अकरावीसाठी विद्यार्थ्यांना कला शाखेत मोफत प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

यंदाच नव्हे तर गेल्या चार वर्षांपासून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

पैठण - येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या अध्यक्ष रवींद्र शिसोदे व कार्यवाह राजेंद्र शिसोदे या बंधूंनी यंदा तालुक्‍यातील भीषण दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी कला शाखेत शिक्षणासाठी मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क लागणार नसल्याने दुष्काळात मोठा आधार मिळाला असून त्यांच्या पालकांनाही धीर आला आहे. 

यंदाच नव्हे तर गेल्या चार वर्षांपासून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या दुष्काळाने तर मागील दुष्काळापेक्षा भयावह परिस्थिती निर्माण केली  आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षणासाठीचा खर्च करणे अवघड झाले असताना प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या शिसोदे बंधूंनी अकरावीच्या कला शाखेतील इच्छुक विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत  होत आहे. 

प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना पैठण येथे दिवंगत खंडेराव पाटील शिसोदे यांनी केली. या काळात तालुक्‍यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळेच खंडेराव पाटील शिसोदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा पैठणचे सुपुत्र दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे सहकार्य घेऊन प्रतिष्ठान महाविद्यालय सुरू केले. आज या महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य या प्रमुख शाखांसह नवनवीन आधुनिक शिक्षण सुरू केले आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपजत कला गुणांना वाव, नियमित तासिका, सुसज्ज इमारत, भव्य ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगण व इनडोअर स्टेडियम आदी सुविधा प्राधान्याने दिल्या जात आहेत. 

दुष्काळाने पैठण तालुका होरपळून गेला आहे. त्यामुळे तालुक्‍याचे अर्थकारण कोलमडले आहे. या बाबींचा विचार करून महाविद्यालयाने अकरावी कला शाखेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
- राजेंद्र शिसोदे, कार्यवाह, प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ, पैठण.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News