आम्हाला धर्मनिरपेक्षतेचा शहाणपणा शिकवू नये, म्हणतात नायडू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019
  • उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी सुनावले
  • हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या धर्म आणि पंथांची भारत ही जन्मभूमी ​

हैदराबाद :  भारत हा अत्यंत धर्मनिरपेक्ष देश असल्याने यासंदर्भात अन्य कोणाकडून धडा घेण्याची आम्हाला गरज नाही, असे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज येथे स्पष्ट केले. धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क घटनेनेच दिल्यामुळे आम्हाला कोणी शिकवू नये, असे यांनी सुनावले.

मुकर्रमजहाँ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात बोलताना ते म्हणाले, की संस्कृती हा जीवनाचा आणि धर्म हा उपासनेचा मार्ग असतो. सहिष्णुतेच्या परंपरेवर भारताची संस्कृती उभी राहिली आहे. घटनेच्या २५ ते २८ कलमांनुसार भारतात धार्मिक स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे, त्यामुळे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. पूर्वी झाले ते विसरून जावे, अशी प्रवचने काही देश आम्हाला देऊ लागले आहेत. पण, सर्वांत धर्मनिरपेक्ष देश म्हणून माझी मातृभूमी भारत अव्वल आहे.

नायडू यांच्या भाषणाला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अहवालाचा 
संदर्भ होता. भारतात अल्पसंख्याकांवरील हल्ले वाढत असल्याचा कांगावा या अहवालात करण्यात आला आहे. भाजपने या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हा अहवाल पक्षपाती असल्याची टीका केली होती. 

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणजे एकमेकांच्या धर्माविषयी आदर बाळगणे ही भारतीय संकल्पना असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या धर्म आणि पंथांची भारत ही जन्मभूमी असल्याचे सांगून ते म्हणाले, की जगातील इस्लाम, ख्रिश्‍चन आणि पारशी हे धर्मीयही भारतात राहतात, असे त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News