शिक्षण’चा भार कर्मचार्‍यांच्या खांद्यावर 

समीर मगरे
Sunday, 7 July 2019

प्रशासनाने फिरविली पाठ; दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा 

यवतमाळ - शिक्षणाची जबाबदारी असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागाला मागील काही वर्षांपासून सादिलाचा निधीच मिळाला नाही. परिणामी लहान-सहान खर्च कर्मचार्‍यांना स्वतःच्या खिशातूनच करावा लागत आहे. शिक्षण विभागाकडून वारंवार प्रशासनाकडे मागणीदेखील करण्यात आली. मात्र, तरीदेखील यावर अद्याप तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या खर्चाचा भार कर्मचार्‍यांच्या खांद्यावरच आलेला आहे.

ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाचा गंगा पोहोचविण्याचा विडा प्राथमिक शिक्षण विभागाने उचला आहे. याशिवाय कामसुद्धा शिक्षण विभागच करीत आहे. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागात रोज खासगी कामाकरिता नागरिक येतात. शिवाय शिक्षण समितीची सभासुद्धा घेण्यात येते. यासाठी इतिवृत्त तयार करणे व त्याचे झेरॉक्स काढण्याकरितासुद्धा शासनाकडून कोणताही निधी येत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांना स्वतःच्या खिशातूनच खर्च करावा लागतो. त्याचबरोबर शिक्षण विभागामार्फत चालणार्‍या योजनांची माहिती ही ‘माहिती अधिकारा’अंतर्गत मागविण्यात येते. संबंधितांना माहिती पुरविण्यासाठी काढण्यात येणार्‍या झेरॉक्ससुद्धा कर्मचार्‍यांना करावा लागते. त्याचबरोबर शिक्षण विभागातील इतर टेशनरीसुद्धा कर्मचार्‍यांना खरेदी करावी लागते. यासंदर्भात वारंवार कर्मचार्‍यांनी वरिष्ठांकडे निधीची मागणी केली आहे. तरीदेखील अद्याप यावर काही तोडगा काढण्यात आला नसून, केवळ लवकरच निधी उपलब्ध होईल, असे आश्‍वासन कर्मचार्‍यांना देण्यात येतो. मात्र, कर्मचार्‍यांचे वेतनातून हा खर्च करावा लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. 

प्राथमिक शिक्षण विभागाला सादिलचा निधी मिळत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांना याचा फटका सहन करावा लागतो. यासंदर्भात शिक्षण समितीच्या सभेतदेखील प्रश्‍न उपस्थित करण्यात आला असून, शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, याकरिता पाठपुरावा करू.
- स्वाती येंडे, सदस्य, शिक्षण समिती तथा जिल्हा परिषद.

आंदोलनाच्या तयारीत
लवकरच सादिलचा खर्च मिळाला नाही, तर प्राथमिक शिक्षण विभागातील सर्वच कर्मचारी आंदोलन पुकारणार आहेत. दरम्यान, निधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी जलज़ शर्मा यांच्याकडे करण्यात येणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News