शिक्षणाधिकाऱ्यांवर आली तीन किलोमीटर चिखल तुडवण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

इगतपुरी : गुडघाभर पाणी, रेल्वेरूळावरून काही अंतराचा प्रवास... चिखल, साचलेला गाळ असा तीन किलोमीटर अंतर सोमवारी (ता. ५) पार करीत विद्यार्थिनींना मायेची उब देण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पोचल्या. रविवार (ता. ४)पासून झालेल्या हालापेष्टांची माहिती जाणून येथे विद्यार्थिनींना मायेची उब, तर शिक्षिकांना धीर दिला.  

इगतपुरी : गुडघाभर पाणी, रेल्वेरूळावरून काही अंतराचा प्रवास... चिखल, साचलेला गाळ असा तीन किलोमीटर अंतर सोमवारी (ता. ५) पार करीत विद्यार्थिनींना मायेची उब देण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पोचल्या. रविवार (ता. ४)पासून झालेल्या हालापेष्टांची माहिती जाणून येथे विद्यार्थिनींना मायेची उब, तर शिक्षिकांना धीर दिला.  

इगतपुरी तालुक्‍यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा पोच रस्ता पुरात वाहून गेल्याने विद्यालयाचा संपर्क रविवार (ता. ४)पासून तुटला होता. परिणामी, शाळेत भाजीपाला, सिलिंडर, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधेचा प्रश्‍न उद्‌भवला. शिक्षण विस्ताराधिकारी राजेंद्र नेरे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर- वीर यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. डॉ. झनकर यांनी सोमवारी (ता. ५) हातातील काम सोडून तत्काळ कस्तुरबा गांधी विद्यालयाचा मार्ग धरला.

मुंबई- आग्रा महामार्गावरील जिंदाल कंपनीपासून शाळेपर्यंत सुमारे तीन किलोमीटर चिखल, गाळ तुडवत प्रसंगी गुडघाभर पाण्यातून व रेल्वेरूळावरून चालत शाळेत पोचल्या. रविवारपासून घाबरलेल्या विद्यार्थिनींची वैयक्तिक भेट घेत नैसर्गिक आपत्तीला तुम्ही सर्वांनी ज्याप्रकारे तोंड दिले हेसुद्धा वाखाणण्याजोगे आहे, अशी मायेची साद घालत धीर दिला.

समस्यांचे तत्काळ निवारण :
श्रीमती झनकर यांनी विचारपूस केल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत वस्तुस्थिती कथन करीत समस्या सोडविण्याची विनंती केली. तसेच एवढ्यावरच न थांबता तत्काळ तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दूरध्वनीवरून सूचना देऊन पोच रस्त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी इगतपुरी शिक्षण विभागातील शिक्षण विस्ताराधिकारी कैलास सांगळे, राजेंद्र नेरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुनील दराडे आदी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News