#cwc19 भारत इंग्लंडच्या मागे होताच; मात्र तो अशा चुकीच्या पध्दतीने होता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

खेळ कुठलाही असला, तरी साखळी फेरी म्हटली की बाद फेरीत आम्हाला याच्याशी खेळायचे नाही, त्याच्याशी खेळायचे हे ओघाने येतेच. अर्थात, यात काही चूक नाही. हा खेळाचा एक भाग झाला. फार, तर खेळातील नियोजनाचा भाग म्हटले तरी चालेल.

वर्ल्ड कप 2019 : खेळ कुठलाही असला, तरी साखळी फेरी म्हटली की बाद फेरीत आम्हाला याच्याशी खेळायचे नाही, त्याच्याशी खेळायचे हे ओघाने येतेच. अर्थात, यात काही चूक नाही. हा खेळाचा एक भाग झाला. फार, तर खेळातील नियोजनाचा भाग म्हटले तरी चालेल. पण, असे करताना आपण अगदीच मुद्दामून हरलो नाही असे दाखवायचे नाही. मी मारल्यासारखे करतो, तु रडल्यासारखे कर या प्रमाणे. म्हणजे आम्ही हरतो, तुम्ही जिंकल्यासारखे करा. यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी लढती अखेरच्या टप्प्यात असताना असेच काहीसे घडत आहे, असे म्हणण्याला वाव आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याने त्याची खात्री पटली असे म्हणता येऊ शकेल. 

काही दिवसांपूर्वी आपणच चाहते या गोलंदाजांना दृष्ट लागू नये असे म्हणत होतो. भारतीय क्रिकेट इतिहास लक्षात घेतला तर सध्याची भारतीय गोलंदाजी ही आजपर्यंतची सर्वोत्तम अशीच आहे. जसप्रित बुमरा, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या असे गोलंदाज भारताचे आव्हान समर्थपणे सांभाळत आहेत. यात कुणीच कमी नाही. मग, इंग्लंडविरुद्ध असे काय झाले की या गोलंदाजीने साफ नांगी टाकली? जॉनी बेअरस्टॉ आणि जेसन रॉय यांचा धडाका इतका होता की भारतीय गोलंदाजांनी तेथेच हाय खाल्ली. षटकामागे दहाची धावगती सुरवातीला मिळाल्यावर शेवट तीनशे साडेतीनशेहून अधिक धावा होणार हे सांगायला नको. या झाल्या नसत्या, तर भारतीय गोलंदाजांचे कौतुक होते. 

आव्हानाचा पाठलाग करताना भारतीयांचे काय चुकले?
खेळपट्टी तीच होती. गोलंदाजही वेगवान होते. आपल्याकडे रोहित शर्मा होता, विश्‍वकरंडकच नाही, तर कारकिर्दीत कमालीचे सातत्य असणारा विराट कोहली होता. हरभऱ्याच्या झाडावर चढवलेला रिषभ पंत होता, कपिलची उपमा मिळालेला हार्दिक पंड्या आणि मॅच विनर ख्याती असणारा धोनी देखील होता. मग, झाले काय ? झाले काही नाही. आपण जिंकण्याची उर्मीच दाखवली नाही. राहुल क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. तो मैदानाबाहेर होता. त्यामुळे तो सलामीला आला याचेच आश्‍चर्य वाटले. वेगळे काही झाले नाही. त्याने सोपा झेल दिला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरवात तेवढीच मोठी लागते. तसे झाले नाही इथे आपण पहिली चूक केली. नंतर विराट कोहली, रोहित शर्मा ही जोडी जमून आली. बर्मिंगहॅमच्या मैदानावर एकाबाजूला सीमारेषा जवळ होती. त्याचा फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी घेतला. त्यांचे फटके भारतीय क्षेत्ररक्षक नाही, तर प्रेक्षक अडवत होते. ते धाडस आपल्या फलंदाजांना दाखवता आले नाही. दाखवणार ही कसे. सुरवातच इतकी वाईट झाली होती की, रोहित - विराटला डाव सावरण्याचे काम सर्वप्रथम करावे लागले. जेव्हा त्यांनी आक्रमणास सुरवात केली, तेव्हा आवश्‍यक धावांची गती वाढली होती. मग यायचे ते दडपण आलेच. यात प्रथम कोहलीचा बळी गेला. त्यानंतर पंत फलंदाजीला आला. त्याला फटकेबाजी म्हणा किंवा धावा काढण्याची इतकी घाई झाली होती की आल्या आल्या दोन वेळा तो धावबाद होता होता वाचला. त्या वेळी समोरच्या बाजूने खेळणाऱ्या रोहितने मनातल्या मनात नक्कीच पंतचे कान उपटले असतील. त्यानंतर त्याने धावा केल्या पण, आंतरराष्ट्रीय स्तर आणि त्यातही विश्‍वकरंडक स्पर्धेचे दडपण शिकण्यास त्याला अजून वेळ नक्कीच द्यायला हवा.

पंड्याने नंतर प्रयत्न केले. या दरम्यान रोहित बाद झाला. पंड्या आला. त्याने किमान आक्रमकता दाखवण्यास सुरवात केली. पण, रोहित बाद झाल्यानंतर आपण विजयासाठी प्रयत्न करण्याचेच सोडून दिले अशीच देहबोली भारतीय फलंदाजांची होती. धोनी आणि केदार जाधव यांना कठिण होते पण, अशक्‍य नक्कीच नव्हते. अहो, सध्याच्या मारधाड क्रिकेटमध्ये काहीही घडते. पण, तेच काहीही घडविण्याची प्रवृत्ती दिसून आली नाही. 

भारतीय संघ हरला. त्यामुळे पाकिस्तानचे आव्हान कठिण झाले. इंग्लंडने आव्हान राखले. त्यांचा अखेरचा सामना न्यूझीलंडशी आहे. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळविल्यास पाकिस्तानला पुन्हा आशेचा किरण दिसेल. तरी पुन्हा सांगतो क्रिकेट काय किंवा अन्य कुठलाही सांघिक खेळ असो साखळी लढती संपत नाही तो काहीही घडू शकते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News