डिफेन्स कोट्यातून असा घ्या प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्रवेशासाठी डिफेन्स, लष्कर सेवा, अपंग प्रवर्ग, एनकेबी महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्र व डोंगरी प्रदेश यांच्यासाठी विभागवार, विशिष्ट आरक्षणानुसार काही जागा राखीव असतात.

शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्रवेशासाठी डिफेन्स, लष्कर सेवा, अपंग प्रवर्ग, एनकेबी महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्र व डोंगरी प्रदेश यांच्यासाठी विभागवार, विशिष्ट आरक्षणानुसार काही जागा राखीव असतात. प्रवेशप्रक्रियेसाठी नावनोंदणी, रजिस्ट्रेशन करताना उपलब्ध होणाऱ्या माहितीपत्रकातील नमुन्यामध्येच हे दाखले काढावे लागतात.

लष्कर सेवा -
देश व राज्य पातळीवरील सर्व शासकीय संस्थांमधील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस प्रवेशासाठी प्रत्येक संस्थेत पाच टक्के जागा (जास्तीत जास्त ५ जागा प्रत्येक संस्थेत), हवाई दल, पायदळ व नौदल या संरक्षण दलांतील पालकांच्या मुलांसाठी राखीव असतात. संरक्षण दलातील सिव्हिलियन्स स्टाफसाठी मात्र जागा राखीव नसतात. प्रवेशासाठी डी-१, डी-२, डी-३ असे तीन प्रकार असतात. डिफेन्स-१ म्हणजेच डी-१मध्ये संरक्षण दलातील माजी अधिकारी व महाराष्ट्रातील नागरिकत्व असलेले या वर्गात मोडतात. 

डिफेन्स-२ म्हणजेच डी-२मध्ये महाराष्ट्रातील डोमिसाईल असलेले व सध्या सेवेत असलेले संरक्षण दलातील अधिकारी या वर्गात मोडतात. डिफेन्स-३ म्हणजेच डी-३मध्ये राज्याबाहेरील नागरिकत्व म्हणजेच परराज्यातील नागरिकत्व असलेले, परंतु महाराष्ट्रात सध्या सेवेत असलेले संरक्षण दलातील अधिकारी या वर्गात मोडतात.अर्ज भरताना कोणतेही दाखले जोडावे लागत नसून, फक्त आरक्षणासाठी योग्य त्या ठिकाणी मार्किंग करावे लागते. या राखीव जागांमधून प्रवेशासाठी माहितीपत्रकातील नमुन्यामध्येच संबंधित कार्यालयाच्या लेटरहेडवर दाखला प्राप्त करावा लागतो.

प्राप्त केलेले दाखले प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळी कागदपत्रांची तपासणी करताना सादर करावे लागतात. वैद्यकीयसह अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अशा सर्व व्यावसायिक शाखांच्या प्रवेशासाठी शासकीय संस्थांमध्ये संरक्षणमधून जागा राखीव असतात. डी-१ व डी-२साठी सेवेत असणाऱ्यांसाठी कमीत कमी पाच वर्षे सेवा आवश्‍यक असते. तसेच, निवृत्त माजी अधिकारी किंवा कायमचे अपंगत्व आलेले किंवा हुतात्मा झालेल्यांच्या पाल्यांसाठी जागा राखीव असतात. अशा जागांवर प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यासाठी सेवेत असणाऱ्यांनी संबंधित कार्यालयांकडून किंवा निवृत्त झालेल्यांनी जिल्हा सैनिक बोर्डाकडून योग्य त्या नमुन्यात दाखला प्राप्त करावा.

सेवेत असताना कायमचे अपंगत्व किंवा हुतात्मा झालेल्यांना पाच वर्षे सेवेचे बंधन नाही. सेवेत असलेला किंवा निवृत्तीच्या दाखल्याबरोबरच विद्यार्थ्याचे व पालकाचे महाराष्ट्र राज्यातील डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्‍यक आहे. डी-१ व डी-२ प्रवेशासाठी दहावी अथवा बारावी राज्यातूनच देण्याची अट नाही. डी-३ साठी महाराष्ट्रातील डोमिसाईल नसलेला, परंतु पसंतीक्रम भरण्यापूर्वी राज्यात बदली झालेले अधिकारी पात्र असतात. त्यांनी आवश्‍यक तो दाखला प्राप्त करावा. 
डिफेन्समधून प्रवेशासाठी बारावी तसेच संबंधित प्रवेशाच्या सीईटीमध्ये नियमानुसार कमीत कमी पात्रता मिळविणे आवश्‍यक असते.

डिफेन्समधून देशसेवा केली किंवा करीत आहेत, त्यांच्यासाठी पाच टक्के जागा राखीव आहेत. नियमानुसार पात्र विद्यार्थ्यांना कमी गुणांवर देखील सहजतेने प्रवेश मिळू शकतो, मात्र त्यासाठी वेळेत डिफेन्ससाठीचे आवश्‍यक दाखले प्राप्त करावेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News