शिक्षकांचे बीएलओ पद रद्द करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019
  • तालुक्‍यात अनेक मतदान केंद्रांवर तालुक्‍यातील शिक्षकांची मतदानस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कन्नड : तालुक्‍यात अनेक मतदान केंद्रांवर तालुक्‍यातील शिक्षकांची मतदानस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती तालुक्‍यातील शैक्षणिक कार्यावर विपरीत परिणाम करणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून शिक्षकांची बीएलओ म्हणून केलेली नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी नायब तहसीलदार शेख हारून यांच्याकडे सोमवारी (ता. २९) निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, की तालुक्‍यातील शालेय गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने जिल्ह्यात सर्व परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकांच्या अशा प्रकारे नियुक्‍त्या झाल्यामुळे त्यांना वर्गावर हजर राहता येणार नाही. त्याचा कॉपीमुक्त  धोरणाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होणार आहे. याशिवाय शिक्षकांच्या अशाप्रकारे नियुक्ती करण्याबाबत न्यायालयाचा आदेश असूनही कन्नड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना बीएलओची कामे देण्यात आले आहेत.

 निवडणूक मतदान प्रक्रियेत शिक्षक वर्ग प्रशासनाला सहकार्य करतच असतात. परंतु, बीएलओची अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नये. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आरेफ हाश्‍मी,  सुधाकर शेजवळ, रवी राठोड, अनिल गायकवाड, युवराज बनकर, कैलास जाधव, अनिल आल्हाड, असिफ अली यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News