विद्यार्थी परिषद निवडणुकांत मतदार संख्येची धास्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • प्रवेशासह परीक्षेपुरतेच हजेरी लावताहेत अनेक विद्यार्थी  

जालना - कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ‘युवा जागर’, तर वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणूक जाहीर झाली आहे. युवक नेतृत्व कौशल्य विकसित होण्यासाठी चांगली बाब आहे; परंतु वरिष्ठ महाविद्यालयांत होणारे प्रत्यक्ष प्रवेश व विद्यार्थी प्रत्यक्ष हजेरी अर्थात मतदार संख्येचे मोठे आव्हान असणार आहे, हे विशेष. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विद्यापीठाच्या निवडणुका २५ वर्षांनंतर होत आहेत. विद्यापीठातगत १५० पेक्षा कमी महाविद्यालये ही अनुदानित आहेत. तर ३५० पेक्षा अधिक महाविद्यालये ही विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित आहेत. सदर महाविद्यालयात मान्यताप्राप्त प्राचार्य व शिक्षकांची पदेच भरलेली नाहीत.

विद्यापीठातील महाविद्यालयाचे हे वास्तव नाकारता येत नाही. असे असले तरी दुसरीकडे भौतिक सुविधांचा प्रश्नही तितकाच गंभीर स्वरूपाचा आहे. वरिष्ठ महाविद्यालयाचे विविध वर्गांचे प्रत्यक्ष प्रवेश अन्‌ विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गातील हजेरी, परीक्षा आणि निकाल या सूत्रात चालणारा कारभार निवडणुकांसाठी महाविद्यालयासमोर आव्हान उभे राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यार्थी मतदारयादी तयार होईल. मतदानासाठी किती विद्यार्थी मतदार येतील मतदान करतील यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेवढे विद्यार्थी येतील तेवढे मतदार असतील. असे निवडणुकीचे स्वरूप असेल. विद्यार्थी हजेरी भरणे, प्रत्यक्ष उपस्थिती असणे आणि मतदानासाठी विद्यार्थी उपस्थिती संख्या कशी वाढविता येईल, अशा विचारात वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन आहे.

महाविद्यालयात प्रवेश अन्‌ फक्त परीक्षा असे अलिखित सूत्र असलेल्या महाविद्यालयासमोर निवडणुका म्हणजे मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया शिक्षणक्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. अनेक वर्षांनंतर महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका होत आहेत. युवक नेतृत्वकौशल्य विकसित होण्यासाठी निवडणुका योग्य असल्याचे डॉ. शशिकांत पाटील यांनी सांगितले. 

विद्यार्थी परिषद निवडणुका नेतृत्वकौशल्यासाठी महत्त्वाच्या आहेत; परंतु अनेक वर्षांपासून विना व कायम विनाअनुदान तत्त्वावर काम करणारे व भौतिक सुविधांचा अभाव असणाऱ्या महाविद्यालयांचे काय, हा प्रश्न आहे.
- डॉ. मारोती तेगमपुरे,
शिक्षणतज्ज्ञ, जालना

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News