निर्णय

रुपाली पुराणिक
Thursday, 28 February 2019

रागाने लाल झालेले प्रियाचे डोळे अक्षरशः आग पाखडत होते. संतापाने ती पेटून उठली होती. तिला अशा अविर्भावात पाहून राजनला काय करावं काहीच सुचत नव्हतं. नेहमीच शांत व संयमी असणाऱ्या त्याच्या प्रियाने अचानक एवढं उग्र रूप धारण केलं त्यामागे नक्कीच काहीतरी भयंकर घडलेलं असणार हे मात्र त्याने ताडलं होत. राजन, तासाभरात आईंना त्यांची बॅग भरून तयार रहायला सांग आजपासून त्या वृद्धाश्रमात रहाणार आहेत . घरकुल नावाच्या एका वृध्दाश्रमात मी सगळ्या formalities पूर्ण करून आले आहे. असं एका दमात सांगून प्रिया गप्प झाली .

रागाने लाल झालेले प्रियाचे डोळे अक्षरशः आग पाखडत होते. संतापाने ती पेटून उठली होती. तिला अशा अविर्भावात पाहून राजनला काय करावं काहीच सुचत नव्हतं. नेहमीच शांत व संयमी असणाऱ्या त्याच्या प्रियाने अचानक एवढं उग्र रूप धारण केलं त्यामागे नक्कीच काहीतरी भयंकर घडलेलं असणार हे मात्र त्याने ताडलं होत. राजन, तासाभरात आईंना त्यांची बॅग भरून तयार रहायला सांग आजपासून त्या वृद्धाश्रमात रहाणार आहेत . घरकुल नावाच्या एका वृध्दाश्रमात मी सगळ्या formalities पूर्ण करून आले आहे. असं एका दमात सांगून प्रिया गप्प झाली . एव्हाना राजनची आई सुलोचना बाई व दोन्ही मुली आर्या व ओवी गोंधळलेल्या अवस्थेत हॉल मध्ये उपस्थित झाल्या होत्या.
 
तुझं डोकं ठिकाणावर आहे प्रिया ? काय बोलते आहेस तू ? आई आणि वृध्दाश्रमात ? I think you have gone mad . आजपर्यंत माझं डोकं ठिकाणावर नव्हतंच राजन आजच ते ठिकाणावर आलं आहे आणि म्हणूच मी हा निर्णय घेतलाय आणि तो ठाम आणि अटळ आहे . प्रिया निग्रहाने बोलत होती . तिच्या अशा वागण्याने राजन कमालीचा भांबावला इतक्या वर्षात तीच हे रूप तो प्रथमच पहात होता . नेमकं काय झालय प्रिया मला सांगशील ? राजन आता काकुळतीला आला होता . तशी दुःखातिरेकाने प्रिया बोलू लागली एक एक अक्षर उच्चारण तिला जणू कठोर शिक्षेसारखच वाटत होत . राजन तुझ्या बहिणीने रश्मीने माझ्या वडिलांना काल वृध्दाश्रमात पाठवलय . हे ऐकताच राजन पुरता हादरला . सुलोचनाबाई पण मटकन खालीच बसल्या इतका वेळ प्रयत्नांची पराकाष्ठा करून थांबवलेले त्यांचे अश्रू गाला वरून घळाघळा वाहू लागले. ओवी व आर्या भेदरलेल्या कोकरासारख्या एकमेकींकडे बघू लागल्या . अरे त्या देव माणसाने उभ्या आयुष्यात कधी कुणालाच दुखावल नाही त्याच्याच वाट्याला आज हे दुःख ? त्यांच्या घरातून त्यांना अक्षरशः घालवून दिल ? असं म्हणून प्रिया ओक्साबोक्शी रडू लागली. तिला शांत करण्याचं धाडस सुलोचनाबाई व राजन दोघां पैकी कुणातच नव्हतं . दुःखाच्या भरात ती बोलत होती आईच्या पश्चात माझ्या दादांनी कधीच एक कपभर चहा देखील रश्मीला मागितला नाही आणि तिनेही आपणहून कधीही तो दिला नाही . त्यांची सगळी काम ते स्वतः करत . पहिल्या पासून सुनेचं कोडकौतुक करणाऱ्या माझ्या दादांनी पोटच्या पोरी प्रमाणेच तिला जीव लावला . त्याचे पांग हे असे फेडले तुझ्या बहिणीने . राजन मनातल्या मनात खूपच खजिल झाला होता . सुलोचनाबाईंच्या तोंडून तर शब्दच फुटत नव्हता . एकीकडे कर्तव्यनिष्ठ सून तर दुसरी कडे भावनाशून्य पोटची मुलगी . अपराधी भावनेने त्या गोठल्यासारख्या झाल्या होत्या. रश्मीची आई असल्याची त्यांना लाज वाटू लागली होती. तू शांत हो प्रिया आपण ह्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढूया .

