घराच्या शोधात निघालेल्या गृहिणीचा खडतर प्रवास

संतोष भिंगार्डे
Saturday, 15 June 2019
  • सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी आतापर्यंत आशयघन आणि विचारप्रवर्तक चित्रपट दिलेले आहेत.
  • त्यांच्या चित्रपटांनी विविध चित्रपट महोत्सव आणि विविध पुरस्कार सोहळे गाजविले आहेत.
  • त्यांच्या बहुतेक चित्रपटांना मानाचे आणि महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आपल्या चित्रपटांतून नेहमीच काहीतरी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आता त्यांचा ‘वेलकम होम’ हा चित्रपट आला आहे. डॉ. मोहन आगाशे, मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, सुमित राघवन, सिद्धार्थ मेनन, उत्तरा बावकर आदी कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो...

स्त्रियांच्या स्वातंत्र्याबाबत आणि तिच्या हक्कांबाबत नेहमीच बोलतो. परंतु खरेच आजच्या समाजात स्त्री स्वतंत्र झाली आहे? तिला मनसोक्त जगण्याचा हक्क प्राप्त झाला आहे का? खरं तर ती आपल्या घरासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी  दिवस-रात्र कष्ट उपसते... अतोनात मेहनत करते; पण तिचे नेमके स्थान काय आहे, याचा आपण कधी विचार केला आहे का...? ‘वेलकम होम’ या चित्रपटामध्ये याच गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. एक संवेदनशील आणि विचार करायला प्रवृत्त करणारा हा चित्रपट आहे. 

ही कथा आहे डॉ. सौदामिनी आचार्य (मृणाल कुलकर्णी) या एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेची. ती आपल्या नवऱ्याचं घर सोडून स्वतःच्या हक्काच्या घरासाठी बाहेर पडते आणि थेट आपल्या माहेरी येते. माहेरी येताना ती आपल्या सासूलाही बरोबर घेऊन येते. तिची सासू मानसिक आजाराने त्रस्त असते. माहेरी तिचे आई (उत्तरा बावकर) आणि वडील (डॉ. मोहन आगाशे) आणि तिची लहान बहीण मधुमती (स्पृहा जोशी) राहत असतात.

तिचा एक भाऊ (सुबोध भावे) परदेशात गेलेला असतो. एक मध्यमवर्गीय सुखी कुटुंब असते. डॉ. सौदामिनीची लहान मुलगी कुकी (प्रांजली श्रीकांत) ही आपल्या आजीकडेच राहत असते. ती माहेरी आल्यानंतर तिचे आई-वडील आणि बहीण तिला काहीही बोलत नाहीत किंवा विचारत नाहीत. उलट तिला चांगले सहकार्य आणि साथ देतात. अशातच तिला तिच्या लहानपणीचा मित्र सुरेश (सुमित राघवन) भेटायला येतो. तो तिची आपल्या परीने समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. त्याच दरम्यान तिला काही मंडळी भेटतात आणि त्यांच्या बोलण्यातून तिला काही मार्ग सापडतो का? तिला आपल्या हक्काचं घर मिळतं का? या आणि अन्य काही प्रश्‍नांसाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

या चित्रपटाच्या विषयासह कलाकारांचा अभिनय आणि संवाद या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. विशेष म्हणजे मृणाल कुलकर्णीने डॉ. सौदामिनीची व्यक्तिरेखा समरसून साकारली आहे. तसेच या चित्रपटातील गाणी प्रसंगानुरूप आहेत. 

एखादा टोकाचा निर्णय घेताना स्त्रीची होणारी घालमेल, तिच्या मनातील अस्वस्थता मृणालने पडद्यावर उत्तम वठविली आहे. आपल्या मनातील दुःखाचा आवेग तिने संवादांतून व्यक्त न करता आपल्या डोळ्यांतून व्यक्त केला आहे. स्पृहा आणि मृणाल या दोन्ही अभिनेत्रीने आपापल्या भूमिकेचे बेअरिंग छान पकडले आहे. दिलखुलास, बिनधास्त आणि तितकीच मिठ्ठास अशी मधुमती स्पृहाने झकास साकारली आहे. डॉ. मोहन आगाशे आणि उत्तरा बावकर यांनी त्यांच्या आई-वडिलांची भूमिका साकारली आहे.

आपल्या मुलीचा निर्णय चूक की बरोबर आहे, या फंदात न पडता उलट तिला आधार देण्याचे काम केले आहे. सुरेशची समंजस अशी व्यक्तिरेखा सुमित राघवनने केली आहे. सिद्धार्थ मेनन, दीपा श्रीराम, सारंग साठे आदींच्या भूमिकाही तितक्‍याच महत्त्वाच्या आहेत. दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सगळ्या कलाकारांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेची माहिती त्यांनी विस्तृतपणे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या प्रत्येक व्यक्तिरेखेचे या चित्रपटात तितकेच महत्त्व आहे.

मात्र चित्रपट काहीसा गंभीर वळणाने जाणारा आहे आणि अतिशय संथ झाला आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धात फारशा घडामोडी होताना दिसत नाहीत. त्यामुळे काहीशी निराशा पदरी पडते. एकूणच स्त्रीचं हक्काचं घर कोणतं? तिच्या नवऱ्याचं, तिच्या आई-वडिलांचं की तिचं स्वतःचं, हा प्रश्‍न या चित्रपटात मांडण्यात आला आहे. ही कथा एका स्त्रीची नाही; तर तिच्या अस्तित्वाची आणि तिच्या स्वातंत्र्याची आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News