जादूटोणाविरोधी कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

संजय शिंदे
Tuesday, 9 July 2019

गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूगिरी करणाऱ्या खटाव तालुक्‍यातील कलेढोण येथील पिता-पुत्रांविरुद्ध बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : काहीही श्रम न करता कोणत्या तरी अज्ञानाचा फायदा घेऊन जास्तीतजास्त पैसे मिळवता येतील, या भ्रमापोटी गुप्तधनाच्या गोष्टी जन्माला येतात. एकविसाव्या शतकात आपण आहोत; पण मनाने किती मागच्या काळातच रेंगाळत आहोत, याचेच हे पुरावे. याला पायबंद घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी रुजली पाहिजे. 

गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूगिरी करणाऱ्या खटाव तालुक्‍यातील कलेढोण येथील पिता-पुत्रांविरुद्ध बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांवर जादूटोणाविरोधी कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारने कायद्याची पावले उचलूनही समाजातून अद्याप बुवाबाजीचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत. त्या उलट त्यांचे प्रस्थ वाढतानाच दिसते. त्यामुळे आता भोंदूबाबांना ठेचून काढण्याची जरुरी आहे. 

बुवाबाजी, भानामती, चमत्कार, अंगात येणं या अंधश्रद्धांना थेट विरोध केला पाहिजे. हे केवळ "अंनिस'कडून अपेक्षित न ठेवता सर्व समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे. 

बुवाबाजीचे प्रकार अनेक गावांत उघडकीस आलेत. मात्र, त्यापासून बोध न घेता अजूनही भोंदूबाबांकडून पैशाची लूट, महिलांवर अत्याचाराचे प्रकार घडताना दिसतात. विशेषतः ग्रामीण भागांत भोळ्या भाबड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेक भोंदूंनी आपले प्रस्थ वाढवले आहे. यापूर्वी भोंदूबाबांनी फसवणूक केल्याचे प्रकार घडूनही त्यांचे प्रस्थ कमी झालेले नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांमुळे शहरात त्यांना त्यांचा "धंदा' चालवताना मर्यादा येतात. त्यामुळे बहुतांश भोंदूबाबांनी खेड्याकडे प्रस्थान वाढविण्यास सुरवात केली आहे. अनेक ठिकाणी भोंदूबाबांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यांचे काही हस्तक भोंदूबाबांविषयी खोट्या अफवा पसरवतात. जेणेकरून या बाबांकडे लोक आकर्षित व्हावेत, असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.

सध्याच्या धकाधकीच्या युगात सुख, शांतता मिळवण्यासह आपली समस्या दूर व्हावी, म्हणून बरेच जण अशा भोंदूगिरीवर विश्‍वास ठेवतात. काही गावांमध्ये त्यांना भेटण्यासाठी ठराविक वार ठरलेले आहेत. त्याच दिवशी दूरचे लोक समस्या घेऊन जातात. हजारो रुपये त्यांच्या पायावर ठेवतात. फसवणूक होऊन लुबाडणूक झाली, तरी अशा भोंदूविरुद्ध पोलिसांत जाण्याचे धाडस फारच कमी लोक दाखवतात. समाजात आपली नाचक्की होईल, पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीपोटी काही जण गप्प बसतात. त्यामुळे भोंदूबाबांचे फावते.

त्यातूनच त्यांचे धाडस वाढून पुन्हा फसवणुकीचे प्रकार वाढतात. बुवा- बाबांकडून लैंगिक, शारीरिक, आर्थिक शोषण होऊनही अनेकदा महिला गप्प बसतात. त्यामुळे भोंदूबाबांवर कारवाईसाठी पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यादृष्टीने वेचलेचे यशवंत काटकर व उंबर्डेतील प्रदीप पवार यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. त्यांच्यामुळे असे अनेक गुन्हे उघड झाले. 

राज्यात मांडुळासह कासवाची तस्करी सर्रास होत आहे. विविध ठिकाणी मांडुळांची तस्करी उघड झाली आहे. मांडुळ, कासवामुळे धनाचा लाभ होतो, या भाबड्या आशेपोटी लोक ते बाळगणे व त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार होत आहेत, मात्र ही अंधश्रद्धा कशी फोल आहे, हे सांगण्यासाठी समाजातून व सरकारी पातळीवरून पावले उचलण्याची गरज आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे अशा भोंदूबाबांना पकडण्यासाठी सकारात्मक काम करत आहे. त्याला समाजाने पाठबळ दिले पाहिजे. तरच अशा प्रकारांना पायबंद बसेल; अन्यथा, आज बोरगाव येथे कारवाई झाली, तरी उद्या दुसऱ्या गावांत भोंदूबाबांचे फसवणुकीचे प्रकार चालूच राहतील. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News