जमिनीच्या मोबदला प्रकरणी शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा(यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • आंदोलक शेतकऱ्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या एका महिलेचाही समावेश आहे.

अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.पाच) अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकऱ्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या एका महिलेचाही समावेश आहे.

धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग बाळापूर तालुक्यातून गेला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मुरलीधर राऊत (वय ४२, शेळद), मदन हिवरकार (वय ३२, कान्हेरी गवळी),साजिद इक्बाल शे. मोहम्मद (वय ३०, बाळापूर), मो. अफजल गुलाम नबी (वय ३०, बाळापूर) आणि अर्चना टकले (वय ३०, बाळापूर) यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. २०१३ पासून भुसंपादनाची प्रक्रीया आजही सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रिधोरा ते बाळापूर दरम्यानच्या गावातील शेतकऱ्यांचे जमिनी संपादित करण्यात आल्या.

काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त जमीन घेण्यात आली तर मोबदला देतांना जुन्या आणि नव्या दरात तफावत असल्याने शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाला. याची तक्रार या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी, उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांकडे केली आहे.  मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे वाढीव मोबदला मिळण्यासाठी प्रलंबित आहे.

प्रकरणाचा निपटारा लवकर होत नसून तारीख-पे-तारीख देण्यात येत आहे. या प्रकरणी या शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत ४ आॅगस्टपर्यंत निकाल लावण्याची मागणी केली होती. मात्र निकाल न लागल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान सायंकाळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News