परदेशी विद्यापीठांमधील नामवंत चेहरे

प्रथमेश आडविलकर
Monday, 17 June 2019
  • संशोधनाबद्दल असलेली आत्मीयता, शैक्षणिक उत्कृष्टता आणि पारंपरिक विद्वत्तापूर्ण मूल्यांमुळे परदेशी विद्यापीठांच्या गुणवत्तेबद्दल एक विशेष आकर्षण आहे.
  • नेमक्‍या याच कारणामुळे परदेशी विद्यापीठांमधून जागतिक कीर्तीचे बुद्धिवंत तयार होतात. विविध विषयातील नोबेल विजेते, महान शास्त्रज्ञ, द्रष्टे उद्योजक आणि जगाला कलाटणी देणाऱ्या अनेक नामवंतांच्या उज्ज्वल कारकिर्दीची पायाभरणी त्यांच्या विद्यापीठीय शिक्षणादरम्यान झालेली आहे.

केम्ब्रिज विद्यापीठ हे दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनामुळे जगभरातील बुद्धिवंत आणि प्रतिभावंतांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. या विद्यापीठाने अनेक ख्यातनाम राजकारणी, वकील, तत्त्वज्ञ, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ, गणितज्ञ; तसेच शास्त्रज्ञ निर्माण केले आहेत. प्रख्यात शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन,  स्टीफन हॉकिंग्ज, क्रीक वॅट्‌सन, अर्नेस्ट रदरफोर्ड, जे. जे. थॉमसन, जेम्स चाडविक यांसारख्या महान संशोधकांपासून ते लॉर्ड बायरन, ख्रिस्तोफर मार्लो, थॉमस नॅश ते अगदी अलीकडील सलमान रश्‍दी यांसारख्या साहित्यिकांचा समावेश आहे. इंग्लंडचे पंधरा माजी पंतप्रधान या विद्यापीठाचे विद्यार्थी होते. जगातील विविध देशांचे नेतृत्व ज्यांनी केले आहे किंवा करताहेत, त्यापैकी बहुतेक नेते या विद्यापीठांमध्ये शिकले आहेत. आतापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, विद्यापीठातील एकूण ११८ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आणि सहा ट्युरिंग पुरस्कारविजेते आहेत. 

राजघराण्याची असलेली आर्थिक मदत व मौलिक मार्गदर्शनामुळे इम्पीरियल कॉलेज विद्यापीठ हे नेहमीच वलयांकित राहिलेले आहे. विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व संशोधनामुळे हे विद्यापीठ जगभरातील कुशाग्र विद्यार्थ्यांना आकर्षित करते. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध लेखक, कलाकार आणि शास्त्रज्ञ घडवले आहेत. महान शास्त्रज्ञ अलेक्‍झांडर फ्लेमिंग, साहित्यिक एच. जी. वेल्स यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या विद्यापीठातील एकूण १४ माजी विद्यार्थी व प्राध्यापक नोबेल पारितोषिकविजेते आणि एक ट्युरिंग पुरस्कारविजेते आहेत. 

शिकागो विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. जगविख्यात अर्थतज्ज्ञ फ्रीडमन, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, ओरॅकलचे संस्थापक-संचालक लॅरी एलिसन यांच्यासह उद्योगजगतातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांनी काही काळ शिकागो विद्यापीठात अध्यापन केले आहे. ऑक्‍टोबर २०१८ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंतचे एकूण ९८ नोबेल पारितोषिकविजेते आणि चार ट्युरिंग पुरस्कारविजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक आहेत. 

भारत, केनिया, मॉरिशस, घाना, जपान आणि नायजेरिया या देशांचे स्वातंत्र्यलढ्यातील नेते हे यूसीएलचे माजी विद्यार्थी आहेत. जगाच्या नकाशावर ठसा उमटवणाऱ्या अनेक व्यक्ती या विद्यापीठामध्ये कधीकाळी आपले शिक्षण पूर्ण करत होत्या आणि त्यांच्या एकूण वाटचालीमध्ये यूसीएलचा खारीचा वाटा निश्‍चितच असणार. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, टेलिफोनचा जनक  ग्रॅहम बेल, ओट्टो हॅन, पीटर हिग्ज, फ्रान्सिस क्रीक हे यूसीलएलचे माजी विद्यार्थी आहेत. यूसीएल विद्यापीठ हेदेखील शिक्षणासाठी जगभरातील सर्व बुद्धिवंत आणि प्रतिभावंतांसाठी नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तत्त्वज्ञ, लेखक, कलाकार आणि शास्त्रज्ञ निर्माण केले आहेत. आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार, विद्यापीठातील एकूण ३३ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिकविजेते आहेत.

सिंगापूरचे चार पंतप्रधान व दोन राष्ट्रपती हे एनएसयू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक आणि शास्त्रज्ञ निर्माण केले आहेत. संशोधनासाठी हे विद्यापीठ जागतिक पातळीवर नावाजलेले आहे. विद्यापीठाकडून संशोधन क्षेत्रावर प्रचंड गुंतवणूक केली जाते. एनयूएसमधील प्रमुख संशोधन हे जैववैद्यकीय, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र,अभियांत्रिकी, नॅनोसायन्स, नॅनो टेक्‍नॉलॉजी, इन्फोकम्युनिकेशन, इन्फोटेक्‍नॉलॉजी आणि संरक्षण या क्षेत्रातील संशोधन आहे. 

सिंगापूरचे अनेक ख्यातनाम राजकारणी व उद्योजक हे एनटीयू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तंत्रज्ञ व प्राध्यापक तयार केलेले आहेत. एनटीयूमध्ये अध्यापन करणारे अनेक प्राध्यापक हे त्यांच्या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. विद्यापीठाचे नानयांग बिझनेस स्कूल हे आशियातील एक अग्रगण्य बी-स्कूल म्हणून नावारूपास येत आहे. 

प्रिन्सटन विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाच्या पलीकडे हितसंबंध ठेवण्यासाठी संधी दिली जाते. यामध्ये मग एखाद्या साहित्यिक प्रकाशनासाठी लेखन करणे, मधमाश्‍या पाळण्याचे शास्त्र विज्ञान शिकणे, किंवा कॅपेला गटांमध्ये गायन करणे आदी बाबींचा समावेश होतो. प्रिन्सटनच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व जेम्स मॅडिसन; तसेच ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या माजी ‘फर्स्ट लेडी’ मिशेल ओबामा यादेखील याच विद्यापीठाच्या विद्यार्थी आहेत.  ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंतचे एकूण ६५ नोबेल पारितोषिकविजेते आणि तेरा ट्युरिंग पुरस्कारविजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News