उद्योग जगताची 'ती' हिरकणी

अर्चना सोंडे
Tuesday, 30 April 2019

आयुष्यात आपल्या काय करायचे आहे हे कळायला फार उशीर कधीच होत नसतो. कधीही केव्हाही आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करु शकतो. त्यासाठी फक्त जिद्द आणि प्रयत्न करण्याची तयारी स्वतःमध्ये असण्याची गरज असते. तुमची जिद्द आणि प्रयत्न तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी करत असते. अशाच एका जिद्दी हिरकणीची कहाणी.

कांबळे परिवारातील या हिरकणीचा जन्म २५ मे १९७३ रोजी कल्याण मध्ये झाला. माया कांबळे माहेरचे नाव आणि आता त्यांची ओळख अश्विनी अदाटे म्हणून सर्वांना परिचीत आहे. वडील गिरणी कामगार, आई, एक भाऊ आणि एक बहिण असा तिचा परिवार. कुटुंबामधील सर्वात लहान म्हणजे शेंडेफळ असल्याने लाडाची. वडील गिरणी कामगार असले तरी तिन्ही मुलांना इंग्रजी माध्यमामधून शिक्षण दिले. बिनधास्त, बोल्ड स्वभावाची शालेय आयुष्यात कबड्डी चॅम्पियन होती. 

एकदा मुंबईला एकट्याचे प्रवास करायचा आहे असा हट्ट तिने वडिलांकडे केला. कल्याणवरुन परळला एका नातेवाईकाकडे तिला यायचे होते. वडिलांना तिने सांगितले मला एकट्याने जायचं आहे. मी कधी प्रवास करणार? त्यावेळी ती सातवी- आठवी मध्ये होती. सुरुवातीला वडीलांनी तिला समजावले. पण तिचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी तिला होकार दिला, एकटीने प्रवास करण्यासाठी. त्यांनी तिला कल्याणवरुन तिकीट काढून दिले आणि गाडीमध्ये बसविले. मग तिचा एकटीचा प्रवास सुरु झाला. आनंदाने तिनं कल्याण ते परेल हा प्रवास एकटीने केला. नातेवाईकांच्या घराजवळ पोचताच तिच्या बाबाने तिला एक डोक्यात टपली मारली. अरेच्चा बाबा तुम्ही... तर ते तिला हसत म्हणाले, बाळा तु बरोबर जातेयस का बघत होतो फक्त. या सर्व प्रकारामुळे कुठे ना कुठे बाबांनी तिचा आत्मविश्वास वाढविला होता. जिद्द आणि बिनधास्तपणातील तिचा आत्मविश्वास बाबांमुळे तिला मिळाला होता.
 
पुढे बारावी सायन्स शिक्षण घेऊन डेन्टिस्ट व्हायचे होते. पण लातूरच्या दंतवैद्यक महाविद्यालयात नंबर लागल्याने तिकडे जाणे आणि शिक्षण घेणे त्यावेळी परवडण्यासारखे नव्ह्ते. मुंबईमध्येच नर्सिंगचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. जी. टी हॉस्पिटलला तीन वर्षाचा डिप्लोमा केला. शिक्षणासाठी घरापासून दूर हॉस्टेलला राहण्याची पहिलीच वेळ होती. आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ, शिकण्याचा, स्वतःला घडविण्याचा हाच होता. 
हॉस्पिटलमध्ये लोकांची मनोवृत्ती, समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची जिद्द या काळात अश्विनीला घडवत गेली. परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर टाटा इस्पितळात नोकरी लागली. त्याच दरम्यान १९९८ मध्ये दत्तात्रय अदाटे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. 

सर्व आयुष्य सुरळीत चाललेले असताना काही तरी कमी आहे. आपण आयुष्यभर ही नोकरी नाही करु शकत. एका चौकटीमध्ये आयुष्य अडकले आहे असे त्यांना वाटत होते. डॅशिंग, बिनधास्त, बोल्ड स्वभावाची मुलगी हरवत गेली होती याची जाणीव तिला या काळात होत होती. काही तरी करायचं या विचारात असताना पती, दत्तात्रय अदाटेंकडून तिला पथिक संस्थेबद्दल माहिती मिळाली. 

२००४ मध्ये पथिकचा व्यावसायिकांसाठी असलेला अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. अश्विनीच्या आयुष्यातील टर्निंग पॉंईट म्हणता येईल तो हाच. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नवीन विचार, नवीन मार्ग त्यांना दिसत होते. फिरण्याची आवड, कुटुंबासाठी सहलीचं नियोजन करणं या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ट्रॅव्हल्स टूर्समध्ये आपण व्यवसाय करायचा असे ठरवले आणि त्या दृष्टीने प्रवास सुरु झाला. जिद्द आणि प्रयत्न सोबत नवीन काही तरी करण्याची, शिकण्याची ऊर्मी अश्विनीमध्ये असल्यामुळे नोकरी सोडून व्यवसाय करण्याची जोखिम त्यांनी घेतली. 

सुरवातीच्या काळात ज्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे. त्या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सकाळी नोकरी आणि संध्याकाळी अभ्यास करता येईल असे प्लॅनिंग केले. ट्रॅव्हल्स टूर्स क्षेत्रातील काम करणारे लोकं जे कित्येक वर्ष या क्षेत्रात आहेत त्यांना भेटून त्यांचे अनुभव एकले. अशाच सचिन ट्रॅव्हल्सचे सचिन जकातदार यांना भेटली. त्यांचा व्यवसायातील प्रवास जाणून घेतला. मग हळूहळू जेव्हा या क्षेत्रात आपण काम करु शकतो असा आत्मविश्वास आला तेव्हा नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसायासाठी वेळ देण्याचा निर्णय अश्विनीने घेतला. 

