शाळकरी विद्यार्थ्यांना दाखवणार जबरदस्तीचा ‘सुपर थर्टी’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • शिक्षण विभागाने काढले आदेश, कार्यवाहीचा अहवालही मागविला

जालना - प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तळागाळातील मुलांना उच्चशिक्षणाचे ध्येय देणारा शिक्षक व त्याचे विद्यार्थी यांच्यावर आधारित ‘सुपर थर्टी’ हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना दाखवावा, असे फर्मानच शिक्षण विभागाने काढले आहे, हे विशेष. रविवारी  जालना शहरातील चित्रपटगृहात शाळा, शिकवणीवर्गासह पालकांची गर्दी दिसून आली.

जिल्हा परिषद जालना माध्यमिक शिक्षण विभागाने शनिवारी गटशिक्षणाधिकारी यांना एक विशेष आदेशच काढले आहेत. यात म्हटले आहे, की सत्य घटनेवर आधारित असलेला विद्यार्थी अन्‌ शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. शाळांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविण्यासाठी नियोजन करावे असेही आदेशात म्हटले आहे. शिक्षक तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी काय धडपड करतो आणि स्वखर्चाने मोफत शिक्षण देऊन ३० विद्यार्थ्याना सुपर कसा बनवितो हा प्रवास प्रेरणा देणारा आहे.

शहरातील चित्रपटगृहाच्या मालकांनी शिक्षण विभागाला याबाबत लेखी निवेदन दिले आहे. खास विद्यार्थ्यांसाठी सवलत दरही ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवावा असे आदेश देत याबाबत कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असेही गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी शहरातील चित्रपटगृहांत हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. शहरातील एका सिनेमागृहात रामगनर येथील शाळेतील विद्यार्थ्यांची गर्दी होती. शहरातील भाग्यनगर परिसरातील अभिजात कोचिंग क्‍लासेसने चक्‍क सर्वच विद्यार्थ्यांना ‘सुपर थर्टी’ चित्रपटाला नेले आहे. शालेय मुलांमध्ये आत्मविश्‍वास अन्‌ जिद्दीने यश कसे मिळविता येते याचा वस्तुपाठ देणारा हा चित्रपट आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा हा प्रेरणादायी चित्रपट असल्याची प्रतिक्रिया गिरीश राखे यांनी दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News