शाकाहारीचे महत्त्व सांगणारा; श्रावण मास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

आषाढ संपला आणि शाकाहाराचे महत्त्व सांगणाऱ्या श्रावण मासाचे जोरदार स्वागत होत आहे. साहजिकच विविध हॉटेल्स सज्ज झाली असून, अनेक ठिकाणी श्रावण महोत्सवांचे आयोजन केले जाईल. अनेक शाकाहारी रेसिपीज्‌ची रेलचेल यानिमित्त सर्वत्र राहणार आहे.

आषाढ संपला आणि शाकाहाराचे महत्त्व सांगणाऱ्या श्रावण मासाचे जोरदार स्वागत होत आहे. साहजिकच विविध हॉटेल्स सज्ज झाली असून, अनेक ठिकाणी श्रावण महोत्सवांचे आयोजन केले जाईल. अनेक शाकाहारी रेसिपीज्‌ची रेलचेल यानिमित्त सर्वत्र राहणार आहे.

 श्रावण महिना हा सात्विकतेचा महिना असे म्हटले जाते, जे योग्यच आहे. वर्षभरातील जास्तीत जास्त सण आणि उत्सव हे श्रावण महिन्यातच साजरे केले जातात. त्यामुळे श्रावण महिन्याला मोठे महत्त्व आहे. विशेष म्हणजे या महिन्यातील आपला आहारही वेगळा असतो, जो सात्विकतेशी सुसंगत असतो. 

गोव्यात श्रावण महिना हा बहुतांश लोकांकडून शाकाहारी म्हणून पाळला जातो. शाकाहाराचे महत्त्वही या महिन्यातूनच प्रतीत होते. कारण वर्षभर आपण चमचमीत जेवण घेत आलेलो असतो. पण त्यातून किमान एक महिना तरी आपल्या आहारात वेगळेपण असावे आणि आपल्या आरोग्याला लाभदायक ठरावे म्हणून श्रावण महिन्यातील हा शाकाहार पूर्वापार चालत आला आहे. 

श्रावण महिन्यांत बरीच कुटुंबे शाकाहार पाळतात, तर काही कुटुंबे रोजच्याप्रमाणे शाकाहार आणि मांसाहार असा आपला आहार सुरूच ठेवतात. श्रावण महिन्यात आहाराला जास्त महत्त्व आहे. कारण या महिन्यातील प्रत्येक वार सुवासिनींसाठी वेगळेपण घेऊन येतो. या महिन्यात बरेच उपवास असतात. त्यात दिवसातून एकदा जेवण तर रात्री फळांचा आहार असाही 
प्रकार असतो. 

एरव्ही आपण रविवार हा मांसाहारासाठी योग्य असे मानतो; पण श्रावण महिन्यात रविवारचे पूजन सुवासिनींकडून केले जाते. प्रत्येक रविवार हा वेगळा असतो. त्यात प्रत्येक रविवारसाठी नैवेद्यही वेगवेगळा असतो. या नैवेद्यात भात, डाळ व गूळ एकत्र करून केलेले हाटवल, मुटके, पातोळी आणि पोळा असा वैविध्यपूर्ण पदार्थाचा समावेश असतो. प्रत्येक भागानुसार या नैवेद्यातही विविधता असते, हेही विशेष.

 श्रावण महिन्यातील घरातील जेवणही सात्विकतेला धरूनच असते. मांसाहार पूर्ण वर्ज्य असलेल्या घरात भात, भाजी, डाळ-वरण तर दुपारच्या जेवणात एखादा गोड पदार्थ असतो. श्रावण महिन्यात बऱ्याच घरात एक बुधवार सोडल्यास अन्य वार हे उपवासाचे असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी हलका आहार घेण्याबरोबरच फळांचे सेवनही केले जाते. 

शेवग्याच्या शेंगाच्या पानाची भाजी ही श्रावण महिना लागण्यापूर्वी खावी असा काही कुटुंबात प्रघात आहे. त्यानुसार श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी बऱ्याच घरात ही भाजी केली जाते, कारण श्रावण महिन्यात चतुर्थीपूर्वी ही भाजी खाणे वर्ज्य असते, असे मानले जाते. चतुर्थीला पंचमीच्या दिवशी विविध तऱ्हेच्या किमान १६ भाज्या एकत्र करून त्या शिजवल्या जातात. या भाजीची चवही आगळीवेगळी आणि लज्जतदार अशीच असते.

नागपंचमीच्या दिवशी तर पातोळी हा पदार्थ प्रत्येक घरात शिजवला जातो. हळदीच्या कणिकात लपेटलेले खोबरे आणि गूळ यांचे मिश्रण असा हा प्रकार असतो. पण हा पदार्थ खायला एकदम चविष्ट असाच असतो. 
श्रावण महिना संपला की मग गणेश चतुर्थी येते. त्यामुळे महिनाभर शाकाहारी राहिलेली कुटुंबे गणेश चतुर्थीनंतर पुन्हा एकदा मांसाहाराकडे वळतात. एक महिना शाकाहार हे आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे आहे, जे आरोग्यासाठीही हितकारक असेच आहे. अशा परंरपरांचे जतन व्हायला हवे, असेच आजच्या बदलत्या जगालाही नक्कीच वाटते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल्समध्ये विविधांगी रेसीपीज्‌ चाखायला मिळणार आहेत, हे नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News