रम्य ती अंत्ययात्रा

भक्ती कोठावळे
Friday, 18 October 2019
  • घर मळ्यात होतं. अंत्ययात्रा घरापासून तर गावातल्या नदीकिनारी असलेल्या अमरधामपर्यंत होती. आम्ही चालतच निघालो. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुंदर रोपवाटिका होती.

काल एका अंत्यविधीला जावे लागणार होते. त्यामुळे मन उदास आणि थोडं खिन्न होतं. ठिकाण होतं निमगाव भोजापूर (ता. संगमनेर). सकाळी सातलाच घरातून निघालो. आधी बराचसा पाऊस झाल्यामुळे जाताना दिसणारे डोंगर व मोकळी मैदानं छान हिरवाईनं भरलेली होती. नाशिकपासून दोन तासांचा प्रवास, पण पूर्ण रस्ता शांत आणि शांततेतच मोहक वाटत होता. तशी मृत झालेली व्यक्ती वयस्कर आणि कर्करोगाशी झुंज देणारी होती. त्यामुळे त्या सोडून गेल्या या दुःखापेक्षा त्यांची वेदनांमधून सुटका झाल्याचा आनंद तेवढा थोडासा होता.

घर मळ्यात होतं. अंत्ययात्रा घरापासून तर गावातल्या नदीकिनारी असलेल्या अमरधामपर्यंत होती. आम्ही चालतच निघालो. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुंदर रोपवाटिका होती. त्याला लागून असलेल्या मळ्यात डाळिंब, मका, भोपळे अशी अनेक पिकं घेतलेली होती. तसं प्रसन्न वाटत होतं, पण जेव्हा उताराने नदीकिनारी आलो, तेव्हा मी बघतच राहिले. स्मशानभूमी फुलांनी सजविलेली होती. दहनासाठी असलेल्या चौथऱ्यावर झेंडूच्या पाकळ्या टाकून सजविलेले होते. सरणावर चंदनाच्या पानांच्या सहाय्याने हिरवेगार गादीसारखे तयार केलेले होते, तसेच वरदेखील झेंडूच्या माळांचे तोरण लावलेले होते.

मी एक मिनिटासाठी स्तब्ध झाले, की हा कुठल्या विधीचा मंडप आहे, की सरण... आजूबाजूचा परिसर तर अतिशय मोहक होता. नदीचे पात्र बरच विस्तृत होते आणि ते तुडुंब असे खळखळ त्याच्याच नादात वाहत होते. स्मशानभूमीचा पूर्ण परिसर स्वच्छ तर होताच, पण पूर्ण वृक्षवल्लीने भरून वाहत होता. त्यात भर या लोकांनी ठिकठिकाणी अगरबत्तीचे बुचके लावलेले होते. त्याचा दरवळणारा सुगंध आणि त्यात चंदनाचाही मोह घालणारा दरवळ. यामुळे माझं मन खूप प्रसन्न झालं होतं.

स्मशानात जाताना घाबरणारे काही लोक असतात, अशा लोकांच्या रांगेतली मी पहिली. पण का कुणास ठाऊक मला आज येथे अजून वेळ घालवावासे वाटत होते. सगळे लोक माघारी जाण्यासाठी उठले. मीही उठले आणि चालू लागले... पुन्हा मागे वळून पाहिलं... या सगळ्या रम्य वातावरणात ते प्रेत धगधगत होते. मनात आले मृत्यूदेखील सुंदर आणि मोहक असू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News