‘मराठा’चे ३० हजारांवर दाखल्यांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

महाविद्यालयीन प्रवेशासाठी मागणीत वाढ; दाखल्यांची संख्या जाणार लाखाच्या घरात

सातारा -  मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सर्व प्रकारच्या शैक्षणिक प्रवेशासाठी ‘एसईबीसी’चे दाखले मिळविण्यासाठी आता तहसील कार्यालय व सेतू केंद्रांत गर्दी होऊ लागली आहे. आतापर्यंत सर्व प्रांत कार्यालयांतून मिळून एकूण ३० हजारांवर दाखले देण्यात आले आहेत. अद्यापही हजारो दाखला मागणी अर्ज प्रलंबित आहेत. आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी ‘एसईबीसी’चे दाखले सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या दाखल्यांची संख्या लाखाच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे.

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) दाखला... 
आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गासाठीही उत्पन्नाचा दाखला मिळतो. या प्रवर्गातून प्रवेशासाठीही संधी आहे. त्यामुळे आता अशा प्रवर्गातील मुलांना आगामी तीन महिन्यांत अशा प्रकारचा उत्पन्नाचा दाखला महाविद्यालयात सादर करायचा आहे. त्यासाठी तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला, ६०० चौरस फुटांपेक्षा मोठे घर नसावे, पाच एकरांपेक्षा कमी जमीन असलेले कुटुंब तसेच आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले सवर्ण यामध्ये पात्र ठरतात. या सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच तहसीलदारांकडून हा दाखला मिळतो. 

तालुकानिहाय दिलेले दाखले
आतापर्यंत तालुकानिहाय मराठा दाखले दिलेल्याची संख्या अशी - वाई : २८७०, खंडाळा : १२७९, महाबळेश्‍वर : ४९०, कोरेगाव : १५००, सातारा : ३४००, जावळी : १५००, फलटण : ३४००, कऱ्हाड : ९०००, पाटण : ५९९१, माण-खटाव : १८००. यासोबतच तेवढेच दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सध्या सेतू केंद्रांवर मराठा जातीचे दाखले मिळविण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.

मराठा एसईबीसी दाखला...
मराठा एसईबीसी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वप्रथम शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यप्रत असावी लागेल. त्यात मराठा जातीचा उल्लेख असावा. तसेच १३ ऑक्‍टोबर १९६७ चा जातीचा पुरावा आवश्‍यक आहे. यामध्ये वडिलांचा जन्म १३ ऑक्‍टोबर १९६७ रोजी किंवा त्यापूर्वी झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर मराठा अशी जात नमूद असलेला एक पुरावा आवश्‍यक आहे. पहिली ते बारावीपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला. त्याची सत्यप्रत असणे आवश्‍यक आहे किंवा जन्म-मृत्यू नोंदीचा महसूल अभिलेखातील उतारा अथवा शासकीय, निमशासकीय नोकरीत असल्यास सेवा पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा. अथवा समाजकल्याण खात्याकडील जातपडताळणी समितीने वैध ठरविलेला जातीबाबतचे प्रमाणपत्र यापैकी एक आवश्‍यक आहे. काही कारणांनी वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध नसेल तर घरात १३ ऑक्‍टोबर १९६७ किंवा त्यापूर्वी जन्म झालेले तुमचे भाऊ, बहीण, चुलते, आत्या, आजोबा किंवा रक्ताच्या नातेसंबंधातील व्यक्ती त्यापैकी कोणीही असेल तर त्यावर मराठा अशी जात नमूद असणारा कोणताही एक पुरावा द्यावा.

मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलने, मोर्चे काढले. शेवटी शासनाला या आंदोलनांची दखल 
घ्यावी लागली. त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. पण, या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयात प्रलंबित राहिला. नुकताच उच्च न्यायालयाने या 
याचिकेवर निर्णय देताना मराठा समाजाला शिक्षणासाठी १२ तर नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली. 

त्यामुळे मराठा समाजातील मुलांना व युवकांना शिक्षण व नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांनी आता ‘एसईबीसी’ प्रवर्ग जातीचे दाखले काढण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत २५ हजार दाखले सर्व प्रांताधिकारी कार्यालयांतून दिले गेले आहेत. तेवढ्याच प्रमाणात दाखले मागणीचे अर्ज प्रक्रियेत आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News