क्रिकेट ला काळिमा ; पुन्हा फिक्‍सिंग?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • प्रतिस्पर्धी मालकांनी ऑफर दिल्याचा रणजीपटूचा आरोप 

मुंबई - आयपीएल संपल्यानंतर लगेचच सुरू झालेली मुंबई टी-२० लीग वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पराभूत होण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ मालकांनी खराब खेळ करण्याची ऑफर दिल्याचा दावा एका खेळाडूने केल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाची लाचलुचतपत प्रतिबंधक समिती मुंबई क्रिकेट संघटनेकडून अधिकृत माहितीची प्रतिक्षा करीत आहे. 

मुंबई टी-२० लीगमधील उपांत्य सामने २४ आणि २५ मे रोजी झाले. यातील एका उपांत्य सामन्यात हा प्रकार घडला आहे. खराब खेळ करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या मालकाने ऑफर दिल्याची माहीती रणजीपटूने दिली आहे.  मुंबई क्रिकेट संघटनेने अधिकृत माहिती दिल्यानंतर आम्ही चौकशी सुरू करू, असे बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले. या लीगला बीसीसीआयची मान्यता आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी हवी, अजूनही काही जण त्यांनाही ऑफर आल्याची माहिती देऊ शकतील, असे बीसीसीआयचे माजी वरिष्ठ पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले. मुंबई ही प्रतिष्ठित क्रिकेट संघटना आहे. त्यामुळे या लीगची विश्‍वासार्हता अधिक आहे, असेही शेट्टी म्हणाले. 

प्रत्येक राज्य संघटना आता अशा प्रकारच्या लीग तयार करत आहेत; परंतु बीसीसीआयने त्यांना मान्यता देण्यापूर्वी सर्व बाबी तपासाव्यात. बीसीसीआयच्या सर्व नियमांचे त्यांनी पालन करावे, तसेच प्रत्येक संघाचे कोणकोण मालक आहे; त्यांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करावी अशीही सक्ती बीसीसीआयने करावी, असे मत शेट्टी यांनी मांडले. 

मोसम सुरू होण्याअगोदर मुंबई क्रिकेट संघटनेने आपल्या खेळाडूंच्या प्रबोधनासाठी लाचलुचपत प्रतिबंधकाबाबत शिबिर घेतले असेल अशी मी आशा करतो, असे शेट्टी म्हणाले. शेट्टी हे मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्षही राहिलेले आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News