शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशाला समर्थकांनी दिला हिरवा कंदील

विशालराज पाटील
Monday, 29 July 2019
  • छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका मांडली

सातारा : बाबाराजे, वेळ घालवू नका... मतदारसंघाच्या हितासाठी तुम्ही भाजपमध्ये जावा. आम्ही पक्षाकडे नव्हे छत्रपतींचे वंशज म्हणून तुमच्या सोबत आहोत. तुम्ही जो घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी ग्वाही सातारा शहर व उपनगरातील समर्थकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिली. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशाला सातारा शहरातील समर्थकांनी हिरवा कंदील दिला आहे. उद्या (मंगळवारी) दुपारी सातारा तालुक्‍यातील समर्थकांची बैठक सुरूची निवासस्थानावर होणार असून, या समर्थकांचे मत आमदार आजमावून पाहणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सातारा विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली असून, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यास भाजपचे नेते यशस्वी ठरले आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा व जावळी मतदारसंघाच्या हितासाठी भाजपमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे. यावर आपल्या समर्थकांचे मत आजमावून घेण्यासाठी त्यांनी आज सुरूची बंगल्यावर सातारा शहर व परिसरातील समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश बडेकर, प्रकाश गवळी, नासीर शेख, अशोक मोने, ऍड. डी. आय. एस. मुल्ला, रामभाऊ साठे, हेमंत कासार यांसह पालिकेतील नगरविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

सुरवातीला सर्वांनी आपले म्हणणे मांडले. यामध्ये मतदारसंघाच्या हितासाठी आपण जे निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे वेळ घालवू नका, मतदारसंघाच्या हितासाठी भाजपमध्ये जावे. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका मांडली. मुस्लिम समाज आपल्यासोबत राहणार का, या शंकेवर या समाजातील नगरसेवक व समर्थकांनी आमचे संबंध बाबाराजेंशी होते, पक्षाकडे बघून आम्ही तुमच्यासोबत आलेलो नाही. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमच्यासोबत असून यापुढेही तुमच्यासोबतच राहणार आहोत, अशी ग्वाही देण्यात आली. 

त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,"" सातारा-जावळी मतदारसंघातील समाज, मतदारसंघ आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय मी घेणार आहे. यासंदर्भात पवारसाहेबांशी माझे बोलणे झाले आहे. कुठेही असलो तरी मला संघर्ष अटळ आहे.  त्यामुळे लढाई ही मला करावीच लागणार आहे. लढाई करायची असेल तर कोठे थांबायचे, याबाबत समर्थकांचे म्हणणे विचारात घेऊन मी निर्णय घेईन.'' यावर महाराज तुम्ही भाजपसोबत चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही सर्वांनी दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News