पावसाचा थेंब अन्‌ थेंब जिरवणार; तरुणांचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • पावसाचा थेंब अन्‌ थेंब जिरवण्याचा निर्धार; ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
  • भविष्यात गावाला पाणीटंचाईसारख्या संकटाला तोंड द्यावे लागू नये, यासाठी गावात पडणारा पावसाचा थेंब अन्‌ थेंब जिरवण्याचा निर्धार येळगावातील तरुणांनी केला आहे.

सातारा - भविष्यात गावाला पाणीटंचाईसारख्या संकटाला तोंड द्यावे लागू नये, यासाठी गावात पडणारा पावसाचा थेंब अन्‌ थेंब जिरवण्याचा निर्धार येळगावातील तरुणांनी केला आहे. त्यासाठी गावशिवारात जलसंधारणाच्या कामांना सुरवात केली आहे. त्याला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गाव जलसमृद्ध बनवण्याकरिता येळगावचे तरुण सरसावले आहेत. 

कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागात वसलेल्या या गावात पावसाचे प्रमाण चांगले आहे. तरीही १५ ते २० वर्षांपूर्वी येथे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे. मात्र, या विभागाचे तत्कालीन लोकप्रतिनिधी विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मतदारसंघात राबवलेल्या ‘गाव तेथे बंधारा’ या योजनेंतर्गत येथे सात-आठ वर्षांपूर्वी मध्यम प्रकल्प साकारला गेला. त्यामुळे येथील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवले गेले. सध्या येथे पाण्याची फारशी टंचाई जाणवत नाही. मात्र, दिवसेंदिवस धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत चालल्याचे निरीक्षण येथील एक युवक राहुल पाटील यांच्या निदर्शनास आले.

योगायोगाने काही दिवसांपूर्वी गावची ग्रामसभा होती. या ग्रामसभेत त्याने हा विषय मांडला. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणी फाउंडेशनसारखी योजना राबवण्याची गरज असल्याचे त्याने ग्रामस्थांना माहिती पत्रकाद्वारे पटवून दिले आणि पावसाचे पडणारे सर्व पाणी अडविण्यासाठी आपणही पाणी फाउंडेशनसारखी लोकसहभागातून योजना राबवण्याचे आवाहन केले. त्याला सरपंच मन्सूर इनामदार, उपसरपंच संतोष माने, ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत शेवाळे, प्रवीण पाटील, रमेश शेटे आदींसह युवकांनी प्रतिसाद दिला आणि येळगाव पाणी फाउंडेशन मोहीम राबवून गावच्या शिवारात जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय झाला. लगेच ‘व्हॉट्‌सॲप’द्वारे यासाठी आर्थिक व श्रमदानाची मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले.

त्याला मुंबईस्थित व गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन दिवसांमध्ये साठ हजारांवर देणगी जमा झाली. याकामी गावचे सुपुत्र असणारे व पाणी फाउंडेशनचे काम करणारे अमित पाटील यांची मदत घेण्याचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाणीटंचाईवर यशस्वी मात केलेल्या गोपूज (ता. खटाव) या गावाला भेट देऊन तेथील कामांची पाहणी करण्यात आली. या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची  येळगावमध्ये बैठक घेऊन मार्गदर्शन घेण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शिवारफेरीचे आयोजन करून पाणी जिरवण्याच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करण्यात आली.

आता येळगाव धरण परिसरात जेसीबीच्या मदतीने काम सुरू असून, प्रचंड उन्हातही गावातील तरुण मंडळी कामाच्या ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर सलग समतल चर खोदाईचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जिरण्यास मोठी मदत होणार असून, धरण, विहिरी, बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. विभागामध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे येळगाव हे पहिले गाव ठरणार असून, युवकांच्या या धडपडीचे डोंगरी भागात मोठे कौतुक होत आहे. यासाठी सरपंच इनामदार, उपसरपंच माने, शेवाळे, शेटे, राहुल पाटील, अमित पाटील, बाजीराव नानेगावकर, विजय पवार, अक्षय मोरे, प्रशांत साळुंखे, प्रवीण पाटील, आनंदा शेवाळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News