तुम्हाला हैद्राबादी व्हायचंय का? 

डॉ. शरयू देशपांडे, हैद्राबाद
Friday, 12 April 2019

हैद्राबादला येऊन पंधरा वर्षे झाली. सुरुवातीला थोडं कठीण गेलं पण हळूहळू रूळावलो. पहाता पहाता या नवाबी शहरानं कधी आपलंसं केलं कळलंच नाही. इथली भाषा, संस्कृती सगळं काही प्रेमात पाडत गेलं. आता तर आम्ही पक्के हैद्राबादी झालो आहोत. हा हैद्राबादी होण्याचा मनोहारी प्रवास शब्दबद्ध करायचाच होता. पण साचा सापडत नव्हता. 

तुम्हाला हैद्राबादकर व्हायचंय का? तर जरूर व्हा. किंबहुना आयुष्यात एकदा तरी हैद्राबादकर होण्याचा सुंदर अनुभव प्रत्येकानेच घ्यावा असं मी म्हणेन. हे "हैद्राबादी" होणं म्हणलं तर सोपं आहे आणि म्हणलं तर खूप अवघड! तर सोपं यासाठी की हैद्राबादी होण्यासाठी फक्त 'इगो' (Ego) सोडावा लागेल आणि अवघड यासाठी की, 'इगो' मात्र सोडायला लागेल!

मूळात हैद्राबादी माणूस अजिबात Egoistic/ दुराभिमानी नाही. अहो इगो तर सोडा, बिचारा कधीही हैद्राबादविषयी चार गोष्टी अभिमानानं सांगत मिरवत, फिरत नाही. याचा अर्थ हैद्राबादवर त्याचं प्रेम नाही असा नाही हं. पण शान मारणं, शेखी मिरवणं, आत्मस्तुती करणं हा हैद्राबादी माणसाचा स्वभाव नाही. तेव्हा हा इगो सोडण्याचा पहिलाच, कठीण टप्पा पार पडला की मग पुढची वाट सुगम आहे.

आधी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे हैद्राबादला रहायला आल्यावर तुम्हाला केवळ 'हैद्राबादकर' होऊन भागत नाही. तसं म्हणल्यावर केवळ 'हैद्राबादचे मराठी लोक' असा संकुचित अर्थ निघेल. इथे रहायचं, मुरायचं असेल तर केवळ एकेरी मर्यादित ओळख ठेवून चालतच नाही मुळी. अस्सल हैद्राबादकर स्वत:ला हैद्राबादकर न म्हणवता "हैद्राबादी" असंच संबोधतो. त्याला कारणही तसंच आहे.

इतर कुठल्याही शहरात दिसणार नाही असा तेलुगु, मुस्लिम, कन्नडा, मारवाडी, गुजराथी आणि मराठी अशा अनेक संस्कृतींचा सुंदर मिलाफ केवळ हैद्राबादमधे पहायला मिळतो. इतर लोकांना याबाबत शंका असेल तरी हैद्राबादमधे या संस्कृती गेली अनेक दशकं, अगदी गुण्यागोविंदाने, एकमेकींच्या हातात हात गुंफून वावरताना दिसतात. खाद्यपदार्थांसोबतच भाषा आणि संस्कृती यांचींही परस्परांत देवाणघेवाण होत असते. अनेक ठिकाणी रोटी बेटी व्यवहारही दिसून येतात आणि जिथे होत नसतील तिथे निदान एकोप्याचे संबंध निश्चितच दिसून येतात. त्यामुळेच अस्सल हैद्राबादवासी व्हायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन "हैद्राबादी" च व्हावं लागेल!

