एमपीएससी परीक्षा देतायं? जाणून घ्या, राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप व निकष

अॅड. नरेंद्र बेलसरे
Monday, 19 August 2019
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी काही पदांची भरती केली जाते.
  • यामध्ये पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालय सहायक आणि लिपिक भरती यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकापासून ते पोलीस उपअधीक्षकापर्यंत तर नायब तहसीलदारापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत पदांच्या परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय विविध खात्यातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी पदे तसेच जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून भरण्यात येतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी काही पदांची भरती केली जाते. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालय सहायक आणि लिपिक भरती यांचा समावेश आहे. राज्यसेवा (राजपत्रित) अधिकारी यांचीसुद्धा भरती घेण्यात येते. यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी वर्ग 1, निंबधक वर्ग 1 व 2, वित्त लेखाधिकारी वर्ग 1 आणि 2, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, नायब तहसीलदार, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पदांचा समावेश असतो. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणे आवश्यक आहे. निवड होईपर्यंत तो पदवी उत्तीर्ण झालेला असावा.

याशिवाय आयोगामार्फत महाराष्ट्र वनसेवा, वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, कर सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक खात्यांतर्गत, पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा, मोटार वाहन उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी, साहाय्यक आदी परीक्षा घेण्यात येतात. जिल्हापातळीवर जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून काही पदे दरवर्षी भरली जातात. ज्याप्रमाणे गृह विभाग - पोलीस, लिपीक. वनविभाग - वनपाल, वनरक्षक आणि चालक. सार्वजनिक बांधकाम विभाग - कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपीक, अनुरेखक, कनिष्ठ अभियंता, कृषी विभाग - कृषीसेवक, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, कृषी पर्यवेक्षक, भूमापन विभाग - भूमापक व कनिष्ठ लिपिक, पाटबंधारे विभाग - कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, अनुरेखक, कनिष्ठ अभियंता. आरोग्य विभाग - आरोग्यसेवक. शिक्षण विभाग - कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक. महसूल विभाग - तलाठी व ग्रामसेवक यांचा समावेश असतो. या सर्व पदासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे. भूमापक व आरोग्यसेवक यांच्यासाठी दहावी आणि बारावी, कनिष्ठ लिपीकांसाठी बारावी (इंग्रजी, मराठी टंकलेखन) वरिष्ठ लिपिकासाठी पदवी, तांत्रिक पदांसाठी त्या शाखेतील पदविका असणे अनिवार्य आहे.

राज्यसेवा (पूर्व) परीक्षा

राज्यसेवा परीक्षेतील (राजपत्रित अधिकारी) हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद समजले जाते. ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा 400 गुणांची असते.

पेपर 1 सामान्य अध्ययन - गुण 200

वेळ 2 तास. यामध्ये चालू घडामोडी, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, भारताचा स्वातंत्र्य लढा, भूगोल - महाराष्ट्र, भारत आणि जग, भारताचे संविधान, पंचायती राज, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, अर्थशास्त्र - सामाजिक विकास, दारिद्रय आणि बेरोजगारी, पर्यावरण परिसंस्था, जैवविविधता आणि सामान्य विज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जातात.

पेपर 2 - गुण 200 - वेळ 2 तास

यामध्ये प्रामुख्याने तर्कशक्ती, निर्णय क्षमता, सामान्य बुद्धिमापन चाचणी, अंकगणित (दहावी स्तर), मराठी आणि इंग्रजीमधील सुसंवाद कौशल्य, व्याकरणावर प्रश्न विचारले जातात.

