सहकारमंत्री सुभाष देशमुखांची 5 मिनिटांची सायकलिंग!

परशुराम कोकणे
Saturday, 15 June 2019
  • राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे प्रदूषणमुक्तीचा प्रचार करण्यासाठी सायकल प्रवास करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.
  • सहकार मंत्र्यांच्या व्हिडीओवरून सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 
  • निवासस्थानातून सहकार मंत्री देशमुख सायकल घेवून बाहेर पडले. ​

सोलापूर: राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे प्रदूषणमुक्तीचा प्रचार करण्यासाठी सायकल प्रवास करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. सहकार मंत्र्यांच्या व्हिडीओवरून सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

आज शनिवारी सकाळच्या सुमारास होटगी रस्त्यावरील निवासस्थानातून सहकार मंत्री देशमुख सायकल घेवून बाहेर पडले. रोजच्या सारखाच पांढऱ्या रंगांचा पोषाख त्यांनी केला होता. 

सायकलिंग करत पाचच मिनिटात सहकारमंत्री आसरा चौक मार्गे हॉटेल बालाजी सरोवरमध्ये पोचले. सायकलिंग करताना रस्त्यावरील लोक देशमुख यांना आश्‍चर्याने पाहत होते. देशमुख यांच्या सायकलमागे पांढऱ्या रंगाची कार आणि सोबत वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची जीपही दिसत आहे. सायकलच्या पुढे दुचाकीवरील पोलिस कर्मचारी आपली ड्युटी बजावताना दिसून येत आहेत. 

हा व्हिडीओ सहकार मंत्री देशमुख यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडीयावर शेअर केला आहे. देशमुख यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही हा व्हिडीओ शेअर केला आहे. काही वेळातच अनेक व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर आणि फेसबुकवर हा शेअर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, हॉटेल बालाजी सरोवरमधील उद्योजकांचे कार्यक्रम संपल्यानंतर सहकारी मंत्री देशमुख हे नेहमीप्रमाणे आपल्या वाहनांच्या ताफ्यातून उस्मानाबादकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. 

आज मी प्रदूषण मुक्तीसाठी सायकल प्रवास करायचे ठरवले आहे. येणाऱ्या काळात जसा वेळ मिळेल, त्याप्रमाणे सायकलवर प्रवास करणार आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना हे शक्‍य नाही, पण प्रत्येकांनी ठरवून आठवड्यातून एक दिवस सायकल प्रवास अंगिकारला पाहिजे. यानिमित्ताने स्वतःचे स्वास्थ आणि पर्यावरणाचासमतोल दोन्ही साधणे शक्‍य होईल. आज माझ्या पुढे-मागे गाड्यांचा ताफा असला तरी तो मंत्री या नात्याने व्यवस्थेचा भाग आहे. माझ्या सहकाऱ्यांना देखील मी आठवड्यातून एक दिवस सायकल प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. आपण ही आपल्यापरीने हा बदल स्वतःमध्ये करण्याचा प्रयत्न करावा हीच सदिच्छा! 
- सुभाष देशमुख,  सहकार मंत्री 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News