आता ठरवलंय ना हैद्राबादी व्हायचं, तर मग कंबर कसून तयारीला लागायला हवं. तर सुरुवात भाषेपासून करावी लागेल. यासाठी इथल्या बोलीभाषेचा, अर्थात हैद्राबादी हिंदीचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक अस्सल महाराष्ट्रीयन माणूस इंग्रजीला घाबरणार नाही इतका हिंदीला घाबरतो. मात्र इथे ती प्रयत्नपूर्वक आत्मसात करावी लागेल. मुळात ती हिंदी नव्हेच. ती हैद्राबादीच. यामध्ये ती "आपली" भाषा नाही हे फक्त हैद्राबादच्या बाहेरच्या लोकांना वाटतं. मात्र इथे, कितीही शुद्ध मराठी अथवा इंग्रजी बोलत असाल तरी चार मराठी वाक्यांनंतर पाचवं वाक्य हैद्राबादी आलं नाही तर तो 'फाऊल' मानतात. 

ही भाषा शिकणं फारसं अवघड नाही. ती कुठेही लेखी स्वरूपात आढळत नाही. त्यामुळे तिचा अभ्यास ऐकून ऐकून स्थानिक रहिवाशांसोबत राहूनच करावा लागतो. यामध्ये अनेकवचन करण्यातली खूबी जाणून घ्या. 'कार'चं अनेक वचन हैद्राबादीमधे 'कार्स' असं इंग्रजाळेलं नसून "कारां" असं होतं. तसंच "काम" या शब्दाचं अनेकवचन 'कामां' असं होतं. "काल मी तुम्हाला खूप वेळा फोन केला होता " हे वाक्य हैद्राबादी हिंदीमध्ये, "आमा कल आपको कितने कालाँ (calls) किये जी। आप उठारैच नहीं।" असं होईल. एकदा का ही अनेकवचनांचीं करामत जमली की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. यात मधेच "बस क्या साब, क्या बांतां कर्रैं मियाँ " अशी वाक्यं त्या हेल काढलेल्या गोड आवाजात अधूनमधून टाकली की तुम्ही हैद्राबादी हिंदीवर प्रभुत्व मिळवलंच म्हणून समजा.

यात अजूनही दोन तीन मुद्दे आहेत- 
१. भाषांच्या सरमिसळीमुळे काही ठराविक वाक्यप्रयोग तेलुगु ,हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांत दिसून येतात. उदाहरणार्थ, एंदुकू आंटे/ क्युँ बोले तो /का म्हणजे की... हे वाक्य अनुक्रमे तेलुगु, हैद्राबादी हिंदी आणि मराठीत हमखास दिसून येईल. अस्सल हैद्राबादी माणसाच्या बहूतेक संवादांमधून हे वाक्य हमखास दिसून येतं.

२. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मध्यमवयीन महिला असाल आणि कुणी तुम्हाला "अम्मा" असं संबोधलं तर अजिबात अपमानास्पद वाटून घेऊ नका. हैद्राबादमध्ये 'शून्य ते शंभर' या वयातील सर्व आकाराच्या स्त्रियांना 'अम्मा' हेच संबोधन वापरलं जातं. याचा संबंध तुमच्या वय, रंग, रूप आणि आकाराशी नसून तुमच्या स्त्रीत्वाशी आहे. इथे स्त्रीला 'माता /आई' च्या रूपात पाहून तिच्याविषयी आदर व्यक्त करत "अम्मा "हा गौरवोद्गार म्हणून वापरला जातो. त्यात अपमानास्पद वाटून न घेता त्यातला आदर आणि आपलेपणा समजून घ्या . 

३. तिसरी गोष्ट जमणं मात्र थोडंसं कठीण आहे आणि ते म्हणजे टोमणे न मारता बोलणं! पुणेकरांचा विश्वास बसणार नाही पण हैद्राबादी लोकांना, ना टोमणे मारता येतात ना टोमणे समजतात. साध्या , सरळ, सोप्या पद्धतीने इथे संवाद साधला जातो. स्वानुभव आहे. सुरुवातीला, सलग चार दिवस काहीही न कळवता खाडे करणाऱ्या माझ्या मोलकरणीला फोनवर मी रागाने "ठिक है, अब कल भी मत आओ।" असं म्हंटलं तर ती लगेच अगदी भाबडेपणाने , "एंदूकू अम्मा? आरी ना मै कल। सुब्बा सुब्बा ग्यारह बजे आ जाती।" असं म्हणाली. आता काय बोलणार? मलाच खजील झाल्यासारखं झालं. तेव्हा टोमणे मारणं कमी करता येईल का पहा. थोडासा गबाळा वाटला तरी अगदी निवांतपणे चालणारा, साधा कारभार आहे इथला. त्याची सवय करून घ्या.

