रात्र महाविद्यालयांची उभारणी अजून अधांतरीच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019
  • जाचक अटींमुळे निविदेला प्रतिसादच नाही; महापालिकेवर तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ

नवी मुंबई - रात्र कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी महापालिकेने नमूद केलेल्या अटी जाचक वाटत असल्यामुळे निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्यास अटींबाबत फेरविचार करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिका या शैक्षणिक वर्षापासून परिमंडळनिहाय रात्र कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याच्या विचारात होती. अर्थसंकल्पादरम्यान तसे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर लगेच इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यासाठी पहिली निविदा काढण्यात आली. या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मे महिन्यात फेरनिविदा काढण्यात आली. या वेळीही प्रस्ताव न आल्यामुळे महापालिकेने तिसऱ्यांदा निविदा काढली आहे. 

या निविदेत इच्छुक संस्थांना २५ जुलैपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्र कनिष्ठ महाविद्यालयांचे व्यवस्थापन करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांसाठी मोफत शिक्षणाची अट महापालिकेने घातली आहे. महापालिकेमार्फत केवळ इमारत उपलब्ध केली जाणार असून, महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित संस्थेनेच घ्यायची आहे. या अटींमुळे संस्थांकडून प्रतिसाद मिळत नसावा, असे सांगितले जाते.

विद्यार्थ्यांसाठी आशादायक
नवी मुंबई महापालिकेतर्फे परिमंडळनिहाय प्रत्येकी एक अशी दोन रात्र कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात येणार होती. बिकट आर्थिक स्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आशादायक आहे.

रात्र कनिष्ठ महाविद्यालयांसाठी महापालिका केवळ जागा देणार असून, संबंधित संस्थेने विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण द्यायचे आहे. महापालिकेमार्फत आर्थिक पाठबळ दिले जाणार नाही. प्रथमदर्शनी या अटींमुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. या निविदेलाही प्रतिसाद मिळाला नाही; तसेच अटींमध्ये बदल करायचा असल्यास महासभेचा विचार घेतला जाईल. 
- नितीन काळे, शिक्षणाधिकारी व उपायुक्त, 
नवी मुंबई महापालिका

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News