वॉरनिमित्त टायगरसोबत मारलेल्या 'या' खास गप्पा

संतोष भिंगार्डे, मुलाखतकार
Saturday, 28 September 2019
  • अभिनेता टायगर श्रॉफचा वॉर हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. यशराज बॅनर आणि हृतिक रोशनबरोबर तो पहिल्यांदाच काम करीत आहे. या चित्रपटाबद्दल त्याला काय वाटते, त्याविषयी खास बातचीत...

‘वॉर’ चित्रपट गुरू-शिष्य नात्यावर आहे; पण इंडस्ट्रीमध्ये तुझा गुरू कोण?
- निर्माते साजिद नाडियादवाला हे माझे गुरू. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. या झगमगत्या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठीचे धडे मी त्यांच्याकडूनच घेतले. कशा स्वरूपाचे काम करावे लागते, हे मला त्यांच्याकडूनच शिकायला मिळाले. त्यांनी इंडस्ट्रीतील काही बारकावे मला सांगितले. त्यामुळे ते माझे गुरू आहेत. त्याशिवाय मी हृतिक रोशनकडून खूप प्रेरणा घेतली आहे. त्याच्या कामावर मी नेहमीच प्रभावित असतो. त्याचे काम मला खूप आवडते. ‘वॉर’ चित्रपटात आमचे गुरू-शिष्य असे नाते आहे आणि ऑफस्क्रीनही आमचे गुरू-शिष्य असेच नाते मी मानतो. त्यांच्याकडून अभिनय तसेच डान्सच्याबाबतीत बरेच काही नव्याने शिकायला मिळाले.   
 

हृतिक रोशनबरोबर तू पहिल्यांदाच काम करीत आहेस. सेटवर तुझी आणि त्याची केमिस्ट्री कशी जुळली?
- अगदी उत्तम. आम्ही दोघेही कामाच्या बाबतीत एकसारखे आहोत. मलाही डान्सची आवड असल्याने त्याच्याबरोबर जास्त जुळवून घ्यावे लागले नाही. सर्वच गोष्टी खूप सोप्या पद्धतीने आम्ही दोघांनी समजून घेऊन पार पाडल्या. त्याच्याबरोबर काम करताना मजा आली. आम्ही शूटिंग खूप एन्जॉय केली. उलट त्याच्याकडून मला खूप शिकायला मिळाले.

 ‘वॉर’मध्ये ॲक्‍शन सीन्स करताना किती आव्हानात्मक वाटले?
- बॉलीवूडच्या इतिहासातील आजवर न टिपलेले ॲक्‍शन सीन्स या चित्रपटात चित्रित करण्यात आले आहेत. त्यामुळे थोडे फार कठीण गेले. त्याचप्रमाणे चित्रपटातील माझ्या भूमिकेनुसार मला स्वतःतही बदल करावे लागले. सीन थोडे कठीण असल्याने जास्त मेहनत घ्यावी लागली. मी नेहमीच माझ्या भूमिकेसाठी कठोर मेहनत घेत असतो. दिग्दर्शक सांगेल त्याहीपेक्षा अधिक काय करता येईल याचा विचार करतो.
 

 या चित्रपटातील भूमिकेबद्दल काय सांगशील?
-मी या चित्रपटात एका हुशार मुलाची भूमिका साकारत आहे. एका एजन्सीमधील तो एजंट असतो. एजंट म्हटल्यानंतर एखादी गोष्ट कशी पटवून द्यावी किंवा एखादी घटना कशा पद्धतीने सांगावी, या कलेमध्ये त्याचा चांगलाच हातखंडा असतो आणि हे सर्व तो त्याच्या गुरूकडूनच शिकला आहे. शिवाय आपल्या गुरूचा आवडता शिष्यही तो आहे. 
 

‘वॉर’ची ऑफर आल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
- मी खूप खूश होतो. कारण या चित्रपटात हृतिक आणि त्याच्याबरोबर पहिल्यांदाच काम करायचे म्हटल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझी भूमिका ऐकली आणि होकार दिला. खरे तर इतक्‍या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी खूप खूश होतो.
 

‘वॉर’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची काम करण्याची  पद्धत वेगळी आहे. त्यांच्या दिग्दर्शनातली कोणती खास  गोष्ट तुला भावली?
- मी आतापर्यंत काम केलेल्या प्रत्येक दिग्दर्शकाकडून काही ना काही शिकलो आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनातली खास गोष्ट म्हणजे, ते जेथे कॅमेरा ठेवतील तेथे त्यांची कन्सेप्ट तयारच असते. ते प्रत्येक सीन खूप चांगल्या पद्धतीने मांडतात आणि दाखवतात.

यशराज बॅनरबरोबर तू पहिल्यांदाच काम करत आहेस.  काय अनुभव आला?
- खूप छान वाटलं. आदित्य चोप्रा हे खूप चांगले निर्माते तर आहेतच; त्याचप्रमाणे ते उत्तम दिग्दर्शकही आहेत. कथेबरोबरच पटकथेवर ते अत्यंत बारकाईने काम करतात. त्यांची प्रोजेक्‍टवर बारीक नजर असते. ते काम करण्यास प्रोत्साहन देतात आणि आपला हुरूपही वाढवितात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला खूप मज्जा आली.  
 ‘वॉर’मधील भूमिकेने तुला कोणती शिकवण दिली?
- या भूमिकेनंतर मी खरंच बरेच काही शिकलो. या भूमिकेनंतर मी स्वतः प्रत्येक गोष्टीला अधिक प्रमाणात महत्त्व देऊ लागलो. 

अभिनयाबरोबरच तू एक उत्तम गायक आहेस. एका शोमध्ये गाणे म्हटलेस. याबद्दल तू काय सांगशील?
- कपिल शर्मा शोमध्ये मी गाणे गायलो आणि ती माझी गाणे गाण्याची पहिलीच वेळ होती. याआधी मी तसा कधी प्रयत्नही केला नाही. मात्र, मी गायलेल्या या गाण्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोणत्या चित्रपटात यापुढे गाण्याची संधी मिळाली तर मला नक्की गायला आवडेल.
 

 

ॲक्‍शन चित्रपटच करण्याण्याकडे तुझा अधिक कल असतो, त्याबद्दल काय सांगशील? 
- मला लहानपणापासूनच ॲक्‍शन हिरो व्हायचे होते. माझे ते स्वप्न होते. शिवाय इंडस्ट्रीमध्ये आज मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक शुक्रवारी एखादा नवीन हिरो येत आहे. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी ॲक्‍शन चित्रपटांचीच निवड करतो. त्यामध्ये काही गैर आहे, असे मला वाटत नाही.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News