आता पुढचा टप्पा म्हणजे हैद्राबादच्या रस्त्यांवरून गाडी चालवणे. 
१.  मुळात हैद्राबादमधे गाडी "चालवणे" हे क्रियापद या अर्थाने वापरता येणार नाही. कारण इथल्या प्रचंड ट्रॅफिकमधे गाडी आपोआपच प्रवाहाबरोबर 'चालते' . हैद्राबादी माणसाला रिकाम्या रस्त्यावर गाडी चालवायची सवय नसल्याने एखाद्या दिवशी काही कारणाने रस्ता रिकामा असेल तर एकदा डावीकडे एकदा उजवीकडे असं तो चालवत जातो. त्यामुळे हैद्राबादी माणसाला भर गर्दीतच गाडी उत्तम चालवता येते. 

२.  इथे सिग्नलवर सर्वात दुर्लक्षित गोष्ट म्हणजे ट्रॅफिक पोलिस!! तो असला नसला तरी काहीही फरक पडत नाही. 'रविवारी रस्त्यावरील रहदारीचे सर्व नियम शिथिल केलेले असतात' असा एक अलिखित नियम आहे. त्यामुळे रविवारी तुम्ही रस्त्यावर खरोखरच नवाब असता!

३. एखादी स्त्री गाडी चालवताना दिसत असेल तर अगदी निवांतपणे रस्ता क्रॉस करा. हैद्राबादच्या स्त्रिया सहसा कुठल्याही वादापासून चार हात दूरच रहातात. त्यामुळे काहीही झालं तरी त्या सावकाश गाडी चालवतील. जिवितहानी होऊ देत नाहीत.
४. हैद्राबादला कुठलंही वाहन चालवायला शिकायचं असेल तर सुरुवात बंजारा हिल्सच्या रस्त्यावर करून आमीरपेट, हिमायत नगर, कोटी, असं करत शेवटची निर्णायक फेरी चारमिनारच्या रस्त्यावर घ्यावी. 

तुमचा वाहन प्रशिक्षक (Driving School Trainer) शेवटच्या दिवशी तुम्हाला तिथे नेतोच आणि एक चक्कर मारून झाल्यावर, "आ गया जी आपको कारां चलाना। अब चारमिनार चला लिये तो दुनिया में कहीं भी चला सकतैं । परसो एगजामां क्लियर कर लो। लायसेंस आ जाता आठ दिनां में।" असं जाहीर करतो. हैद्राबादचा वाहन प्रशिक्षकही जगावेगळा असतो हं . क्लासच्या पहिल्याच दिवशी तो तुम्हाला खास टिप्स देईल. "अम्मा देखो, अब कहॅां चलाया क्या चलाया ये भूल जावो। 

हैदराबाद के रोडांपें चलाते वखत मेरी चार चिजां हमेशा याद रखना - 
1. ये जो सामने की white dot dot लाइनां दिखरी ना, ये अपनी लाईन!! दो पहियों (wheels) के बीच में से ये जानी चाहिए।इसके उपरसे गाडी चलाना। 
2. आगेवाली कार को चिपकके अपनी कार चलाना. नही तो बीच में बाईकांवालें आ जाते। 
3. गाडी चलती है या खडी हो, हार्रन (horn) बजाते रहना। हार्रन नही बजाए तो गाडी कैसै चलाते बोलो? गाडी चले ना चले, हार्रनां मारते रहना । 
4. मिररां (mirror) में पिछे या आजूबाजू कौन जार्रां नै देखना। उनो चला जाता अपनेआप। हम टेंशनां नै लेना । उनो देख लेते। 

