निवडणूक लढविण्यावरून मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातील काही जणांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने शिस्तबद्ध असणारा क्रांती मोर्चा दुभंगण्याच्या वाटेवर आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातील काही जणांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने शिस्तबद्ध असणारा क्रांती मोर्चा दुभंगण्याच्या वाटेवर आहे. निवडणूक लढवावी, अशी भूमिका एका गटाने घेतली असून, काही समन्वयकांनी मात्र राजकारणाच्या आखाड्यापासून दूर राहण्याची ठाम भूमिका मांडली आहे.

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली साडेतीनशे वर्षांनंतर समाज रस्त्यावर उतरला, तो कोणत्याही राजकारणात सहभागी होण्यासाठी नाही. मराठा क्रांती मोर्चा ही चळवळ असल्याने तिला राजकारणाच्या आखाड्यात उतरवू नका, असा स्पष्ट इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिला आहे. निवडणूक लढविण्याची इच्छा असणाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षातून उभे राहावून निवडणूक लढवावी, मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीचा वापर राजकारणासाठी करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे काल जाहीर केले. ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे गाजर दाखवून फक्‍त राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याची टीका करत पाटील यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या इतर समन्वयकांनी मात्र याविषयी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 

मराठा क्रांती मोर्चाला राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे स्पष्ट करत पवार यांनी सर्व राजकीय पक्षांमध्ये मराठा नेतृत्व असून, ते समाजाचे काम करतच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली निवडणूक आयोग नोंदणी देत नाही. शिवाय जातीच्या नावाखाली निवडणुका लढविता येत नाहीत आणि मते ही मागता येत नाहीत, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.
 

"मराठा क्रांती मोर्चा ही राजकारण आणि संघटनाविरहित चळवळ आहे. या चळवळीच्या मागे कोणताही राजकीय पक्ष आणि नेता नाही. निवडणुका लढवून दोन-तीन आमदार निवडून आणल्याने समाजाचे भले कसे होणार? राजकारणाच्या बाहेरूनच दबाव आणून समाजाची कामे करता येतील."

- वीरेंद्र पवार, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News