लेकीसाठीचं कर्तव्य...

संदीप काळे
Sunday, 21 July 2019

‘लेक शाळेत पाठवा’ ही मोहीम डॉ. सविता गिरे पाटील आणि त्यांची टीम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर राबवते. मुलींना शाळेपर्यंत पोचवण्यासाठीची ही मोहीम आहे. महिलांच्या आणि सोबत काम करणाऱ्या स्वयंसेविकांच्या समुपदेशनाचं काम या मोहिमेंतर्गत आठवड्यातून दोन दिवस केलं जातं. सातारा जिल्ह्यात वाकेश्वर इथं असं समुपदेशन केलं जात असताना.

‘लेक शाळेत पाठवा’ ही मोहीम डॉ. सविता गिरे पाटील आणि त्यांची टीम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर राबवते. मुलींना शाळेपर्यंत पोचवण्यासाठीची ही मोहीम आहे. महिलांच्या आणि सोबत काम करणाऱ्या स्वयंसेविकांच्या समुपदेशनाचं काम या मोहिमेंतर्गत आठवड्यातून दोन दिवस केलं जातं. सातारा जिल्ह्यात वाकेश्वर इथं असं समुपदेशन केलं जात असताना.

डॉ. सविता गिरे पाटील यांच्यापुढं आदर्श होता तो त्यांच्या वडिलांचा. गावात सगळ्यांचा विरोध असतानाही वडिलांनी सविता यांना शाळेत पाठवलं. शिकवलं. मोठं केलं आणि तिथूनच ‘लेक शाळेत पाठवा’ ही चळवळ सुरू झाली. 

सा   तारा जिल्ह्यातली एक बातमी वाचत होतो. ग्रामीण भागातल्या मुलींच्या वडिलांची जी मानसिकता असते तिच्याविषयी बातमीत खूप विस्तारानं लिहिलेलं होतं. मुलींना शिकवण्याबद्दलची वडिलांची मानसिकता अजूनही बदललेली नाही, अशा आशयाची ती बातमी होती आणि त्याच बातमीत प्रा. डॉ. सविता गिरे पाटील (संपर्कक्रमांक : ७२४-९१५५४५८, मेल आयडी: ssavitagire@gmail.com) यांच्या ‘लेक शाळेत पाठवा’ या मोहिमेविषयीचा ठळक उल्लेख होता. त्याच बातमीत काही बोलक्‍या प्रतिक्रियाही होत्या. आपली मुलगी शिकली पाहिजे तरच तिची आणि येणाऱ्या पिढीची प्रगती होऊ शकेल, हे मुलींच्या वडिलांना जाणवलं असल्याचं त्या प्रतिक्रियांच्या एकूण सारांशावरून वाटत होतं. बातमीच्या खोलात जेव्हा शिरलो तेव्हा कळलं की ही चळवळ फक्त आपल्या राज्यासाठी नव्हे; तर देशासाठीही खूप गरजेची आहे आणि हे कामही त्याच गतीनं सुरू आहे. आपल्या राज्यापुरता विचार केला तर गावकुसात राहणाऱ्या मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांच्या वडिलांची मानसिकता ‘आपल्या कन्येला शिकवावं’ अशी अजिबात नाही. सविता यांनी राज्यभर  केलेल्या कामाविषयीही त्या बातमीत विस्तृतपणे लिहिण्यात आलं होतं. या कामाविषयीची माझी उत्सुकता आता अधिक वाढली होती.  सविता या माझ्यासाठी अनोळखी नव्हत्याच. शिक्षणक्षेत्रातल्या आणि साहित्यक्षेत्रातल्या त्यांच्या कामाविषयी मला सखोल माहिती होती. 

साताऱ्याला जाणाऱ्या बसमध्ये एके दिवशी बसलो आणि साताऱ्याजवळच्या वडूजला पोचलो. हा भाग तसा बऱ्यापैकी मागासलेला म्हणावा लागेल. म्हणायला पश्‍चिम महाराष्ट्र; पण मोठ्या अडचणींचा सामना या भागातल्या लोकांना करावा लागतो हेही तेवढंच खरं. पाणी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न इथं जरा गंभीरच होते. दादासाहेब जोतीराम गोडसे म्हणजे या भागात सर्वांना परिचित असणारे अण्णा. त्यांनी या पंचक्रोशीत शिक्षणासाठी पुढाकार घेतला नसता तर इथलं शैक्षणिक वातावरण चिंताजनक राहिलं असतं. अण्णांनी या भागात शिक्षणाचा आधारवड उभा केला आहे. त्याचा परिणाम इथल्या शिक्षणपद्धतीवर नक्कीच झाला आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींची संख्या या भागात तशी फार कमी होती; पण हल्ली ही संख्या खूप वाढली आहे आणि परिणामी, मुलगा आणि मुलगी या दोघांची समान आकडेवारी आता पुढं आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत या भागात मुलींच्या शिक्षणासंदर्भातली परिस्थिती काही वेगळी होती का? हा जो बदल झाला, त्याची कारणं काय आहेत? या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी मी वडूजला गेलो होतो. 