तुमच्या कारशिक्षक गुरूने दिलेला हा कानमंत्र, कायम लक्षात ठेवा. तो तुमच्या हैद्राबादच्या वास्तव्यात अतिशय उपयुक्त ठरेल. कारण रस्त्यावरचे इतर चालक हे त्यानेच "घडवलेले " चेले आहेत. या नात्याने ते तुमचे गुरूबंधू किंवा गुरूभगिनीच लागतात. त्यामुळे त्यांच्या "हरकती" तुम्हाला ठाऊक असतात. 

या मुलभूत नियमांचं पालन केल्यावर तुम्हाला हैद्राबादयधे गाडी चालवण्याचंही प्रमाणपत्र प्राप्त होईल. एक ट्रॅफिकचा मुद्दा सोडल्यास हैद्राबादच्या खड्डेविरहीत, गुळगुळीत, चौपदरी रस्त्यावरून गाडी चालवण्यासारखं सुख नाही जगात तुम्हाला सांगते. अशा प्रकारे हैद्राबादी गाडी चालवण्याचा मोठा पहाडी मुद्दाही तुम्ही आता सर केलात.

आता पुढची पायरी. तुम्हाला थोडा निवांतपणा अंगी बाळगावा लागेल. धावपळीत, गडबडीत कामं उरकण्याची इथली प्रवृत्ती नाही. कित्येकदा हैद्राबादी माणूस आळशी किंवा सुस्त आहे असा आरोप (अर्थातच) पुण्यामंबईकरांकडून केला जातो. तो आरोप सरासर झूठ आहे हे ठासून सांगा. त्याची ढोबळमानाने पुढील कारणं देता येतील - 

१. एक तर "हम नवाब के शहर के है। नवाब गये लेकिन नवाबी नही गई।" हा मुद्दा पुढे करा. 

२. "हैद्राबाद के पानी में ही सुस्ती है।" हे वाक्य टाकायला विसरू नका. त्यात काहीही चूक नाही. हैद्राबादचं उष्ण वातावरण आणि इथली लांबलचक अंतरं यामुळे दिवसातून एक, फारतर दोनच कामं करता येतात हे इथे प्रत्यक्ष रहायला आल्याशिवाय समजत नाही. 

३.'हैद्राबादी टाइम' ही एक वेळेची परिभाषा नसून एक जगण्याची शैली आहे हे लक्षात घ्या. 'वेळ न पाळणं' हा गबाळेपणा नसून नवाबीपणाचा भाग आहे हे अधोरेखित करायला विसरू नका.

आधी हैद्राबादकरच होऊन सुरूवात करायची असेल तर हैद्राबादच्या कोटी, बडीचावडी, सुल्तान बाजार, या भागात एकदा तरी चक्कर मारल्याशिवाय तुम्हाला हैद्राबादकर सुद्धा होता येणार नाही. बहुतेक मराठी कूटुंबांचा या भागाशी अगदी घनिष्ठ संबंध आहे. अनेक रम्य आठवणींना उजाळा देणारी आणि आजही मराठीशाळेचा मान टिकवून असणारी विवेकवर्धिनी शाळा याच भागातली. 'तुळशीबाग नाही हैद्राबादेत' असं वाटत असेल तर सुल्तान बाजारला भेट द्या. 

चमच्यापासून कांजीवरम साडी पर्यंत सगळ्या गोष्टी इथे (अर्थातच हैद्राबादीमध्ये बार्गेनिंग) करून मिळतात. कोटी बडीचावडी, रस्ता म्हणजे लक्ष्मीरोड. ताज्या ताज्या रसरशीत भाज्यांपासून सोन्याचांदीच्या जव्हेरीपर्यंत सगळं काही मिळण्याचं एकमेव ठिकाण. मात्र नव्या हैद्राबादमध्ये रहात असाल तर इथे येऊन 10 रू ची मेथीजूडी घेण्यापेक्षा आपल्या भागात 20 रूपयांनां घेणं नक्कीच परवडेल.

