विमान उतरविण्याची घाई नको, पहिला वातावरण बघा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • गेल्या काही दिवसांपासून खराब वातावरणामुळे विमान धावपट्टीवर घसरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत
  • एक जुलै रोजी जयपूरहून आलेले स्पाइसजेटचे विमान मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर रनवेवरून घसरले होते. 

नवी दिल्ली - खराब हवामानामुळे सुरक्षेचे निकष डावलून धावपट्टीवर विमान उतरविण्याची घाई केल्यास प्रसंगी दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नागरी उड्डयन संचालनालयाने (डीजीसीए)बजाविले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खराब वातावरणामुळे विमान धावपट्टीवर घसरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे डीजीसीएने विमान कंपन्यांसाठी एअर सेफ्टी सक्‍युर्लर जारी केले होते. गेल्या तीन दिवसांत खराब वातावरणामुळे विमान धावपट्टीवरून घसरल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनेची चौकशी केली जात असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. एक जुलै रोजी जयपूरहून आलेले स्पाइसजेटचे विमान मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर रनवेवरून घसरले होते. 

तत्पूर्वी ३० जून रोजी भोपाळहून सूरतला आलेले स्पाइसजेटचे विमान वादळामुळे उतरवण्यात आले, मात्र ते धावपट्टीवरून घसरले. तसेच, ३० जून रोजी एअर इंडिया एक्‍स्प्रेसचे विमानदेखील मंगळूर विमानतळावरून घसरले आणि नरम मैदानात फसले होते. या पार्श्‍वभूमीवर डीजीसीएने विमान कंपन्यांना इशारा देत खराब वातावरणात ‘अनस्टेबलायज्ड अप्रोच’सह विमान उतरवणे चुकीचे आहे आणि आणखी एक चक्कर मारून पुन्हा उतरवण्याचा प्रयत्न करावा, असे स्पष्ट केले. जर, अशी कृती न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे डीजीसीएने नमूद केले.

अनस्टेबलायज्ड ॲप्रोचचा अर्थ विमान उतरवताना गती, उतरण्याचे प्रमाण, उतरवण्याचा मार्ग आणि लॅंडिंगशी निगडित गोष्टी आणि परवानगी आदी गोष्टींपैकी एक निकष न पाळणे होय. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षतीतेशी तडजोड करता येणार नाही, असे डीजीसीएने 
स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News