विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क पुस्तक बॅंक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • युवा वकील ॲड. नीलेश हेलोंडे यांच्या मनात ‘सावित्रीबाई फुले निःशुल्क पुस्तक बॅंके’ची कल्पना आली

काटोल - समाजात वावरताना प्रत्येकाला एकमेकांची गरज असते. त्याशिवाय मानव आपल्या मूलभूत गरजेची परिपूर्णता करू शकत नाही. मात्र, प्रत्येकाची देण्याची वृत्ती नसते. हेच समाजाचे शल्य ओळखून काटोल येथील युवा वकील ॲड. नीलेश हेलोंडे यांच्या मनात ‘सावित्रीबाई फुले निःशुल्क पुस्तक बॅंके’ची कल्पना आली. समाजातील समाजभान जपणाऱ्या मित्रांसोबत कल्पना मांडली व प्रत्यक्षात सिटी लायब्ररी काटोल येथे मुहूर्तमेढ रोवली.

‘उदार मनाने दयावे, गरजू लोकांनी न्यावे’ या ब्रीद वाक्‍याला अनुसरून समाजातील दानशुरांकडून पुस्तक, वह्या व शैक्षणिक साहित्य गोळा केले व गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले.

सावित्रीबाई फुले निःशुल्क पुस्तक बॅंकेचे उद्‌घाटन नगराध्यक्ष वैशालीताई ठाकूर यांच्या हस्ते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दीपक केने, पुरुषोत्तम धोटे, नगरसेवक संदीप वंजारी, नगरसेविका लता कडू, नगरसेविका जयश्री भुरसे, नगरसेविका शालिनी बन्सोड, रमेश फिस्के, भरत पटेल, ॲड. दिनेश काळे, ॲड. वंदना चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजात वावरताना मनात चांगल्या कल्पना येतात. त्या कल्पनेला प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याकरिता खूप परिश्रम करावे लागतात. समाजात काम करताना मदत मिळत असते. याची प्रचिती ॲड. नीलेश हेलोंडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पुस्तक बॅंकेच्या उद्‌घाटनप्रसंगी होत असल्याचे वैशाली ठाकूर यांनी सांगितले. 
प्रास्तविक ॲड. नीलेश हेलोंडे, संचालन ॲड. ऋतूजा गायकवाड यांनी केले. आभार ॲड.भैरवी टेकाडे यांनी केले. आयोजनासाठी ॲड.अमोल धापोडकर, ॲड. श्रीमती राऊत, नाना कुंभरे आदींनी सहकार्य केले.

समाजातील गोरगरिबांच्या मुलांना मदत व्हावी व ज्यांची समाजासाठी काही करण्याची इच्छा आहे, त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी निःशुल्क पुस्तक बॅंक सुरू केली आहे.
ॲड. नीलेश हेलोंडे
वकील, काटोल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News