आयुष्यात आतापर्यंत जे मिळत आहे ते घेत गेलो. स्ट्रगल असा काही आला नव्हता आतापर्यंत. पण आता व्यवसायात असताना रोज नवीन जोखिम घ्यावी लागत आहे याची जाणिव होऊ लागली. अनुभव घेण्यासाठी एका टूर कंपनीत काही काळासाठी उमेदवारी केली. टुर्स कशा प्लॅन केल्या जातात, क्लायंट सर्व्हिस काय असते, हॉटेल बुकींग, अशा विविध छोट्या छोट्या पण महत्वाच्या नवीन कामांची ओळख त्यांना इकडे झाली.

२००८ मध्ये चिनू टुर्स ट्रॅव्हल्सच्या नावाने व्यवसायास सुरवात केली. सुरवातीच्या काळात एक टूर मॅनेजर त्यांनी कामासाठी घेतला. ज्याला या क्षेत्रातील सगळी माहिती होती. त्याच्या अनुभवाने तो क्लायंटला सर्विस देत होता. बुकिंगपासून क्लाय़ंटचे प्लॅन, त्यांना टूरला घेऊन जाणं हे सर्व तो स्वतः करत होता आणि अश्विनी त्याच्याकडून शिकत होत्या. व्यवसायामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची उत्तम सर्विस या विचाराच्या अश्विनी असल्याने त्यांनी त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले. काही टुर्सचे जसे चांगले अनुभव होते तसे वाईट अनुभव देखील येत होते. कुठेतरी सर्विसला तडा जात आहे याची त्यांना जाणीव झाली वाईट अनुभव हा शिदोरी म्हणून सोबत ठेवला आणि आता पूर्णपणे जबाबदारी हाती घेतली. मॅनेजरकडून खूप काही शिकायला मिळाले होते त्याचवेळी गेल्या काही वर्षापासून या क्षेत्राचा अभ्यासही तिचा चालू होता. आता वेळ होती ते स्वतः सगळं करण्याची. 

सुरुवातीला मार्केट काय आहे ते पाहिले. आपण कोणासोबत काम करु शकतो. वेंन्डर्सना स्वतः जाऊन भेटत होत्या. स्वतःची कंपनी समजून काम करणाऱ्यांची गरज त्यांना होती. आणि यासाठी त्या जिद्दिने कामाला लागल्या होती. पुरुष प्रधान व्यवसायात सुरुवातीला प्रत्येक महिलेला मन:स्तापाला सामोरे जावे लागते. तेच हिला सुद्धा करावे लागले. हॉटेल सोबत डिल करताना, विविध ठिकाणच्या कार वेंडर्ससोबत डिल करताना अडचणी येत होत्या. पण त्या एक आव्हान समजून आपला मार्ग काढत होत्या. सर्वाना आपुलकीने त्या स्वतःच्या व्यवसायासोबत जोडत होत्या. परिणामी त्यांची सेवा चांगली झाली. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला. 

व्यवसायाच्या सुरुवातीला अलिबाग, एक दिवसाच्या टुर्स करणाऱ्या अश्विनी अदाटे आता श्रीलंका, काश्मिर, नैनिताल, गोवा, महिलांसाठी स्पेशल टुर्स घेऊन जाऊ लागल्या. प्रत्येक पर्यटकांचा प्रवास हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असावा अशीच सर्विस त्यांना देण्याचा प्रयत्न वर्ड क्लास हॉलिडेजचा आहे. तशी त्यांची टॅगलाईन “क्रियेटिंग बेस्ट मोमेन्ट ऑफ युर लाईफ” अशी आहे.  

या व्यवसायात त्या वैयक्तिक टुर्स प्लॅन करुन देऊ लागल्या. मधुचंद्रासाठी जाणाऱ्या जोडप्यांसाठी त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या बजेटमध्ये टुर्स प्लॅन करुन देऊ लागल्या. आता वर्ल्ड क्लास हॉलिडेज सर्वांच्याच ओळखीचे झाले आहे. उत्तम दर्जाचे कामच तुमची ओळख असते असे अश्विनी स्वत:च्या अनुभवाने सर्वाने सांगतात. 

वर्ड क्लास हॉलिडेजच्या सेवा आता हनिमुन टुर, फॅमिली टुर, आयव्ही टुर, बुद्धिस्ट सर्किट टुर, महिलांची स्पेशल टुर, देवदर्शन टुर, जेष्ठ नागरिकांसाठी टुर या सर्व क्षेत्रात आहे. 
आंतरराष्ट्रीय टुर मध्ये थायलंड, हॉगकॉंग, श्रीलंका, सिंगापूर, नेपाल, मॉरिशस, मलेशिया, दुबई या सर्व ठिकाणी घेऊन जाते.

 डोमॅस्टिक टुर मध्ये अंदमान, दार्जिलिंग, हिमाचल, काश्मिर, मध्यप्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा, झारखंड, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, गुजरात, कर्णाटक, लक्षद्वीप, ओरिसा, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी घेऊन जातात.

 पुढे या व्यवसायामुळे डिक्की संस्थेसोबत ओळख झाली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना उद्योजिका बनविण्याचे स्वप्न आहे. येत्या पाच वर्षात काही महिलांना नक्की त्या घडवतील असा विश्वास त्यांना आहे. अशा या एक परिचारिका ते उद्योजिकेच्या प्रवासाला ’ती हिरकणी’चा सलाम!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News