व्हॉट्स अॅपवरचा तलाक; त्याला पडला महाग, पहिला गुण्हा ठाण्यातच

दीपक शेलार
Friday, 2 August 2019

ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिला विवाह सरंक्षण कायदा पारित झाल्याने "तलाक तलाक तलाक" हे शब्द मुस्लिमधर्मीय नवरदेवांसाठी एक दुःस्वप्न ठरत आहे. एखाद्या नवरोबाने तीन वेळा तलाक शब्द उच्चारल्यास त्याला कारागृहाची हवा खावी लागू शकते. अशा प्रकारचा पहिला गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

ठाणे - ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिला विवाह सरंक्षण कायदा पारित झाल्याने "तलाक तलाक तलाक" हे शब्द मुस्लिमधर्मीय नवरदेवांसाठी एक दुःस्वप्न ठरत आहे. एखाद्या नवरोबाने तीन वेळा तलाक शब्द उच्चारल्यास त्याला कारागृहाची हवा खावी लागू शकते. अशा प्रकारचा पहिला गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

एका उच्चशिक्षित विवाहितेने पतीसह सासू व नणंद यांनी कौटुंबिक छळ करून पतीने व्हॉट्सएपवरून बेकायदेशीररीत्या तीनवेळा तलाक शब्द उच्चारल्याबाबत गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल केला आहे, हा प्रकार माहे सप्टेंबर 2015 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी, उपनिरीक्षक वाय.आर.पाटील अधिक तपास करीत आहेत.

मुंब्रा कौसा येथील दारुल फलाह मशिदीनजीकच्या फिरदौस इमारतीत राहणाऱ्या 31वर्षीय एमबीए शिक्षित विवाहितेने हा गुन्हा दाखल केला आहे. या पीडितेचा विवाह मुंब्रा येथील अमृतनगरमधील यशोदीप इमारतीत राहणाऱ्या इम्तियाज गुलाम हुसेन पटेल या व्यक्तीशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे झाला.

विवाहानंतर पीडित विवाहिता आपल्या सासरी राहण्यास आली व काही दिवसातच पती व सासरच्या मंडळींनी तिच्याकडे पैश्यांची मागणी करण्यासाठी सुरुवात केली. पीडितेचे आई-वडील गरीब असल्याने तिने आपल्या मैत्रिणीकडून पैसे उसने घेऊन दुचाकी घेऊन दिली. तरीही, पती इम्तियाज पटेल, सासू रिहाना पटेल आणि नणंद सुलताना गुलाम हुसेन पटेल आदींकडून दागिन्यांची आणि पैश्यांची सतत मागणी केली जात होती.

मध्यंतरी इम्तियाज हा अबूधाबी येथे कामानिमित्त जात होता. परंतु, त्याच्याकडूनसुद्धा सतत हुंड्याची मागणी सुरु होती. सप्टेंबर 2017 मध्ये इम्तियाज पत्नीच्या माहेरी रहात होता व तेव्हाच त्याचे एका अन्य महिलेशी अनैक्तिक संबंध असल्याचे पीडितेला समजले. याचा जाब विचारला असता इम्तियाज याने पत्नीला अर्वाच्च शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यांनतर सतत पैश्याची व दागिन्यांची मागणी करत ती पूर्ण होत नाहीसे बघून 30 नोव्हेंबर 2018 रोजी इम्तियाज याने पत्नीला मोबाईलवरून फोन करून तीनदा तलाक हा शब्द उच्चारून तलाक दिला.

त्याने हेच तीन शब्द तिला पुन्हा व्हॉट्स अॅपवर करून त्याचा स्क्रीन शॉट तिच्या आईलादेखील पाठवला.यावेळी पीडिता सात महिन्यांची गर्भवती होती व तिने 6 फेब्रुवारी 2019 रोजी एका बाळाला जन्म दिला.

आपल्याला देण्यात आलेला तीन तलाक हा आता कायद्याने बेकायदेशीर ठरवला असून तिने याविरोधात मुंब्रा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलिसांनी भादंवि कलम 406, 498 अ, 34 सह मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा 2019 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News