वादविवाद आणि त्यानंतर होणारं प्रेम...

संतोष भिगार्डे
Saturday, 6 July 2019
  • दोन भिन्न जातीतील तरुण-तरुणी सुरुवातीला त्यांच्यामध्ये होणारे वादविवाद आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे प्रेम... हा फॉर्म्युला बॉलीवूडसाठी काही नवीन राहिलेला नाही.
  • यापूर्वी अशा कथानकांवर बेतलेले चित्रपट आलेले आहेत. ‘मलाल’ हा चित्रपट त्याच पठडीत बसणारा असला, तरी त्याची मांडणी काहीशी वेगळी आहे.

दोन भिन्न जातीतील तरुण-तरुणी सुरुवातीला त्यांच्यामध्ये होणारे वादविवाद आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे प्रेम... हा फॉर्म्युला बॉलीवूडसाठी काही नवीन राहिलेला नाही. यापूर्वी अशा कथानकांवर बेतलेले चित्रपट आलेले आहेत. ‘मलाल’ हा चित्रपट त्याच पठडीत बसणारा असला, तरी त्याची मांडणी काहीशी वेगळी आहे. ‘७ जी रेनबो कॉलनी’ या तमीळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. 

अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिझान आणि संजय लीला भन्साळी यांच्या बहिणीची मुलगी शर्मिनने या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘टिग्या’ हा मराठी आणि ‘देख इंडियन सर्कस’ हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या मंगेश हाडवळेने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. संजय लीला भन्साळी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

 

लव्हस्टोरी हाताळण्यात संजय लीला भन्साळी यांचा चांगलाच हातखंडा आहे आणि या चित्रपटामध्येदेखील चाळीत राहणाऱ्या तरुण आणि तरुणीची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. शिवा (मिझान जाफरी) हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मराठमोळा मुलगा. तो काहीही काम करीत नाही. तो टपोरी असून उनाडक्‍या करीत असतो. त्यामुळे त्याच्या वडिलांचे आणि त्याचे सतत भांडण होत असते. त्याचदरम्यान या चाळीत आस्था त्रिपाठी (शर्मिन सेहगल) राहायला येते. ती खूप हुशार आणि दिसायला सुंदर असते. ती सीएच्या परीक्षेची तयारी करीत असते. तिचे आई-वडील एका श्रीमंत मुलाशी तिचे लग्न लावणार असतात. त्याबाबतची बोलणी झालेली असतात. त्याचदरम्यान हळूहळू शिवा आणि आस्थामध्ये प्रेमाचा अंकुर फुलत जातो. सुरुवातीला त्यांच्यामध्ये काही वाद होतात खरे. पण नंतर ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतात. मग त्याचे प्रेम यशस्वी होते का... त्यांच्या प्रेमात कशा प्रकारचे अडथळे येतात... हे सगळे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल. 

मिझान जाफरी आणि शर्मिन सेहगल ही जोडी पडद्यावर छान दिसली आहे आणि दोघांनीही चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. शर्मिन इनोसंट आणि सुंदर दिसली आहे. मिझानने शिवाच्या भूमिकेमध्ये आपली चमक आणि धमक दाखविली आहे. तो हिंदी चित्रपटसृष्टीत लाँग इनिंग खेळेल असे वाटतेय. अन्य कलाकारांची कामे छान. चाळ, दिवाळी-गणेशोत्सव आदी सण आणि चाळीतील संस्कृती कला-दिग्दर्शकाने छान उभारली आहे. दिग्दर्शक मंगेश हाडवळे आणि सिनेमॅटोग्राफर यांनी ती छान टिपली आहे. संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट म्हटलं की भव्य-दिव्य सेट्‌स आणि मोठा तामजाम; परंतु या चित्रपटात तसे काहीही दिसणार नाही.

चित्रपटाचे संगीत उत्तम आहे. संगीताला मराठमोळा टच लाभलेला आहे. तरीही चित्रपटाची पटकथा काहीशी कमजोर वाटते. चित्रपटामध्ये ज्या वेगाने घडामोडी घडणे आवश्‍यक आहे, ते घडताना दिसत नाही. साहजिकच त्यामुळे निराशा पदरी पडते. प्रेमाची हळुवार फुंकर घालणारी ही एक लव्हस्टोरी आहे, असेच म्हणावे लागेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News