जिल्ह्यातील 2 हजार 460 पैकी 450 अंगणवाडीत 'प्रकाश'

समीर मगरे
Wednesday, 10 July 2019
  • जिल्ह्यात 2,460 अंगणवाड्यात आहेत.
  • त्यापैकी केवळ 450 अंगणवाड्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू
     

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात 2,460 अंगणवाड्यात आहेत. त्यापैकी केवळ 450 अंगणवाड्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. इतर अंगणवाड्यांचा वीजपुरवठा खंडित असल्याने या अंगणवाड्यांत अंधार असल्याची माहितीसमोर आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या अंगणवाड्यांमार्फत शासनाच्या लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात येतात. शिवाय पोषण आहार, गरोदर मातांची नोंद, बालकांना वेळेत लस दिले जात आहे की नाही, याची नोंद अंगणवाड्यांमार्फत केली जाते. मात्र, जिल्ह्यातील जवळपास 450 अंगणवाड्यांत वीजपुरवठा सुरू आहे. तर इतर अंगणवाड्यांत वीज देयके भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

शासनातर्फे अंगणवाडी सेविकांच्या  हातात मोबाईल देण्यात आला आहे. यामार्फत अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती व इतर सर्व योजनांची माहिती या मोबाईलमध्ये नोंद केली जात आहे. ग्रामीण भागात अंगणवाड्या झाडाखाली भरविली जात होती. मात्र, या अंगणवाड्यांना बदलत्या युगाबरोबर आणण्यासाठी शासनाने राज्यातील अंगणवाड्यांना लाखो रुपये खर्च करून मोबाईल वाटप केला आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल कशाप्रमाणे हाताळावा, याचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे. 

हा उपक्रम राज्यात एक जुलैपासून सुरूसुद्धा झाला असून, अंगणवाड्यांत बर्‍यापैकी उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, जिल्ह्यातील अंगणवाड्यांत वीजपुरवठाच होत नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंगणवाड्यांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. तरीदेखील याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

 

सभापतींची सरकारकडे मागणी
जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अरुणा खंडाळकर यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सौरप्रणाली बसविण्यात यावी, जेणे करून वीजदेयकांमुळे अंगणवाड्यांना अंधारात राहावे लागणार नाही, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News