सविता आणि त्यांच्या टीमला भेटलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की या सगळ्या बदलामागं या सर्वांनी उभी केलेली चळवळ आहे. वडूज परिसरातल्या वाकेश्वर, नाईकांची वाडी, गणेशवाडी, मांडवी अशा एकाच रस्त्यावर असणाऱ्या काही गावांना आम्ही भेट दिली. अनेक मुलींचे वडील आम्हाला या गावात भेटले. एक-दोन पालकांशी मी आवर्जून बोललो. 

महाराष्ट्रात मुलींचं शिक्षण वाढवायचं असेल तर मुलींचं नव्हे तर मुलींच्या वडिलांचं समुपदेशन करावं लागेल,  त्यांना ‘मुलगा-मुलगी समानता’ शिकवावी लागेल असं माझ्या लक्षात त्या पालकांशी बोलल्यानंतर आलं. याच भेटी-गाठींच्या प्रवासात तुकाराम साळवे नावाच्या पालकांनी मला दिलेली प्रतिक्रिया खूपच महत्त्वाची वाटली. ते म्हणाले : ‘‘आम्ही अज्ञानी होतो म्हणून मुली अज्ञानी आहेत. आम्हाला कुणीतरी सांगितलं तेव्हा आमचे डोळे उघडले आणि आता आमच्या मुली काळाच्या पुढं पाऊल टाकत आहेत.’’
आपली कैफियत मांडणाऱ्या या तुकाराम यांना सहा मुली! 

ते पुढं म्हणाले : ‘‘दिवसभर रोज-मजुरी करायची आणि संध्याकाळी त्याच काम केलेल्या कष्टावर आपल्या कुटुंबासाठी चूल पेटवायची. दोन मुलींची लग्नं तेराव्या वर्षीच झाली. दोन मुली आमच्यासोबत कष्टाचं काम करायच्या आणि दोन मुली घरीच असायच्या. सविताबाईंचा गावात एक कार्यक्रम झाला. ‘तुमची मुलगी शिकली पाहिजे आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक मुलीला शाळेत पाठवावं,’ असा त्या कार्यक्रमाचा मथितार्थ होता. आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम ऐकला. ‘मुलींना शिकवलं पाहिजे,’ असा निदान विचार तरी आम्ही त्या कार्यक्रमानंतर करू लागलो. सविताबाई परत पुढच्या रविवारीही आल्या. सोबत गावातल्या शाळेतल्या गुरुजींनाही घेऊन आल्या. गुरुजींनी विनंती केली, ‘तुमच्या मुलींना शाळेत पाठवा. मी मदत करतो.’ मी सरळ नकार दिला. माझ्या मुलींना शाळेत पाठवून मी खायचं काय, माझ्या घरकामात मदत कोण करील आणि शिकून मुली करणार तरी काय, असे अनेक प्रश्न मी त्यांना दुसऱ्या भेटीत केले होते. आमच्या गावातल्या अनेक मुलींना शाळेपर्यंत नेण्यास सविताबाईंना तिसऱ्या भेटीत चांगलं यश आलं. जाता जाता सविताबाई माझ्या घरी आल्या. माझा हात हातात घेऊन म्हणाल्या : ‘तुमच्या या मुली  मुलांपेक्षा काही कमी नाहीत. त्यांना थोडंसं समजून घ्या. थोडी तुमची मानसिकताही बदला. मला तुमची सातवी मुलगी समजा आणि माझं ऐका...मी तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे. फक्त तुम्ही मुलींना एकदा शाळेत पाठवा.’ 

आम्ही पती-पत्नीनं पूर्वी पाहिलेलं स्वप्न सविताबाईंच्या बोलण्यानंतर मला पुन्हा आठवलं. ते स्वप्न होतं ‘मुलगा असावा’ या हट्टाचं. मुलगा होईल या आशेनं माझ्या बायकोनं सहा मुलींना जन्म दिला. सहाव्या बाळंतपणात बायको गेली आणि आईचं व वडिलाचं असं दोघांचंही काम माझ्यावर पडलं. तरीही मुलाबद्दलचं तिचं स्वप्न मला आठवतंच होतं. कारण, ‘वंशाला दिवा’ मिळाला पाहिजे, हे माझ्या आईचं वाक्‍य सतत आजही माझ्या कानात घुमत असतं. मात्र, सविताबाई आल्या आणि मला जागं करून गेल्या.‘तुमच्या मुली मुलांपेक्षा कमी नाहीत,’ या वाक्यानं मी जागा झालो. सविताबाईंचं ते वाक्‍य मला सतत आठवत राहिलं. दोन-चार दिवस खूप विचार करून मी माझ्या मुलींना शाळेत पाठवलं. आता दोन्ही मुली सातवीत आहेत. त्या चांगल्या शिकतील, चांगलं नाव कमावतील याची मला खात्री आहे.’’

