समतेच्या शिकवणीचा अनोखा सोहळा 'वारी'

लक्ष्मण जगताप, बारामती
Friday, 12 July 2019

पाऊले चालती पंढरीची वाट 
सुखी संसाराची सोडूनिया गाठ

आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो पाऊले पंढरीच्या दिशेने चालत असतात. मनात आस एकच विठूरायाला भेटण्याची, कशाचीही तमा न बाळगता व चिंता न करता लाखो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आत्मिक समाधान मिळवत असतात. 

जाती-पाती, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत, लहान मोठा या पलीकडे जाऊन परोपकार, दया, सेवा, क्षमा, शांती, प्रेम, माया या मानवी जीवनातील सर्वोच्च मूल्यांचा अनुभूती मिळणारा हा नेञदीपक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा.
 
ज्ञानोबा.. - माऊली.. तुकाराम'च्या जयघोषात चालणाऱ्या शिस्तबद्ध दिंड्या पाहून वारीचे माहात्म्य लक्षात येते. दुःखाचा विसर पडणारा आणि भरभरुन आनंद मिळणारा असा हा सोहळा, अभंग, भजनात तल्लीन होणारे वारकरी पाहिल्यानंतर वारी म्हणजे काय प्रत्यक्ष अनुभवल्यावर  लक्षात येते. 

काटेवाडी ते सणसर पर्यंत जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीत एका दिंडी समवेत आम्ही मित्र मंडळी चालत होतो. हातात टाळ, डोक्यावर टोपी, कपाळी गंध, हातात पताका, पखवाजाचा तो सुंदर नाद... मुखी विठूरायाचे नाम, भजन अभंगचा मधुर व गोड स्वर, त्यांचा तो आनंदी चेहरा पाहून जगण्यातील खरी श्रीमंती काय असते हे आम्ही पाहत होतो. वारी सर्वांना आपल्यात सामावून घेते आणि मानवतेची शिकवण देते. 

संतांनी दिलेल्या समतेच्या शिकवणीचा अनोखा सोहळा म्हणजे वारी. आजच्या बदलत्या जीवनशैलीत मानसिक समाधान मिळणे दुरापस्त होत आहे, अशा वेळी वारीच सर्व दुःखाची तारणहार आहे. वारीत पायी चालताना ना कंटाळा येतो ना थकवा, सतत चालतच राहावे असे वाटत होते.

 लाखो वारकरी या सोहळ्यात चालताना स्वतःला विसरून जातात. देहभान हरपून विठूनामाचा गजर करत पुढे जात असताना आम्हांलाही हे अनुभवयाला मिळण्याचे भाग्य लाभले. या आनंदात आम्ही पालखीचा मुक्कामी निरोप घेतला तो... नवचैतन्य घेऊनच... वारीत गेल्या वर्षी मिळालेली ऊर्जा आजही... जगण्याला तितकीच उभारी देते... 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News