सोनुर्लीत विद्यार्थ्यांनी केली शाळेसाठी शेती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • शेतीची उर्वरित कामेही करणार; तांदळाचा वापर होणार पोषण आहारात, पंधरा गुंठ्यात लावणी

सावंतवाडी - सोनुर्ली हायस्कूलने नुकतेच बांधावरची शाळा उपक्रमाचे आयोजन करत विद्यार्थ्यांनी शेतीचे धडे गिरविले. सोनुर्ली माऊली माध्यमिक विद्यालयाच्या शेतीशाळेचे  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, मुलांनी आपल्या शाळेसाठी केलेली स्वतःची शेती होय. यासाठी शाळेने जवळपास असणारी लागवड योग्य पडीक क्षेत्राची निवड केली व त्यासाठी लागणारी भाताची रोपे (तरवा) शाळेच्याच परिसरात तयार केली. त्यानंतर नांगरणी करून सुमारे पंधरा गुंठे क्षेत्रात शिक्षकांच्या व गावातील काही शेतकऱ्यांच्या मदतीने भाताच्या रोपांची लावणी (रोपणी) केली.

या शेतीचा मुख्य उद्देश लागवड योग्य पडीत क्षेत्र लागवडीखाली आणणे व शेतीबद्दल तरुण पिढीमध्ये आवड निर्माण करणे, हे असल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी आडसुळे, कृषि पर्यवेक्षक विजयकुमार वाघमारे, कृषि सहाय्यक यशवंत गव्हाणे, श्रीमती एस. एस. देसाई, श्रीमती पी.पी.सावंत, ग्रामसेवक वामन कुबल यांनी मुलांना रोपणीविषयी मार्गदर्शन केले व श्री पद्धतीने रोपांची लावणी करण्यात आली. शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर, भाऊ गावकर, मुख्याध्यापक संतोष मोर्ये, पी.जी. काकतकर, श्री. सावंत, श्री. तेरसे, श्री. गवंडळकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे कर्मचारी नाईक, राजेंद्र गावकर, संतोष ओटवणेकर, संदीप जाधव, बापू निर्गुण उपस्थित होते. शेतकरी विश्राम नाईक, नाना पालयेकर, दाजी अणावकर, संतोष नाईक, बबन मठकर, मधू मठकर उपस्थित होते. मुलांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News