हे काम एका ‘तुकारामां’पुरतं मर्यादित नव्हतं. महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांत अशी अनेक गावं आणि अनेक ‘तुकाराम’ आहेत, ज्यांना आपल्या मुलींनी शाळेची पायरी चढण्याबाबतचा निर्णय घ्यायचा होता. सविताबाईंनी आपल्या या उपक्रमांतर्गत एक महत्तवाचं काम केलं आहे व ते म्हणजे, राज्यातल्या ज्या ज्या भागांत आपल्या मैत्रिणी आहेत, त्यांना त्यांना आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी जोडलं, त्यांच्या मीटिंग्ज घेतल्या, त्यांना प्रशिक्षण दिलं, गावपातळीवर जाऊन अनेक वडिलांना एकत्र करून त्यांच्या समुपदेशन-कार्यशाळा आयोजिल्या. परिणामी, छोट्या कामातून खूप मोठं काम उभं राहिलं. अगोदर एक घर, मग एक गाव आणि नंतर साडेचारशे गावं, असा विस्तार करत करत या छोट्या कामांनी गेल्या सात-आठ वर्षांत वेगळं रूप धारण केलं. 

ही सगळी चळवळ उभी करत असताना सविता आणि त्यांच्या टीमनं दोन गोष्टींची काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं. पहिली गोष्ट अशी, की कुठल्याही माध्यमात आपली बातमी प्रसिद्ध होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आणि दुसरी म्हणजे, एखाद्याची आर्थिक मदत स्वतः न स्वीकारता मुली असलेल्या कुठल्याही कुटुंबाला ती मदत थेट मिळेल असं त्यांनी पाहिलं. म्हणजेच आर्थिक मदत त्यांनी थेट गरजूंपर्यंत पोचवली. त्यांनी सुरू केलेल्या कामाला या दोन गोष्टींमुळे एक वेगळी उंची मिळाली आणि त्यांचं काम ‘जमिनीवर’ही राहिलं. याच भागात असणारे एक संतोष कारपे नावाचे शिक्षक भेटले. कारपे म्हणाले : ‘‘गावातली मुलं शाळेत आणताना आम्हाला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. एक तर शाळेत मुली न पाठवण्यामागं अनेक कारणं आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, ‘आपल्या जातीत मुली शिकत नाहीत’ हा समज! दुसरं कारण म्हणजे, आई-वडील कामाला गेल्यावर घर सांभाळायला कुणी नसतं. काही घरी लहान भावंड सांभाळायचं असतं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिक अडचण! आज अनेक भागांत मुलं सात-आठ वर्षांची झाली की चार पैसे मिळावेत म्हणून त्यांचे आई-वडील त्यांना कामाला जुंपतात. मुलींना शाळेत न पाठवण्यामागं अशी खूप कारणं आहेत. एकाच शिक्षकाला अनेक गावांत आपल्या शाळेसाठी किल्ला लढवावा लागतो. त्यात पालकांना जाऊन सांगणं, त्यांच्याशी भावनिक बंध निर्माण करणं, त्यांना आर्थिक मदत करणं इत्यादी.’’ 