मुख्य परीक्षा

राज्यसेवा (राजपत्रित) मुख्य परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी कसोटी लागते. ही परीक्षा 800 गुणांची असून यामध्ये चार पेपर असतात. प्रत्येक पेपरला 150 गुण, यामध्ये इतिहास, भूगोल, महाराष्ट्राच्या संदर्भासह आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय संविधानाचा प्राथमिक अभ्यास, भारतीय राजकारण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, मानवी संसाधन आणि मानवी हक्क, अर्थव्यवस्था व नियोजन तसेच विकास विषयक अर्थशास्त्र, कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात. मराठी आणि इंग्रजी भाषा यावर प्रत्येकी 100 गुणांचा पेपर असतो. यामध्ये निबंधलेखन, उतारा प्रश्न, व्याकरण यावर प्रश्न विचारले जातात. अंतिम निवडीसाठी 100 गुणांची मुलाखत प्रकिया पार पाडावी लागते.

पीएसआय,एसटीआय आणि सहाय्यक

मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किंचित बदल वगळता या परीक्षांचे स्वरूप एकसारखेच असते. मंत्रालयीन सहायक या पदाला मुलाखत नसून अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाते. पोलीस उपनिरीक्षक (शारीरिक चाचणीसह) आणि विक्रीकर निरीक्षक यांना मुलाखतीची प्रक्रिया पार पाडावी लागते. पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/सहाय्यक या पदासाठी पूर्व परीक्षा 100 गुणांची असते. तीनही पदांसाठी पूर्व परीक्षेचे स्वरूप सारखेच असते. प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. यामध्ये चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, भारतीच घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्रामव्यवस्थापन, इतिहास भूगोल राज्याच्या संदर्भासह, पृथ्वी, हवामान, अक्षांश, रेखांश, जमिनीचे प्रकार, प्रमुख पिके, पर्जन्यमान, शहरे, नद्या, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, आरोग्यशास्त्र, बुद्धिमापन आणि अंकगणित या विषयावर प्रश्न विचारले जातात.

मुख्य परीक्षा - वरील तीनही पदांसाठी मुख्य परीक्षेला दोन पेपर असतात. यामध्ये पेपर क्रमांक 1 भाषा असून यामध्ये इंग्रजी या विषयावर 40 गुणांचे तर मराठी विषयावर 60 गुणांसाठी असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात. यामध्ये व्याकरण, उतारा प्रश्न, वाक्यरचना, म्हणी, शब्दसंग्रह यावर प्रश्न आधारित असतात. पेपर 2 - हा सामान्य अध्ययन 100 गुणांचा असतो. या पेपरमध्ये सर्वसाधारण चालू घडामोडी, राज्य ते जागतिकस्तरावरील, बुद्धिमापन चाचणी, भूगोल भारत आणि जग (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह), इतिहास, माहिती अधिकार, सामाजिक सुधारणा चळवळी, भारताचे संविधान, मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या, महिला संरक्षण, घरगुती हिंसाचार कायदा, कृषी, तंटामुक्ती अभियान, संगणक व माहिती तंत्रज्ञान, अॅट्रोसिटी, मुंबई पोलीस कायदा, पुरावा कायदा, सीआरपीसी आणि आयपीसी यावर प्रश्न विचारले जातात.

मुख्य परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहायक या पदांसाठी पोलीस संदर्भात अभ्यासक्रम तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाऐवजी लेखाकर्म या विषयावर प्रश्न विचारले जातात. पोलीस उपनिरीक्षपदाची मुलाखत 50 गुणांची असून शारीरिक चाचणी 100 गुणांची असते. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अंतिम निवड केली जाते.

कमी वेळात कसे मिळवाल यश

कमी वेळात यश संपादन करण्यासाठी निवड झालेल्या आपल्या मित्रांचा सल्ला व मार्गदर्शन अवश्य घ्या. योग्य मार्गदर्शकांच्या सल्ल्याने योग्य साहित्याचा वापर करावा. सार्वजनिक वाचनालयाचा उपयोग करून प्रतिष्ठित वर्तमानपत्रांचे वाचन करावे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे महागडे क्लास लावू शकत नाहीत. अशांनी खचून न जाता घरूनच वरील विषयाला अनुसरून तयारी करावी. अभ्यासात सातत्य ठेवावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News