विद्यार्थी दिंडीमुळे पेण परिसर झाला भक्‍तिमय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

विठुनामाच्‍या गजरात काढलेल्‍या दिंडीत स्वच्छता आणि वृक्षलागवडीचा संदेश
 

पेण : ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’, ‘विठ्ठल विठ्ठल, विठ्ठला हरिओम विठ्ठला’ अशा प्रकारच्या जयघोषात टाळ वाजवत ढोलकीच्या तालावर पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दिंडी सोहळ्यात रमले होते.

विद्यार्थिनींनी तुळस डोक्‍यावर घेऊन, तर विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा करून; तसेच इतर विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्‍मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतल्याने अवघी पंढरीच या पेण शहरात अवतरल्यासारखे भासत होते.

या विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी सोहळ्याने शाळेचा परिसरच नव्हे, तर आजूबाजूचा परिसरही भक्तिमय केला होता. 

संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रात सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. एका बाजूला पंढरपुरात भक्तीचा महापूर आलेला असताना पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत आणि दिंडीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या दिंडीतून विद्यार्थ्यांनी फक्त सहभागी न होता शहरातील नागरिकांना स्वच्छता आणि वृक्षलागवडीचा संदेश देऊन एक आगळीवेगळी दिंडी काढली. 

यावेळी या दिंडी सोहळ्यात संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. बापूसाहेब नेने, कार्याध्यक्ष वसंत आठवले यांसह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News