हे एवढं सगळं प्रत्येक शिक्षक करू शकेलच असं नाही, हेही तेवढंच खरं आहे. कारपे जे सांगत होते त्यापेक्षा वेगळी परिस्थिती आमच्या ग्रामीण भागात अजिबात नाही. कारण, आमचं ग्रामीण भागातलं शैक्षणिक धोरण इतकं मागासलेलं आहे की त्याचा विचारच न केलेला बरा. गावातलं राजकारण, जातीय समीकरणं, सरकारी धोरणं हे सगळं एकीकडं पाहून कुठल्या तरी एखाद्या गरिबाची मुलगी शाळेपर्यंत यावी यासाठी गांभीर्यानं नियोजन करायला कुणालाही वेळच नाही! प्रत्येक गावात सविता, त्यांच्या मैत्रिणी, त्यांचा ग्रुप पोचेलही कदाचित; पण त्या प्रत्येक शेवटच्या मुलीपर्यंत तो पोचेल की नाही अशी शंका एकीकडं वाटत असली तरी सविता यांच्या चळवळीलाच ते शक्‍य आहे, असंही दुसरीकडं वाटत राहतं.  आपल्या राज्यात एवढा मोठा प्रयोग होतोय आणि आणि त्याचे एवढे सकारात्मक परिणाम दिसत आहेत तर तो प्रयोग आपला मानून तो शासकीय पातळीवर का राबवला जात नव्हता, असा साधा प्रश्न मला पडला होता. तसे प्रश्न माझ्या मनात खूप होते. त्या प्रश्नांची उत्तरं मला सविता यांच्याबरोबरच्या प्रवासादरम्यान मिळत गेली. या चळवळीचं श्रेय कुणाला द्यायचं, असा प्रश्न मला पडला होता. सविता यांना शिकवून मोठं केलेल्या त्यांचा वडिलांना द्यायचं की सविता यांना प्रोत्साहित करणाऱ्या तिच्या यजमानांना द्यायचं अथवा सविता यांना या चळवळीसाठी सतत प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींना द्यायचं किंवा सविता यांना सतत मदत करणाऱ्या त्यांच्या मैत्रिणी-कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थिनींना द्यायचं? या चळवळीला कितीतरी पैलू आहेत. या चळवळीला आधार द्यायचं काम या सगळ्यांनी केलं आहे. 

सविता यांच्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात एक अशी ‘स्टोरी’ होती, ज्या स्टोरीनं त्या प्रभावित झाल्या आणि त्या स्टोरीमुळं त्यांना एवढं मोठं काम करण्याचं बळ मिळालं. सविता यांच्यापुढं आदर्श होता तो त्यांच्या वडिलांचा. गावात सगळ्यांचा विरोध असतानाही वडिलांनी सविता यांना शाळेत पाठवलं. शिकवलं. मोठं केलं आणि तिथूनच ‘लेक शाळेत पाठवा’ ही चळवळ सुरू झाली. सविता यांच्या डायऱ्या आणि एकूण काम मी बारकाईनं पाहिलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात सविता यांनी त्यांचं नेटवर्क उभारलं आहे. सविता यांच्या सगळ्या मैत्रिणी या स्वयंसेविका म्हणून काम करतात. किमान दहा मुलींनी तरी शाळेची पायरी चढली पाहिजे, हा एकच त्यांचा उद्देश. या सगळ्या स्वयंसेविकांची संख्या महाराष्ट्रभर दीड हजाराच्या आसपास आहे. त्या सगळ्या जणी चळवळ म्हणून या कामाकडं पाहतात. या सात-आठ वर्षांच्या कालावधीत त्यांनी किमान पन्नासहून अधिक मुलींना शाळेपर्यंत पोचवलं असणार. हा एकूण आकडा पाहिला तर तो आणखी किती मोठा होईल,

या विचारात मी पडलो. मात्र, त्याच्या अधिक खोलात न जाता हे काम अजून पुढं कसं जाईल याचा विचार मी करत राहिलो. कडीला कडी जोडली गेली तर मोठी साखळी निर्माण होते; मग या साखळीचा सुरक्षेच्या दृष्टीनं वापर केला तर चांगला उपयोग होऊ शकतो, असं काहीसं सविता यांच्या चळवळीचं आहे. सविता यांनी शिक्षणासाठी आर्थिक आधार दिलेली ज्योती पाटील आता मोठी अधिकारी होणार आहे. तिच्या पर्समध्ये आई-वडिलांसोबतच सविताचाही फोटो पाहून मी अवाक्‌ झालो. सविताची ही विद्यार्थिनी, तुकाराम हे वडील आणि संतोष हे शिक्षक ही साखळीशी जोडली गेलेली एकेक कडी आहे...अशा अनेकांना मी भेटत गेलो आणि त्यांना दिलखुलासपणे या चळवळीबद्दल विचारत गेलो.

कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय आणि शासकीय आधाराशिवाय एखादी लोकहिताची चळवळ राबवायची असेल तर ते एक कठीण काम आहे; पण सविता यांच्या चळवळीनं हे करून दाखवलं. या चळवळीला राज्याच्या प्रत्येक उच्चशिक्षिताचा आधार मिळाला पाहिजे, असं वाटतं. मुलींच्या जन्मदरात वाढ होणं, मुली शिक्षित होणं आणि पुढची येणारी पिढी घडणं हे सगळं एका मानसिकतेच्या बदलामुळे घडणार आहे. तुम्ही-आम्ही सर्व जण मिळून या बदलासाठी थोडासा जरी हातभार लावला तरी हा बदल कुणा एकाच्या मानसिकतेचा राहणार नाही; तर राज्याच्या भविष्याचा होईल. तेव्हा, आपणही या चळवळीचा भाग होऊ या!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News