तरीही मराठी कालनिर्णय, पांढरी रांगोळी, गुढीची गाठी, पैठणी अशा अनेक खास मराठी खरेदीसाठी कोटी भागाची चक्कर अनिवार्य आहे. . पण एकदा सवय झाली की दोन तीन महिन्यातून एकदा या भागात चक्कर मारल्याशिवाय करमणार नाही हे ही तितकंच खरं. अशा रीतीने हैद्राबादी होण्याची सुरूवात हैद्राबादकर होण्यापासूनही करता येईल.

आता पुढचा भाग इथल्या खानपानाचा. (मागे यावर मी 'रंग माझा वेगळा' या लेखात सविस्तर चर्चा केलीच आहे. ) साबुदाणा खिचडी, वडापाव, बटाटेवडा, आणि पोहे याशिवाय देखील उत्तम नाश्ता होऊ शकतो हे लक्षात घ्या . सुरुवातीला याची खूप आठवण येते आणि घरात आपण तोच नाश्ता करत असलो तरी सवयीने सकाळी उपमा आणि इडली डोसाच आवडायला लागतो.

इतकंच काय, पुढेपुढे तर उन्हाळ्यात 40°च्या वर पारा गेलेला असला तरी गाडीवर एक पाय ठेवत मिरची भज्जी आणि आलूबोंडा खाण्याचीही सवय होते. तीच गोष्ट बिर्याणीची. एकूणच पॅराडाईज, चटनीज, बावर्ची, मिनर्व्हा या हॉटेल्सच्या सगळ्या शाखांचे, पत्ते, वेळा, delivery time, parcel policies या अगदी तोंडपाठ असायला हव्यात हे लक्षात ठेवा.

तसं तर हैद्राबादला दोनच ऋतू- उन्हाळा आणि अधिक उन्हाळा! दिवाळी ते संक्रांत या काळात ऊन कमी असतं इतकंच. नाही म्हणायला जूनमध्ये थोडा तुरळक शिडकावा होतो पावसाचा. पण इथे राज्य मात्र ऊन्हाचंच चालतं. हैद्राबादी माणसाप्रमाणेच इथला उन्हाळा निवांत आणि रेंगाळणारा आहे. त्यामुळे दिल्लीहून आला असाल आणि आपल्याकडे अगदी मॉडर्न डिझाईनचे स्वेटर्स वगैरे असतील तर त्यांनां अधूनमधून 'ऊन दाखवा' कारण ते इथे वापरताच येणार नाहीत. आणि कितीही ऊन असलं तरी दिवसातून अनेक वेळा "आधा कप चायां " प्यायची सवय करून घ्यावी लागेल. चहा हा हैद्राबादी लोकांचां अगदी weak point! चारमिनार पासून IT hub मध्ये "चायां पे चर्चा" घडतात. तेलुगु लोक "काफी " पेक्षा चहाच अधिक आवडीने पितात. हे चहाचं व्यसनी आपोआपच जडेल इथे राहून.

आता अजून एक महत्त्वाची पायरी म्हणजे 'अतिथी देवो भव' या नियमाचं पालन काटेकोरपणे करता यायला हवं. तुम्ही इकडे शिफ्ट होताय हे समजल्यावर तुम्ही नाराज असलात तरी तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी खूश होऊन, "बरं झालं आता हैद्राबाद पहायला येता येईल.

