तुळजापूरला विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • शहरातील विद्यार्थ्यांचा दळणवळणाचा प्रश्‍न गंभीर बनला असून, महाविद्यालय-शाळांमध्ये जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने लांबपर्यंत पायी जाण्याची वेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आली आहे.

तुळजापूर - शहरातील विद्यार्थ्यांचा दळणवळणाचा प्रश्‍न गंभीर बनला असून, महाविद्यालय-शाळांमध्ये जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने लांबपर्यंत पायी जाण्याची वेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आली आहे.

शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा दूर अंतरावर आहेत. शहरात स्थायिक आणि दुचाकी असणाऱ्या विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण नाही. मात्र, ज्यांच्याकडे वाहने नाहीत, त्यांचा मोठा प्रश्‍न आहे. शहरात नळदुर्ग रस्त्यावर सुमारे दोन ते तीन किलोमीटरवर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजाभवानी सैनिकी शाळा, जवाहर नवोदय विद्यालय, अशी शैक्षणिक संकुले आहेत.

उस्मानाबाद रस्त्यावर अपसिंगा रस्ता तसेच हडको वसाहत या ठिकाणी काही शैक्षणिक संस्था आहेत. शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी केवळ पहिली ते सातवीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये स्वतःच्या वाहनाची सोय आहे. अन्य महाविद्यालयांत स्वतःची वाहने नाहीत. शहरात दहा रुपये दरावर सोडण्यासाठी वडाप अथवा सहा आसनी रिक्षांची कोणत्याच मार्गावर सोय नाही. पर्यायाने महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी चालतच अनेकांना जावे-यावे लागते.

शहरात छोट्या बसचा अथवा मोठ्या बसमधून महाविद्यालयांच्या वेळेच्या कालावधीत सोय नाही. शहरातील विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा आणि दळणवळणाचा मोठा गंभीर प्रश्‍न आहे. दरम्यान, विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकही असतात. प्रात्यक्षिकासाठी दोन वेळेला विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावे लागते. शहरात एका वेळेला ऑटो रिक्षासाठी एका टप्प्यास ३० रुपये मोजावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची आर्थिक ऐपत नसते. दळणवळणाच्या प्रश्‍नासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

नळदुर्ग रस्त्यावर असणाऱ्या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी एसटीची सोय व्हावी, असे पत्र यापूर्वी एसटी महामंडळाला दिले होते. त्याला बराच कालावधी झालेला आहे. 
- डॉ. संजय कोरेकर, प्राचार्य, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News