डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवा अभ्यासक्रम सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रथम सत्रापासून ग्रामीण विकासासंबंधी विशेष पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 
  • समाजाच्या जीवन जगण्याच्या समस्यांचा अभ्यास व संशोधन करणारे हे विभाग असणार आहेत. 
  •  चारही विभागांच्या अभ्यासक्रमांस व शिकणे-शिकविणे व मूल्यमापन पध्दतीस मान्यता दिलेली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या प्रथम सत्रापासून ग्रामीण विकासासंबंधी विशेष पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरु होत आहेत. महाराष्ट्रात केवळ ग्रामीण भागातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, जैववैज्ञानिक व तंत्रशास्त्रांचा अभ्यास करुन ग्रामीण समाजाच्या जीवन जगण्याच्या समस्यांचा अभ्यास व संशोधन करणारे हे विभाग असणार आहेत, अशी माहिती मानद संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी दिली. 

चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांपैकी मास्टर ऑफ रुरल स्टडीज एम.आर.एस  समाज सांस्कृतिक व राजकीय स्थिती, मास्टर ऑफ रुरल स्टडीज एम.आर.एस.  ग्रामीण अर्थशास्त्र, बॅंक व उद्योग या दोन विभागांचा समावेश सामाजिक शास्त्रे तथा मानव्य विद्याशाखेत मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर मास्टर ऑफ सायन्स एम.एस्सी  जैवविविधतेचे संवर्धन व मास्टर ऑफ सायन्स एम.एस्सी : ग्रामीण तंत्रज्ञान या दोन विभागांचा समावेश विज्ञान व तंत्रशास्त्र विद्याशाखेत केलेला आहे. 

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी चारही विभागांच्या अभ्यासक्रमांस व शिकणे-शिकविणे व मूल्यमापन पध्दतीस मान्यता दिलेली आहे. अभ्यासक्रम निश्‍चित करताना विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वांचा स्विकार करुन पसंती आधारित श्रेयांक पध्दती आधारित अभासक्रम तयार करण्यात आलेले आहेत. अभ्यासक्रमाचे विषय निवडीच्या पुरेशा संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच पाठ्यक्रम व पाठ्यचर्या ठरवताना शिक्षण व शिकविण्याची उद्दिष्ट्ये व फलशृती निश्‍चित केलेली आहे.

दोन वर्षे म्हणजे चार शैक्षणिक सत्रात हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण करावयाचा आहे. अभ्यासक्रमासाठी एकुण 2650 गुणांची अंतर्गत व बाह्य परीक्षा देऊन 103 श्रेयांक प्राप्त करावयाचे आहेत. या चार विभागांपैकी दोन मानव्य विद्याशाखेत व दोन विभाग विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत समाविष्ट आहेत.

चारही विभागात 50 टक्के वर्गशिक्षण असणार आहे. त्यात केवळ व्याख्यान पध्दती नसून, गटचर्चा, सादरीकरण, शिक्षक-विद्यार्थी संवाद, या नवीनतम शिक्षण पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. 50 टक्के अभ्यासक्रम प्रात्यक्षिके, क्षेत्रीय भेटी, सर्वेक्षण, संशोधन व अहवाल लेखन या पध्दतीने पूर्ण केला जाणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News