विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यातील आदान-प्रदानातून गुणवत्ता शक्‍य - डॉ. देवानंद शिंदे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • विद्यार्थी आणि प्राध्यापकात आदान-प्रदान झाल्यानंतरच विद्यापीठाची गुणवत्ता वाढेल. 
  • कुलगुरुपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. 
  • एक अर्थाने ज्ञानाची एक परिक्रमा पुर्ण झाली, असे मला वाटते.

औरंगाबाद: इन्फ्रास्ट्रक्‍चरने गुणवत्ता वाढत नाही, विद्यार्थी आणि प्राध्यापकात आदान-प्रदान झाल्यानंतरच विद्यापीठाची गुणवत्ता वाढेल. त्यासाठी कुटूंबप्रमुख म्हणून जबाबदारी निभावणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनी सांगितले. सीएचबीबाबत जीआर निघाला आहे, हा प्रश्‍नदेखील लवकरच मार्गी लागेल. असेही ते म्हणाले. 

कुलगुरुपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. शिंदे म्हणाले, देशाचा कारभार संविधानावर त्याप्रमाणे विद्यापीठाचा कारभार महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याप्रमाणे चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. समतेचे पाईक म्हणून ओळखल्या गेलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्मभूमीतील शिवाजी विद्यापीठात तसेच सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठात सेवा करण्याची संधी मला मिळाली. एक अर्थाने ज्ञानाची एक परिक्रमा पुर्ण झाली, असे मला वाटते. विद्यार्थ्यांमध्ये असलेली ज्ञानाची भूक व संवादाच्या माध्यमातून प्रश्न जाणून घेण्याला नेहमीच प्राधान्य राहिल.'' असे ते म्हणाले. 

मानगांव परिषदेचा शतक महोत्सव 
सन 1920 मध्ये मानगाव येथे झालेल्या परिषदेत राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नेते असतील, असे भाकित केले होते, जे खरे ठरले. अशा ऐतिहासिक मानगांव परिषदेच्या शतकमहोत्सवाच्या निमित्त दोन्ही विद्यापीठातर्फे चर्चासत्र, व्याख्यान आयोजन करण्यात येईल, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. 

सीईटी ठरल्याप्रमाणेच होणार 
विद्यापीठाची सीईटी ठरल्याप्रमाणेच होणार आहे. शेड्युलमध्ये कोणताच बदल करु नये, असे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच काही विभागांमध्ये जागा शिल्लक राहिल्यास विभागप्रमुख कुलगुरुंची परवानगी घेऊन विभागापुरती नव्याने सीईटी घेऊन जागा भरतील. असे डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News