#election2019 बीड जिल्ह्याचा राजकीय आढावा आणि ग्रामीण परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 October 2019
  • आतापर्यंतच्या १३ वेळाच्या लढतीत आठ वेळा पंडित तर तीन वेळा पवारांनी या मतदार संघाचे प्रतिधित्व केले आहे.

मतदार संघानुसार

परळी : पुर्वीचा रेणापूर आणि आताचा परळी मतदार संघ हा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे राज्यभर ओळखला जातो. येथून दिवंगत मुंडेंनी पाच वेळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. तर मागच्या दोन वेळेपासून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या मतदार संघाच्या आमदार आहेत. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता. यावेळीही या दोघांत लढत होत आहे. परळी - अंबाजोगाई रस्ता व परळी शहराचा पाणी प्रश्न या प्रमुख समस्या आहेत.

केज : जिल्ह्यातील अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघातून दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांनी १९९० ते २००९ असे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी नऊ वर्षे मंत्री म्हणून काम केले. सलग पाच वेळा निवडणुक जिंकण्याचा जिल्ह्यातील विक्रम त्यांच्याच नावे आहे. या मतदार संघातून जेष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांचा बाबूराव आडसकर यांनी केलेला पराभव त्या काळात राज्यभर एव्हाना देशभर गाजला. मतदार संघात भाजप नेते रमेश आडसकर यांचीही निर्णायक ताकद आहे. सध्या भाजपच्या ठोंबरे येथून आमदार आहेत. मतदार संघातून जाणाऱ्या अहमदनगर - अहमदपूर या रस्त्याचे धिम्म्या गतीचे काम, पिक विमा, ग्रामीण भागातील रस्ते या प्रमुख समस्या आहेत.

गेवराई : आतापर्यंतच्या १३ वेळाच्या लढतीत आठ वेळा पंडित तर तीन वेळा पवारांनी या मतदार संघाचे प्रतिधित्व केले आहे. त्यातले चार वेळा पंडित विरुद्ध पंडित अशाच या मतदार संघातून लढती झाल्या. जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांनी मतदार संघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व करत मंत्रीपद सांभाळले. तर, बदामराव पंडित यांनीही राज्यमंत्री म्हणून काम केले. आता भाजपचे पवार आमदार आहेत. ग्रामीण भागातील रस्ते आणि दुषित पाणी ही मतदार संघाची प्रमुख समस्या आहे.

माजलगाव : या मतदार संघातून विजयी झालेले दिवंगत सुंदरराव सोळंके हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते. तर, उपमुख्यमंत्रीपदावर असताना त्यांचा गोविंदराव डकांनी केलेला पराभाची देखील राज्यभर चर्चा झाली होती. प्रकाश सोळंके यांची मतदार संघात कारखाना व इतर संस्थेच्या माध्यमातून बांधणी असून सामाजिक समिकरणात भाजपसाठीही जमेची बाजू आहे. माजलगाव शहराचा पाणी, बसस्थानकाच्या प्रश्नासह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्या आहेत.

बीड : युतीमध्ये एकमेव शिवसेनेचा हा मतदार संघ आहे. येथून शिवसेनेने यापूर्वी तीन वेळा आमदार दिले असून पक्षाने सुरेश नवले यांना मंत्रीपद दिले. आता पक्षात प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही पक्षाने मंत्रीपद दिले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीने संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काका पुतणे अशी लढत तर होणारच आहे. शिवाय महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे देखील येथून इच्छुक आहेत. शहरांतर्गत रस्ते, नाल्या व ग्रामीण भागातील रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ह्या समस्या आहेत

आष्टी : मतदार संघातून सध्या भाजपचे भीमराव धोंडे आमदार असून भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांचीही मतदार संघात निर्णायक ताकद आहे. ही जागा आघाडीत राष्ट्रवादी कि काँग्रेस हे अस्पष्ट आहे. परंतु, धोंडेंच्या उमेदवारीला धसांनी विरोध केला आहे. त्यांचे पुत्र जयदत्त धस येथून इच्छुक आहेत. ग्रामीण भागातील पाणी व रस्ते हे प्रमुख प्रश्न आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News