शिक्षक बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला, पाहा अशी होणार भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • ३० जुलैपासून कौन्सिलिंग प्रक्रिया; ‘नॉन कपल’ निर्णयाविरोधात बंगळुरात होणार आंदोलन

बेळगाव - अनेक वर्षांनंतर शिक्षक बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या मंगळवार (ता. ३०) पासून कौन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. दुसरीकडे नॉन कपल शिक्षकांची सक्‍तीची बदली करावी, यासाठी बंगळुरात आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आला आहे.

शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर दरवेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते. तसेच कौन्सिलिंगच्या तारखेबाबतही चालढकल सुरू असते. त्यामुळे बदलीसाठी अर्ज दाखल केल्यानंतरही शिक्षकांना कौन्सिलिंगसाठी वाट पाहावी लागते. यंदा १९ जूनपर्यंत शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते. चार दिवसांपूर्वी अर्ज दाखल केलेल्या शिक्षकांची अंतिम यादी जाहीर झाली होती. शिक्षण खात्याकडून या यादीबाबत आक्षेप नोंदविण्याचे आवाहनही केले होते. त्यानुसार काही शिक्षकांनी आक्षेप नोंदविले आहेत. आक्षेप नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर शिक्षकांमधून आता कौन्सिलिंग सुरळीतरीत्या पार पडावे, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत आहे.

पती, पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असतील, तर त्या शिक्षकांना बदलीपासून सूट देण्याच्या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. याबाबत मंगळवारी  जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. 

यावेळी शिक्षक उपस्थित होते. तसेच नॉन कपल शिक्षकांची बदली रद्द करावी, यासाठी बंगळुरात आंदोलन करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे घेतला. मात्र, शिक्षण खात्याने वेळापत्रकाप्रमाणे कौन्सिलिंग प्रक्रिया राबविली जाईल, असे स्पष्ट 
केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News