निवड समितीने दुर्लक्षित केल्यामुळे रायडूने दिली सोडचिठ्ठी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे महाव्यवस्थापक साबा करीम यांना ई-मेल पाठवून रायुडूने आपला निवृत्तीचा निर्णय कळविला असल्याचे ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सांगितले.
  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये रायडूने हैदराबाद, बडोदा, आंध्र आणि विदर्भ अशा चार राज्य संघांचे प्रतिनिधित्व केले. 

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक क्रिकेट संघनिवडीपासून ते बदली खेळाडूंच्या पाठवणीपर्यंत निवड समितीने सातत्याने दुर्लक्षित केलेला मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायडूने अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे महाव्यवस्थापक साबा करीम यांना ई-मेल पाठवून रायुडूने आपला निवृत्तीचा निर्णय कळविला असल्याचे ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सांगितले.

रायुडूने आपल्या निवृत्तीच्या ई-मेलमध्ये बीसीसीआयसह देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या सर्व राज्य संघटनांचे आभार मानले आहेत. ‘मी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

सर्व प्रकार आणि स्तरांवरील क्रिकेटमधून आपण निवृत्त होत आहोत. मला देशाकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, यासाठी ‘बीसीसीआय’ आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत विविध राज्य संघटनांनी मला त्यांचे प्रतिनिधित्व करू दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे,’ असे रायडूने पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये रायडूने हैदराबाद, बडोदा, आंध्र आणि विदर्भ अशा चार राज्य संघांचे प्रतिनिधित्व केले. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यापासून रायडू हे नाव चर्चेत होते. रायडूला वगळण्यावरून अनेक स्तरांवरून ऊहापोह झाला. अखेर निवड समितीने त्याला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले. त्यानंतरही दुखापतीमुळे खेळाडू बदलण्याची वेळ आली, तेव्हादेखील त्याला दुर्लक्षितच ठेवले. 

ट्विटरवरची नाराजी भोवली
विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर झाला तेव्हा निवड समितीने ‘तिहेरी क्षमता असल्यामुळे विजय शंकरची निवड करण्यात आली असे सांगितले. त्या वेळी रायडूने ‘विश्‍वकरंडक स्पर्धा पाहण्यासाठी आपण आता नव्या थ्रीडी चष्मा मागविला असल्याचे ट्विट करून वाद ओढवून घेतला होता. 

रायडूने निवृत्तीसाठी काही कारण दिले नसले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करताना सातत्याने दुर्लक्षित केल्याची खंत त्याच्या मनात कुठेतरी असणारच आणि त्यामुळेच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला हेच खरे, अशी चर्चा आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News