विद्यार्थी- शाळा मार्गात रस्त्याचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

धाबा- लाठी मार्ग खोदल्याने ठप्प, दुचाकी चालकांचे अपघात वाढले

धाबा: भर पावसात पुलाचे बांधकाम करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग आता विद्यार्थ्यांच्या जिवावर उठला आहे. भर पावसात रस्ता बांधकामासाठी अख्खा रस्ताच खोदून काढला. त्यामुळे बससेवा ठप्प पडली आहे. परिणामी बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या अनेकविद्यार्थ्यांची शाळा बुडाली आहे. अवघ्या आठवडाभरात या मार्गाने जाणाऱ्या दुचाकीधारकांना अपघाताला सामोरे जावे लागते. 

गोंडपिपरी तालुक्यातील सर्वाधिक पूर येणाऱ्या नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला भर पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरवात केली. आता बांधकाम विभागाने धाबा-लाठी मार्ग खोदून काढला. भर पावसात रस्ता बांधकामाला सुरवात करणाऱ्या ठेकेदारावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाने मात्र चूप्पी साधली आहे. विशेष म्हणजे लाठी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी तालुका गाठतात. सोनापूर परिसरातील काही विद्यार्थी लाठी गावातील शाळेत जातात.

शाळा गाठण्यासाठी बसने विद्यार्थी ये-जा करतात. मात्र रस्ता खराब असल्याने अपघाताची शक्यता वर्तवीत एसटी महामंडळाने लाठी-सोनापूर, लाठी-गोंडपिपरी बससेवा बंद केली आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवस विद्यार्थ्यांची शाळा बुडाली. त्यात कंत्राटदाराने रस्ता तर खोदला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली खोदली.  खोदकामात निघालेली माती भरण म्हणून वापरण्यात आली. या रस्त्यावरून मार्ग काढीत जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांची अपघाताचा आकडा मोठा आहे. दरम्यान सामान्य माणसांच्या जिवावर उठलेला बांधकाम विभाग ठेकेदाराला मात्र पोटाशी घेत असल्याची टीका होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News