माणसाचा अंतिम पडाव

श्रीनिवास गेडाम
Wednesday, 7 August 2019
  • साधा कुणाचा धक्का लागला तरी तो आगबबूला होतो. चूक झाली असूनही मीच बरोबर अशी भुमिका घेतो. क्षमाशीलता त्याच्या गावीही नसते. क्षमा करणं किंवा क्षमा मागणं बहुतेकांना आवडत नाही. मृत्यूशी झुंजतांना मात्र त्याचा सर्व अहंकार गळून गेला असतो.

जो आला तो जाणारच! आज हा गेला उद्या तो जाणार. कुणी उशिरा जाईल कुणी लवकर जाईल हाच काय तो फरक! 'आये है तो जायेंगे राजा रंक फकीर!' श्रीमंत, गरीब, लहान, मोठे सर्व जाणार... मरणाजवळ कुठलाच भेदभाव नाही. कुणी कितीही बलाढ्य असला तरी मरणापुढे त्याचं काही एक चालत नाही. मरणापुढे तुमची विद्वत्ता, ढाण्या वाघ असल्याची गुर्मी, सत्तेचा माज काही टिकत नाही. जे काही कमावलं असेल ते इथेच सोडून जावं लागतं. गाडी, बंगला, पैसा, सत्ता काहीच सोबत येत नाही. तरीही माणूस आयुष्यभर याच गोष्टींच्या मागे हात धुवून लागतो.

या मृत्यू लोकात सर्वकाही नश्वर, नाशवंत, क्षणीक आहे. क्षय होणार हे निश्चित आहे तरीही माणूस स्वतःला अजरामर करण्यासाठी केवीलवाणी धडपड करतो. प्रसिद्धी, मानमरताब मिळावा यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावतो तरीही त्याचं समाधान होत नाही. हाडामासाच्या देहाचा माणसाला खूप अहंकार आहे. साधा कुणाचा धक्का लागला तरी तो आगबबूला होतो. चूक झाली असूनही मीच बरोबर अशी भुमिका घेतो. क्षमाशीलता त्याच्या गावीही नसते. क्षमा करणं किंवा क्षमा मागणं बहुतेकांना आवडत नाही. मृत्यूशी झुंजतांना मात्र त्याचा सर्व अहंकार गळून गेला असतो.

आयुष्यात केलेल्या चुकांचा, वाईट वागण्याचा खूप पश्चाताप होतो. एकेक पाप आठवून तो अशांत होतो. जे करायला हवं होतं ते केलं नाही, नको त्याच्या पाठीमागे लागलो हे अंतीम क्षणी कळतं पण तेव्हा वेळ निघून गेली असते. मरणाच्या दारात अंतीम श्वास मोजत असलेल्या माणसाला एकेक श्वासाचं महत्त्व कळतं. आयुष्यात खूप वेळ मिळाला पण तो निरर्थक गोष्टीत घालवला. जगण्याचा आनंद घेताच आला नाही. कुढत, कण्हत, तक्रार करत जगलो याची जाणीवही शेवटच्या क्षणी होते. ऐन उमेदीच्या काळात माणूस उन्मत्तपणे जगतो. मरण, म्हातारपण येईल तेव्हा येईल त्याचा विचार आताच कशाला असा उफराटा विचार माणूस करतो.

आपल्या आप्त मित्राला स्मशानात मुठमाती देतांना क्षणभर स्मशान वैराग्य येतं पण ते जास्त काळ टिकत नाही. एकदिवस सर्व सोडून दूरच्या प्रवासाला जायचं आहे त्यामुळे जास्त ओझी हवीत कशाला हा विचार करून जे मिळतं त्यात आनंद मानून जगणं यातच खरं शहाणपण आहे. शहाण्या माणसानं या दुनियाच्या भुलभुलैयामध्ये जास्त रमू नये.....आसक्त होऊ नये. निर्वाण प्राप्तीचा मार्ग शोधावा यातच त्याचं सर्वोतोपरी कल्याण आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News