोंदी घेतल्या, त्यांची निरीक्षणं लिहिली. त्यात त्यांच्यात असलेल्या क्षमता. उदाहरणार्थ दिलेला उपक्रम व्यवस्थित वेळेत पूर्ण करता येणं, त्यांच्या भावना प्रेमळ, आनंदी, उदास इत्यादी यांच्या नोंदी घेतल्या. त्याच बरोबर एखादा उपक्रम करण्यात काही अडचण येते का? मुलांसोबत मिसळण्यात काही व्यत्यय येतो का? अशाही नोंदी निरीक्षणं नोंदवली. 

खरंतर नोंदी लिहिताना त्याचा काय उपयोग होईल, आपण कुठे पोहोचू याची अस्पष्ट कल्पना होती. कल्पनेपेक्षाही जास्त फायदा या नोंदींचा, निरीक्षणांचा झाला. या नोंदींनुसार पालकांशी बोलणं, ताया, मावशींसोबत बोलणं व पुढील वाटचालीची आखणी करणं, यासाठी याचा उपयोग झाला. या कामाचं एकाप्रकारे डॉक्युमेंटेशनचं झालं म्हणा ना!
 
यातूनचं एक वाट सापडत गेली, ती वाट भावनिक स्थिरतेची! भावनिक दृष्ट्या अस्थिर असलेल्या मुलांना शिकण्यात अडचणी येतात असं जाणवू लागलं. मुलं भावनिक दृष्ट्या स्थिर व्हावीत यासाठी काही छोटे-छोटे प्रयोग करून बघितले. या आणि यासारख्या काही प्रयोगांविषयी लेखमालेच्या स्वरूपात आपल्या सोबत संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे. आनंदघरच्या लेखमालेच्या पुढच्या लेखांमध्ये आनंदघरच्या मूलभूत कामाविषयी मांडणी करण्याचा हा प्रयत्न आहे. 

मला माहित आहे, साडेतीन वर्षाच्या आनंदघर बालसंगोपन केंद्राच्या छोटेखानी प्रयोगात काही त्रुटी असतील, त्यासोबत काही गवसलं आहे, गवसत आहे, असं नक्कीच म्हणता येईल. मूल समजून घेणं म्हटलं तर सोप्प, म्हटलं तर खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे हा प्रवास आणि अभ्यास खूप झाला, संपला असं काही म्हणता येत नाही. हा अनुभव शब्दबद्ध करणं म्हणजे मेंदूची मोठी कसरत होती. 

हा सर्व लेखप्रपंच, खटाटोप कशासाठी, गुणवत्तापूर्ण बालसंगोपनाचा आग्रह कशासाठी... यावर मला ताराबाई मोडक यांनी वापरलेला "बालकरण" शब्द आठवतो. मुलांसोबतच हे काम काही गोड गोड, आनंददायी एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर बालहक्क, त्याच रक्षण यात अंतर्भूत आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News