अशी शोधा गीतांमधली सौंदर्यस्थळे

हेमंत देशपांडे
Wednesday, 3 July 2019

'ज़ार-ज़ार' ने मला फार 'बेजार' केले. एक तर शब्द नीट समजत नसे, समजला तर त्याचा अर्थ कोणाला विचारावा हा प्रश्न समोर असे. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी डॉ. ज़रीना सानी व डॉ. विनय वाईकरांनी लिहिलेला 'आईना-ए-ग़ज़ल' हा उर्दू शब्दकोश माझ्या हाती लागला नि त्या कोशात ज़ार-ज़ार म्हणजे हमसून-हमसून रडणे, असा अर्थ सापडला

हिंदी चित्रपटगीतांचा मी जेव्हा-जेव्हा विचार करतो तेव्हा-तेव्हा त्या गीतांमधली सौंदर्यस्थळेच नेमकी माझ्या लक्षात राहतात. माझं लहानपण घरच्यांच्या चोरून चित्रपट पाहण्यातच गेलं, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. अकोल्याला रत्नाकरांच्या वाड्यात मी राहत होतो त्यावेळी आमचे घरमालक नानासाहेब रत्नाकर व त्या वाड्यातील दुसरे एक भाडेकरू बंकटलाल सारडा यांचे रेडिओ सतत सुरु असत.

नानासाहेबांच्या रेडिओ वर मराठी भावगीते, भक्तिगीते, नाट्यपदे ऐकू येत तर सारडांच्या रेडिओवर हिंदी चित्रपटगीते सतत सुरु असत. हे दोन्ही रेडिओ बंद असले तर अगरवेसीजवळ असलेल्या 'महाराष्ट्र' हॉटेल मध्ये सुरु असलेल्या रेडिओ वरची हिंदी गाणी माझ्या घरापर्यंत ऐकू येत असत. रेडिओवर गाणे ऐकता-ऐकता किंवा चित्रपट पाहता-पाहता गाण्यातली सौंदर्यस्थळे हेरण्याचा मला एक छंदच लागला म्हणा ना !

काही वेळेस गाण्यातला शब्द जर उर्दू भाषेतला असेल तर त्या शब्दाचा अर्थ हुडकून काढण्याचा मी प्रयत्न करत असे. आणि जो पर्यंत त्या शब्दाचा अर्थ समजत नाही तो पर्यंत मनाला एक अस्वस्थता जाणवत राही. उदाहरणार्थ 

पास आइये, कि हम नहीं आएंगे बार-बार
बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार
आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

यातल्या 'ज़ार-ज़ार' ने मला फार 'बेजार' केले. एक तर शब्द नीट समजत नसे, समजला तर त्याचा अर्थ कोणाला विचारावा हा प्रश्न समोर असे. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी डॉ. ज़रीना सानी व डॉ. विनय वाईकरांनी लिहिलेला 'आईना-ए-ग़ज़ल' हा उर्दू शब्दकोश माझ्या हाती लागला नि त्या कोशात ज़ार-ज़ार म्हणजे हमसून-हमसून रडणे, असा अर्थ सापडला तेव्हा कुठे जीवाला थोडी चैन पडली. खरं म्हणजे डॉ. विनय वाईकर देसाईगंजला 'रक्तरंग' या त्यांच्या युद्ध कथाकथनाच्या निमित्ताने माझ्याकडे आले होते नि तेव्हाच त्यांना ज़ार-ज़ार या शब्दाचा अर्थ विचारता आला असता; पण तेव्हा ते काही सुचलं नाही, एवढं मात्र खरं.

हिंदी चित्रपटगीतात काही शायरांनी नितांत सुंदर कल्पना वापरून या गीतांमध्ये अप्रतिम सौंदर्यस्थळे निर्माण केली आहेत. १९५४ मध्ये 'परिचय' नावाचा चित्रपट आला होता. त्यात लताचं एक अप्रतिम गाणं होत. त्यातल्या काही ओळी या प्रमाणे -

हम खतावर हैं या हमको बनानेवाला
चाँद के मुखड़े पे भी दाग़ है काला काला
इतनी बरसातें हुई फिर भी वो धोया न गया
जल के दिल खाक़ हुआ आँखों से रोया न गया

त्याचप्रमाणे १९६७ मध्ये 'पालकी' या नावाचा चित्रपट आला होता. त्यात रफी व सुमन कल्याणपूरचं एक सुंदर गाणं शकील बदायूनीने लिहिलं होत. ते असं -

अपनी सूरत को तु ऐ जान-ए-वफ़ा यूँ न छुपा
गर्मी-ए-हुस्न से जल जाये न आँचल तेरा
लग गई आग तो मुझ को ही बुझाना होगा
आज पर्दा है तो कल सामने आना होगा

(आपल्या चेहऱ्याला तू अशा प्रकारे लपवू नकोस. तुझ्या सौंदर्याच्या उष्णतेने तू चेहऱ्यावर घेतलेल्या पदराला कदाचित आग लागेल, असा भावार्थ !)

"हमारी याद आयेगी" या तनूजाची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात मुबारक बेगमचे एक गाणे होते.

कभी तनहाइयों में हमारी याद आएगी
अंधेरे छा रहे होंगे के बिजली कौंध जाएगी

यातला 'कौंध' हा शब्द नीट समजत नसे. मग 'बिजली कौंधना' म्हणजे वीज चमकणे हा अर्थ कालांतराने स्पष्ट झाला. 
१९८५ ला आलेल्या 'गुलामी' या चित्रपटात एक गाणे होते -

जिहाल-ए-मस्की, मकुन-ब-रन्जिश,
बहाल-ए-हिज्रा, बेचारा दिल है 
(सुनाई देती है जिसकी धड़कन , तुम्हारा दिल या हमारा दिल है)

कंसातील ओळी गुलजार यांनी लिहिलेल्या आहेत तर कंसाच्या वरील ओळी पर्शियन भाषेतील असून त्या अमीर खुसरोने लिहिल्या आहेत. त्या ओळींचा अर्थ आहे 
'माझ्या या गरीब हृदयाकडे लक्ष द्या, नि त्या हृदयाकडे वैराच्या भावनेने पाहू नका. बिचाऱ्या हृदयास प्रियेपासून वेगळे होण्याची (हिज्र = जुदाई) जखम झालेली आहे'.

मौसम चित्रपटात गुलजार यांचे आणखी एक गाणे होते.

दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन 
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए

मन पुन्हा सवडीने घालविलेल्या रात्री नि दिवसांना शोधत राहते. एकाच ठिकाणी बसून माझ्या प्रियेचं चिंतन (तसव्वुर-ए-जानाँ) करीत राहते असा अर्थ.

हिंदी चित्रपटगीतांतल्या सौंदर्यस्थळांचा शोध घेत-घेत नि शब्दांचे अर्थ शोधत-शोधत वयाची सहा दशकं केव्हा संपलीत हे काही माझ्या अजून लक्षात आलं नाही. आयुष्याचा शेवटचा प्रवास आता सुरु झाला आहे. त्या आधी होता येईल तेवढी सौंदर्यस्थळे पाहून घ्यायची आहेत नि शब्दांचा शोध घेत-घेत हा प्रवास पूर्णत्वाला न्यायचा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News