 राजन समजावणीच्या स्वरात म्हणाला, मी समजावतो रश्मीला जयंतालाही तिच्याशी स्ट्रिक्ट च रहायला सांगतो. किंवा असं करूया का ? दादांना इथेच घेवून यायचं का आपल्याकडे रहायला ? तशी प्रिया कळवळून म्हणाली आता काहीही केलं तरी माझ्या दादांचं तुटलेलं हृदय सांधल जाईल का पुन्हा ? त्यांचा दुखावलेला स्वाभिमान सुखावेल ? ते आता तिथून कुठे ही जाणार नाहीत . ते एक सेवाभावी डॉक्टर आहेत . तिथे सगळ्यांना आपली नि:स्वार्थ सेवा व प्रेम देऊन लवकरच सगळ्यांची मन जिंकून घेतील ते . पण स्वत:च्या मनातील सल ते कधीही कुणाला दिसू देणार नाहीत .
तसा राजन हळवा होऊन म्हणाला रश्मीचा अपराध अक्षम्य आहे प्रिया ह्यात वादच नाही पण त्याची शिक्षा आईला का ? तिची काय चूक आहे ह्यात ? आईंची काहीही चूक नाही हे मला अगदी मान्य आहे राजन पण कस असत ना ? काही लोक असे असतात की कोणत्याही दुःखाची जाणीव त्यांना स्वतःच्या पुढ्यात ते दुःख आल्याशिवाय होतच नाही व तोच प्रसंग स्वतः भोगल्याशिवाय त्यांना आपली चूकही कळत नाही म्हणून नाईलजाने मला हा मार्ग निवडावा लागला शक्य असल्यास मला माफ करा . नाही प्रिया मला हे नाही पटत असं काहीतरी राजन बोलत असतानाच सुलोचनाबाईंनी त्याला मध्येच थांबवत म्हटलं राजन , प्रियाचं म्हणणं मला पटलंय मी आश्रमात जाणार नक्की जाणार . तू आता तिला काहीही समजावू नकोस व मलाही अडवू नकोस असं म्हणून त्या निघायच्या तयारीला लागल्या . राजनची अस्वस्थता वाढत होती पण तो काही करू शकत नव्हता. काही वेळातच सुलोचना बाई बॅग घेवून बाहेर पडल्या. आयुष्यभराच्या सुखदुःखाच्या क्षणांचं साक्षीदार असलेलं घर सोडून जाताना त्या अत्यंत सैरभैर झाल्या होत्या. दोन्ही नातींना त्यांनी छातीशी कवटाळलं. घराच्या पायरीला त्यांनी शेवटचा नमस्कार केला आणि त्यांचं हृदय उचंबळून आलं. हे दृश्य पाहून प्रियाचं काळीजही हेलावलं. पण लगेचच तिने स्वतःला सावरलं.

सगळे गाडीत बसले व आश्रमाच्या रस्त्याने गाडी धावू लागली. तशी प्रियाच्या मनात जुन्या आठवणींनी गर्दी केली. तीच लग्न झालं आणि ती ह्या घरात आली. नव्या नवरीची सगळीच हौस मौज तिच्या सासूबाईंनी मनापासून पुरवली . राजनही तेवढाच मनमिळाऊ व प्रेमळ असल्याने मस्त ट्युनिंग जमलं दोघांचं. हसत खेळत अगदी सहजपणे ती घरात रुळून गेली. प्रियाची अल्लड नणंद रश्मी व एकुलता एक भाऊ जयंत ह्यांचा एकमेकांवर जीव जडला आणि एका सुंदर प्रेमकथेच यशस्वी लग्नात रूपांतर झालं. इकडे प्रियाचा संसारवृक्षही सर्वार्थाने बहरत होता. सगळं काही सुरळीत सुरु असताना आज हे काय होवून बसलं? प्रियाचं मन विव्हळत होत. सासूबाईंची विविध रूपं व स्वभावछटा तिच्याच नकळत तिच्या डोळ्यांपुढे फिरत होत्या . ज्या दुःखात आपले वडील होरपळताय त्याच दुःखाच्या अग्नित आपण आपल्या सासूबाईंना अकारण का ढकलतोय ? रश्मीने केलेल्या कृत्यांचा फळ योग्य वेळ येताच परमेश्वर तिला देईल ह्यात शंकाच नाही. पण झाल्या प्रकारात सासूबाईंचा बळी का जाऊ देतोय आपण ? भावनांच्या क्षणिक आवेगात आपण हे काय करायला निघालोय ह्या विचाराने ती अत्यंत व्यथित झाली. एक स्त्री जी आयुष्यभर घराच्या सुखासाठी अविरत झटली. वेळप्रसंगी आपल्या आशा , आकांक्षा , भावना व गरजांचाही तिने बळी दिला व घराचं घरपण जिवंत ठेवलं अशा त्यागमूर्तीला आपण वृद्धाश्रमात पाठवतोय ? नवरात्रात घरोघरी देवीची स्थापना, पूजा , अर्चा झाली आणि आपण आपल्या घरातल्या चैतन्यमय देवीलाच घरापासून दूर करतोय ? ह्या सगळ्या विचारांनी प्रियाच्या जीवाचा थरकाप झाला आणि तिला रडूच कोसळल तशी ती जोरात ओरडली , राजन गाडी थांबव आई कुठेही जाणार नाही त्या त्यांच्या घरातच राहतील कारण त्या जातील तर घर , घर नाही रे राहणार . आई मला माफ करा आज मी हे काय अघटित करायला निघाले होते ? पण वेळीच देवाने माझे डोळे उघडले मला क्षमा कराल न आई ? असं म्हणत ती सुलोचनाबाईंच्या कुशीत शिरली त्यांच्याही डोळ्यातुन अखंड अश्रूधारा वाहू लागल्या . त्यांनी प्रियाला हृदयाशी धरले व म्हणाल्या , मी तुझ्या वर रागावलेच नव्हते बाळ कारण मला माहिती आहे कस्तुरी च्या पोटात फक्त सुगंध आणि सज्जनांच्या अंतरंगात कायम सदभावना व प्रेम ह्यांचाच दरवळ असतो. अग अजूनही ह्या जगात तुझ्या सारख्या स्वच्छ सुंदर व निर्मळ मनाचे लोक अस्तित्वात आहे आणि त्याच जोरावर तर हे जग टिकून आहे असं म्हणून त्या प्रियाच्या मिठीत विसावल्या . हे सगळं पाहून कृतकृत्य झालेला राजन भरल्या डोळ्यांनी हा अपूर्व सोहळा बघतच राहिला . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News