नऊ कोटी रुपयांचे रस्ते हवेत बांधले का? भाजपचा चक्क शिवसेनेलाच टोला

सकाळ (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • भाजपचा शिवसेनेला घरचा आहेर;
  • रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्‍याची मागणी

ठाणे : शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यावरून विरोधी पक्षांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला वारंवार लक्ष्य केले आहे. आता तर थेट शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही शहरातील रस्त्यांच्या कामाबाबत शंका उपस्थित केली आहे. यूटीडब्ल्यूटीच्या रस्त्यांच्या कामाची चौकशी झाल्यास रस्ते हवेत बांधल्याचे निदर्शनास येईल, असा घरचा आहेर भाजपच्या वतीने सत्ताधारी शिवसेनेला देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी यूटीडब्ल्यूटीच्या रस्त्यांसाठी तब्बल नऊ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये खड्डे असलेले डांबरी रस्ते घेण्याचा आग्रह धरण्यात आला होता. पण डांबरी रस्त्यांचे यूटीडब्ल्यूटी रस्त्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च आल्यानंतरही शहरातील खड्डेमय रस्त्यांची संख्या का कमी झाली नाही, असा प्रश्न भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी उपस्थित केला आहे.

ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या आठवड्यात तर या खड्ड्यांमुळे घोडबंदर भागात एका मुलाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. ‘जाग’ या संस्थेने तर खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी या खड्ड्यात नारळ वाहण्याचे अनोखे आंदोलन केले होते. अशा वेळी महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही या रस्त्यांच्या कामांची सखोल मागणी केल्याने रस्त्याच्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात यूटीडब्ल्यूटी पद्धतीने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या कामांबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच या एक वर्षातील कामाची चौकशी करण्याची मागणी नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News