खूप दिवसांचं पहायचं होतं. आत्ता तुमच्यामुळे योग येईल " असं म्हणत लगेच दिवाळीच्या सुट्टीत, मुलं बाळं, इष्टमित्र परिवारासहित इथे हजर होतात! पण कितीही पाहुणे आले तरी डगमगायचं नाही. कारण हैद्राबादवाले मेहमान नवाजीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इथे आल्यावर पाहुण्यांचं आदरातिथ्यं करण्याचीही सवय करून घ्यावी लागेल. हे ही सुरूवातीला अवघड जातं पण मग नंतर आपल्यालाच पाहुणे आल्याशिवाय चैन पडत नाही. 

रामोजी, सालारजंग म्युझियम, गोवळकोंडा, झू, सुधाकारा म्युझियम, NTR Garden ही सगळी पुण्यक्षेत्रं. धार्मिक पाहुणे असतील तर श्रीशैल्यम, निसर्गप्रेमी असतील तर नागार्जून सागर, आणि खरेदी प्रेमी असतील तर पोचमपल्ली आदी स्थळांच्या वाऱ्या घडवून आणाव्यात. विशेषतः स्त्री वर्गाला, चारमिनार, चुडीबाजार, मंगतराय, नल्लीज, शिल्पारामम, साउथ इंडिया मॉल, इत्यादी ठिकाणी नेऊन आणल्यास साता जन्माचं पुण्य लाभतं अशी इथल्या लोकांचीं धारणा आहे . (मात्र या खरेदी प्रकरणात आपली बायको देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेते याची मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवावी.) 

या सर्व खरेदीच्या काळात समस्त पुरूष/नवरे वर्गाला पॅराडाईजमध्ये नेऊन बिर्याणी अथवा हलीम खिलवून, नेकलेस रोडवर अथवा ORR वर long drive ला न्यावं. असं केल्यानं तर दोन्हीही बाजूंनी भरघोस आशीर्वाद लाभतात असाही खात्रीलायक अनुभव आहे. खास करून बायकोच्या माहेरच्या लोकांची विशेष सरबराई करत इथल्या लाहिरी, लियोनिया, पॅपिरस आदी Resorts मध्ये नेऊन आणल्यास पत्नीरूपी देवी विशेष प्रसन्न होऊन, भर IPL च्या काळात मुलाबाळांना घेऊन, माहेरी जाण्याचा आशीर्वाद देते असंही ऐकण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सर्व मेहमाननवाजीमध्ये आपला दुहेरी फायदा होतो ही बाब जाणून घेऊन त्याप्रमाणे निर्णय घ्या.

आणि कधीतरी अगदीच नावडते पाहूणे येणार असतील तर त्यांनां भर मे मधे इथे रहायला बोलवा. रामोजी, बिर्ला मंदिर आणि NTR Garden असं सगळं मे च्या रणरणत्या चांदण्या उन्हात, केवळ बिर्याणी खात भटकंती करताना पाहूणे इतके थकून भागून जातात की परतीची भाषा करू लागतात. नेमका तेव्हाच त्यांनां चौथ्या दिवशी मुद्दाम आग्रह करून, नागार्जुन सागर किंवा श्रीशैल्यमला भाड्याच्या वाहनानं घेऊन जावं. पाणी नसलेलं धरण आणि घामाने डबडबलेल्या अवस्थेत, गच्च गर्दीत, तीन चार तास रांगेतील प्रतिक्षेनंतर अर्ध्या सेकंदाचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून "गारेगार" झालेले बिचारे दुसऱ्याच दिवशी तात्कालमध्ये शताब्दीचं तिकीट काढून आपापल्या गावी रवाना होतात. जाताना पाहूण्यांच्या मुलांच्या हातात कराची बेकरीच्या बिस्किटांचे बॉक्सेस देण्यास विसरू नये  असो..

तर मंडळी, अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे जय्यत तयारी केल्यास हैद्राबादी होणं अजिबात कठिण नाही. मात्र तूर्तास तरी इथल्या उन्हाची काहिली सहन होत नसल्याने दोन महिन्यासाठी आपण स्वतः कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन हैद्राबादी होण्यात किती गंमत आहे हे इतरांना भरभरुन सांगावं. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News