पहिल्यांदाच कृती आराखडा तयार; जलद प्रतिसाद पथकेही तैनात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

त्यासाठी आरपीएफने २०० होम गार्ड आणि महाराष्ट्र सिक्‍युरिटी बोर्डाचे अतिरिक्त २५८ सुरक्षा रक्षक मदतीला घेतले आहेत.

मुंबई - पावसाळ्यात उद्‌भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) जवान सज्ज झाले आहेत. मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गांवर आपत्कालीन परिस्थितीत कोणती दक्षता घ्यावी व अडकलेल्या प्रवाशांची सुटका करून त्यांना तातडीने मदत कशी करावी यासाठी आरपीएफच्या वतीने पहिल्यांदाच एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

त्याशिवाय आरपीएफने प्रशिक्षित असलेल्या ६० कर्मचारी-अधिकाऱ्यांचे जलद प्रतिसाद पथक तयार करून त्यांना आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी सज्ज केले आहे.    आपत्कालीन स्थितीत रेल्वे प्रवाशांना मदतीचा हात देण्यासाठी आरपीएफ मुंबई मंडलचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अशरफ के. के. यांच्या आदेशानुसार एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय आरपीएफच्या वतीने मध्य आणि हार्बर मार्गावरील ज्या रेल्वेस्थानकांवर अरुंद पूल वा जिने आहेत अथवा ज्या ठिकाणी प्रवाशांची जास्त गर्दी होण्याची शक्‍यता आहे अशी १७ रेल्वेस्थानके जोखमीची म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत.

त्या रेल्वेस्थानकांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आरपीएफने २०० होम गार्ड आणि महाराष्ट्र सिक्‍युरिटी बोर्डाचे अतिरिक्त २५८ सुरक्षा रक्षक मदतीला घेतले आहेत.जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बोर्डाचे आणखी १०३ सुरक्षारक्षक मदतीला घेतले जाणार आहेत. त्याशिवाय ७० आरपीएसएफचे जवान महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर तैनात करण्यात आले आहेत. मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बरच्या सर्वच रेल्वेस्थानकांवर जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून आरपीएफसह रेल्वे पोलिस, होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक सज्ज झाले आहेत. प्रत्येकी २० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तीन जलद प्रतिसाद पथक शीव, ठाणे आणि कल्याणमध्ये तैनात ठेवण्यात आले आहे.  

जोखमीची  रेल्वेस्थानके 
आरपीएफने १७ रेल्वेस्थानके जोखमीची म्हणून निश्‍चित केली आहेत. त्यात मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद रोड, करीरोड, दादर, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा स्थानकांचा समावेश आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड, जीटीबी नगर आणि चुनाभट्टी स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे.  
जवानांना पुरविण्यात आलेली साधने 
विविध रेल्वेस्थानके व महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानांना ५० हून अधिक लाऊडहेलर्स देण्यात आली आहेत. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी २५० वॉकीटॉकी, अंधारात उठून दिसतील असे चमकदार जॅकेट्‌स, मेगाफोन, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी इमर्जन्सी लाईट, फ्लोरोसेन्ट टेफ्स, स्ट्रेचर, नायलॉन रोप, प्रथमोपचार पेटी आदी साधनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News