विद्यार्थ्यांना दिलासा, आरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशाची दुसरी फेरी शनिवारी (ता. १५) सुरू करण्यात आली होती.

औरंगाबाद - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशाची दुसरी फेरी शनिवारी (ता. १५) सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या फेरीत १ हजार ८९० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली असून, त्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (ता. २७) मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

त्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांसाठीची प्रवेश अर्जप्रक्रिया सध्या सुरू आहे. आरटीई प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यात ५९६ शाळांमधून पाच हजार ६२७ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रत्यक्षात ऑनलाइन पद्धतीने १४ हजार ४३४; तर ॲपच्या माध्यमातून ८३ असे १५ हजार ५२७ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले. आरटीईची पहिली फेरी आठ एप्रिलला सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये तीन हजार ८३९ बालकांची निवड झाली होती. 

कागदपत्रांची पूर्तता बाकी असणे, मनासारखी शाळा न मिळणे व तांत्रिक अडचणी अशा कारणांमुळे तब्बल दोन महिने चाललेल्या पहिल्या फेरीत फक्त अडीच हजार प्रवेश निश्‍चित झाले; तर एक हजार ३३७ प्रवेश अपूर्णच राहिले; तसेच या प्रक्रियेसाठी चारवेळा मुदतवाढही देण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया रेंगाळत गेली; मात्र आता शाळा सुरू होण्याअगोदर एक दिवस पुन्हा ही प्रक्रिया सुरू झाली असून, दुसऱ्या फेरीसाठी पालकांना फक्त बारा दिवस वेळ देण्यात आला आहे. दुसऱ्या फेरीत १ हजार ८९० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली. या विद्यार्थ्यांचे प्रवेश गुरुवारपर्यंत निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. आजपर्यंत दुसऱ्या फेरीतील सातशे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. 

तिसऱ्या फेरीबाबत संभ्रम 
दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या होतात. नेहमीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला आहे. साधारणतः शाळा सुरू होण्यापूर्वी आरटीई प्रक्रिया संपायला हवी होती; मात्र ढिसाळ नियोजनामुळे शाळा सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी प्रक्रिया सुरूच आहे. दोन्ही फेऱ्यांत ज्या पाल्यांचा प्रवेशासाठी नंबर लागला नाही, अशा पाल्यांच्या पालकांमध्ये तिसऱ्या फेरीबाबत शंका आहे. त्यामुळे पालकांनी आरटीईवर अवलंबून न राहता पाल्याचे प्रवेश निश्‍चित केले आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News