पाणी वाचविणे हाच प्रभावी उपाय - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला "मन कि बात"च्या दुसऱ्या पर्वातून संवाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • जलसंरक्षण ही लोकचळवळ बनवूया
  • पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
  • आकाशवाणीवरून ‘मन की बात’ पुन्हा सुरू

नवी दिल्ली : ‘‘देशातील अनेक राज्यांत भीषण दुष्काळ आहे. आगामी काळात उग्र होऊ पाहणाऱ्या जलसंकटावर मात करण्यासाठी पाणी वाचविणे हाच प्रभावी उपाय आहे. यंदाच्या पावसाळ्यात जलसंवर्धनाचा निर्धार करून स्वच्छतेप्रमाणेच जलसंरक्षण ही लोकचळवळ बनवूया,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आकाशवाणीच्या ‘मन की बात’च्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात मोदींनी विविध विषयांवर मते मांडतानाच, या रेडिओ भाषणाला दिलेला अल्पविराम मलाही अस्वस्थ करणारा होता, अशी भावना मांडली.

मोदींच्या करिष्म्यामुळे भाजपने दुसऱ्यांदा दणदणीत बहुमताने दिल्लीचे तख्त काबीज केल्यावर पंतप्रधानांच्या या पहिल्याच ‘मन की बात’ची सत्तारूढ पक्षाने दणकून प्रसिद्धी केली व याच्या सामुदायिक श्रवणाचीही व्यवस्था केली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीच्या द्वारका भागात पक्षकार्यकर्त्यांसह ‘मन की बात’चे सामूहिक श्रवण केले.

पंतप्रधान म्हणाले, ‘‘मी फेब्रुवारीत या संवाद सत्राला अल्पविराम देताना, तीन-चार महिन्यांनी पुन्हा भेटू, असे सांगितले होते तेव्हा लोकांनी त्याचे राजकीय अर्थ काढले. कोणाला तो माझा अतिआत्मविश्‍वास वाटला. पण, हा विश्‍वास मला तुम्हीच दिला होता. पहिल्या कार्यकाळात मी ५३ वेळा तुमच्याशी माझ्या मनातील गोष्टी बोललो होतो. आता पुन्हा एकदा संवादाचा सिलसिला सुरू झाला, याचा मला जास्त आनंद आहे.’’

जलसंवर्धनाचे आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, ‘‘आपल्या देशातील बहुतांश भागांत वर्षभर पाणीटंचाई भेडसावते. पावसाचे जे पाणी मिळते त्यातील केवळ आठ टक्के साठविले जाते. हे पाणी जास्तीत जास्त वाचविण्याची गरज असून, मी देशातील सर्व सरपंचांना लिहिलेल्या पत्रातही हे सांगितले आहे. त्यासाठी लोकचळवळ निर्माण व्हावी. पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठीच सरकारने वेगळे जलशक्ती मंत्रालय बनविले आहे. तुम्हाला मी तीन गोष्टी सांगू इच्छितो

१) देशवासीयांनी जसे स्वच्छतेला लोकचळवळ बनविले, तसेच जल संरक्षणालाही जनचळवळ बनवू या. पाणी वाचविण्यासाठी मेहनत करा.

२) जलसंरक्षणासाठी आमच्याकडे पारंपरिक पद्धतीच वापरल्या जातात. पोरबंदरला एक कीर्तिमंदिर आहे. तेथे २०० वर्षे जुन्या टाकीत पाणी साठविले जाते व पावसाचे पाणी थांबविण्याचीही सोय तेथे आहे. अशा नव्या प्रयोगांची माहिती मला पाठवा.

३) तुमच्या सूचनांचा ‘डेटाबेस’ तयार करण्यासाठी  # जलशक्ती यावर त्या सूचना पाठवा.’’

मोदी म्हणाले :
लोकशाहीत नागरिकांचे अधिकार काय असतात, हे तेव्हाच समजते जेव्हा ते हिरावून घेतले जातात. यामुळेच आणीबाणीनंतर लोकांना लोकशाहीच्या रक्षणाची किंमत समजली.

ज्या देशातील लोक पंतप्रधानाला ‘मन की बात’साठी पत्रे लिहितात व स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, त्या देशाच्या १३० कोटी जनतेच्या भावना किती उच्च स्तरावरील असतील, याची कल्पना करा. तुमची पत्रे-ई मेल मला नवी ऊर्जा देतात.

या निवडणुकीतही भारतीयांनी लोकशाही मजबूत करण्यासाठीच कौल दिला. तब्बल ६१ कोटी लोकांनी मतदान केले. अनेकांनी मला विचारले की मतदान झाल्यानंतर तुम्ही केदारनाथला का गेला होतात ? मी अंतःप्रेरणेने तिकडे गेलो. मी स्वतःचीच भेट घ्यायला त्या शांततेत गेलो होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News